नर्मदा परिक्रमा, परिक्रमावासी, यांच्या बद्दल मनामध्ये अपार श्रद्धा, उत्सुकता आणि आदर हा पहिल्यापासूनच होता. कारण नर्मदापरिक्रमेवरती आधारित जगन्नाथ कुंटे, सुहास लिमये, भारती ठाकूर यांच्या पुस्तकांचे, तसेच गोनिदांच्या “कुणा एकाची भ्रमणगाथा” या पुस्तकांचे वाचन आधी केले होते. मय्या प्रतिभाताई चितळे यांचे युट्युब वरील व्हिडिओ पण आवडीने पाहिले होते. माझ्या परिचयातील काही व्यक्तींनीपण आधी बसने परिक्रमा केलेली होती. त्यामुळे ती अवघड असली तरी अशक्य नाही अशी एक भावना मनामध्ये सुप्त होती. तरीपण ती आपल्याला झेपेल का? आपण ती पूर्ण करू शकू का? किंवा आपल्यामुळे तिथे कुणाला काही त्रास होईल का? अशा अनेक शंका मनामध्ये असल्याने ती करण्याचे धाडस होत नव्हते. परंतु एक दिवस सुखदने सहज विचारले, नर्मदा परिक्रमेला येणार का? आणि एका क्षणात मी हो म्हणाले. मला वाटते तिच्या रूपात नर्मदा मय्यानेच मला विचारले होते.आणि यश हेच ज्यांचे धन आहे अशा यशोधन ट्रॅव्हल्सच्या शंभराव्या नर्मदा परिक्रमेच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य नर्मदेने माझ्या पदरात टाकले. सर्वात प्रथम घरातील सर्वांचा मनःपूर्वक पाठिंबा मिळाल्यामुळे आणखीन उत्साह वाढला. स्वाती आणि प्रिया या दोघी मैत्रिणी पण बरोबर येणार याचाही आनंद होता.
12 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता टॅक्सीने गोव्याच्या दिशेने प्रयाण केले. गोवा ते इंदोर इंडिगो फ्लाईटने दुपारी चार वाजता इंदोर येथे पोहोचलो. हॉटेल विन वे च्या दारातच एखाद्या नववधूप्रमाणे नटून थटून यशोधनची परिक्रमा बस उभी. ही बस आज नर्मदेची शंभरावी परीक्रमा करण्यासाठी सज्ज झाली होती. तिचे पण भाग्य किती थोर असणार! आणि तिने आजपर्यंत कितीजणांना नर्मदेच्या दर्शनाने कृपांकित केले आहे या कल्पनेने भरून आले. बाकीच्या इतर मूर्ती (म्हणजे बाकीचे सहप्रवासी) तेरा तारखेला सकाळी भेटणार होत्या. आमचा मुक्काम त्यादिवशी इंदोरमध्ये विन वे हॉटेल मध्ये झाला. संध्याकाळी थोडेफार इंदोर फिरून घेतले. प्रथम नाना महाराज तराणेकर यांच्या समाधी मंदिराला जाऊन त्यांचे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेतले. राजवाडा, खजराणा गणपती आणि ५६ भोग इथे फेरफटका मारला आणि उद्याच्या प्रवासाबद्दल थोडी उत्कंठा आणि उत्साह मनामध्ये जागवत झोपी गेलो.
सकाळी हॉटेलमध्ये बालभोग (नाश्ता) घेतानाच प्रकाशदादांची औपचारिक ओळख झाली. इडली चटणी, इंदोरी पोहे, जिलबी असा भरपेट बेत होता. प्रकाशदादांचा धीरगंभीर आवाज, प्रसन्न व्यक्तिमत्व, आपुलकीने बोलणे, यामुळे प्रथमदर्शनीच हे वेगळे व्यक्तिमत्व आहे याची झलक मिळाली. मुंबई, पुणे, बेंगलोर, कच्छ, बेळगाव अशा विविध भागातून 42 जण म्हणजे 42 मूर्ती आपापल्या जागेवर बसमध्ये स्थानापन्न झाल्या.
‘नर्मदे हर’ च्या गजरामध्ये बस सुरू झाली आणि प्रकाशदादा बोलायला उभे राहिले. सर्वांचे औपचारिक स्वागत झाले. नर्मदेवरती असणारी त्यांची अपार भक्ती, श्रद्धा, प्रेम त्यांच्या डोळ्यातून, प्रत्येक शब्दातून, देहबोलीतून प्रगट होत होते आणि नकळत आपल्याला पुढील 19 दिवस सत्संग लाभला आहे, याची खूणगाठ मनात पक्की झाली. परिक्रमेच्याबद्दल त्यांनी पत्रकामध्ये सूचना, माहिती ज्या पद्धतीने दिली होती ती वाचतानाच त्यांच्या कार्यपद्धतीची एक झलक जाणवलेली होतीच. पहिल्यांदाच त्यांनी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक आपल्या अंतरंगी घडणारी यात्रा आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळे या प्रवासाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन नकळत मनामध्ये तयार होत गेला. आपुली आपण करा सोडवण, या विचाराने परिक्रमा करायची आहे.
भारतदेशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्यप्रदेशातून आमचा प्रवास सुरू झाला. नर्मदा मध्यप्रदेश येथील अमरकंटक येथे उगम पावते आणि अरबी समुद्रात विलीन पावते. उगमापासून तिचा प्रवास मध्यप्रदेश मध्ये 85%,महाराष्ट्रातील नंदुरबार व धडगाव जिल्ह्यात २% टक्के आणि गुजरात मध्ये 13% असा होतो. अंकलेश्वर हे दक्षिण तटावर तर भरूच हे उत्तर तटावरील गाव यांच्यापासून पन्नास किलोमीटर पुढे वाहत ती अरबी समुद्रात ज्या ठिकाणी मिळते त्याला खंबातचे आखात म्हणतात. तिथले मोती प्रसिद्ध आहेत.
नर्मदा परिक्रमेची पूर्वपिठीका प्रकाश दादा समजावून सांगत होते. नर्मदा पूर्वेकडे उगम पावून पश्चिमेकडे वाहते. तिने हिंदुस्थानाचे दोन भाग केले आहेत. तिला भारतमातेची मेखला तसेच भारतमातेचा आत्मा असे सुद्धा म्हणतात. नर्मदा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. नर्मदा ही कुमारी देवी आहे. सर्व नद्यांमध्ये फक्त नर्मदेची परिक्रमा केली जाते.परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. नर्मदेला उजव्या हाताला ठेवून परिक्रमा केली जाते. परिक्रमेत निसर्गाची विविध प्रत्ययकारी रुपे पाहायला मिळतात. नर्मदा परिक्रमेत नर्मदेची अमरकंटक येथे बाल,भेडाघाट येथे अवखळ,गरुडेश्वर येथे संयमी, गुवारला वेगवान,रावरखेडला विशालकाय, शिनोरची संथ, अशी विविध रूपे पाहायला मिळतात. प्रथम नर्मदेची परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली. त्यांनी ती नर्मदेच्या 999 उपनद्या सुद्धा न ओलांडता 45 वर्षांनी पूर्ण केली. त्यांची साधना इतकी पराकोटीची होती की त्यांना नर्मदापुराण लिहिण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त झाला. अनेक ऋषीमुनीनी तिच्या तटावर साधना केलेली आहे. नर्मदा अवधूतांची माता आहे. परिक्रमेत आपण कुठेही तिला का ओलांडणार नाही हे समजावून सांगताना ते म्हणाले, आपण ज्या तटावर असतो तो तट परमार्थाचा असतो आणि समोरचा तट हा प्रपंचाचा असतो. म्हणून आपण परमार्थाचा मार्ग सोडून परत प्रपंचाकडे पाहायचे नाही. आपले पूर्वसुकृत, वाडवडिलांची पुण्याई आणि नर्मदामय्याची कृपा म्हणूनच आपण या परिक्रमेमध्ये आहोत हा विश्वास आणि श्रद्धा निरंतर मनात ठेवली पाहिजे.
परिक्रमेत ‘नर्मदे हर’ हा मंत्र सतत जपला तर आपण मोक्षाचे धनी होतो. मोक्ष म्हणजे हा प्रपंच मिथ्या आहे आणि ईश्वर सत्य आहे हे समजून घेणे. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात असते पण कमळाच्या आत पाणी शिरत नाही त्याप्रमाणे आपण संसारात सगळ्यात असावे पण कशातही नसावे. स्वतःच्याच घरी पाहुणा म्हणून राहायला शिकणे ही परिक्रमा. म्हणजे मी कोण आहे याचा शोध घेणे. त्यासाठी परिक्रमेत पोशाख, वागणे, आहार, बोलणे, चालणे यथायोग्य असावे. मनाचे चित्तात रूपांतर करणे म्हणजे परिक्रमा. ‘हे असे का, तसे का’ असे विचारण्यापेक्षा ‘असू दे असू दे’ म्हणणे म्हणजे परिक्रमा. मनाचा तळ गाठणे म्हणजे परिक्रमा. शाश्वत सुखाचा राजमार्ग म्हणजे परिक्रमा. अनुसंधानात राहणे ही परिक्रमा आणि सतत ईश्वरी शक्तीचे चिंतन करणे ही परिक्रमा. प्रापंचीकपाश कमी करून मय्येशी जास्तीतजास्त जवळीक तथा अनुसंधान ठेवणं त्याचं नाव परिक्रमा असं आहे. परिक्रमा म्हणजे प्राप्त स्थितीत संकल्पयुक्त सात्विक जीवनाचा परिपूर्ण आनंद घेणं असं आहे. परिक्रमा ही भारतीय सभ्यता आहे. अशी परिक्रमेची पूर्वपिठीका प्रकाशदादांनी मनामध्ये तयार केली.
आता प्रत्येक ठिकाणी ज्या मंदिरात, ज्या मठात आपण जाऊ, तिथे भगवंताकडे, सद्गुरुकडे त्याची कृपा मागावी आणि आपला दुबळेपणा त्याच्या चरणी समर्पित करावा असे त्यांनी सांगितले.
या दिवसात केवळ फिरणं न करता अवघ्या जीवनाचं सोनं आपल्याला करायचं आहे.आपण भाग्यवंत आहोत म्हणून मय्या किनाऱ्यावर आलो आहोत. त्यासाठी रोज नर्मदा स्नान करणं, जप - तप तथा काही एक नियम करणे, अनुष्ठान करणे, सकाळ संध्याकाळ आरती करणं, नर्मदे हर या बीजमंत्राचे सतत स्मरण करणे, हे सहजसाध्य उपाय आहेत.अशा अनमोल सूचना ते मनापासून देत होते. आपलं गाव घर सोडून परप्रांतात २० दिवस काढायचेत. नर्मदामय्या कृपेने हा कालखंड म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे हे जाणवू लागले. 'नर्मदे हर जीवनभर' असं म्हणत परिक्रमावासी एका वेगळ्याच आनंदात मग्न होऊन चाललेले बस मधून दिसत होते
प्रकाशदादा सांगत होते, परिक्रमा बसने असो वा पायी त्या मागचा भाव महत्त्वाचा. तुम्ही फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा परिक्रमेतच असले पाहिजे. तुम्ही यशोधनला धन दिले आहे तनानेही इथे उपस्थित आहात. आता तुमचे मनही आम्हाला हवे आहे.
महाराष्ट्रात संतांची मांदियाळी आहे. जनाबाई म्हणतात,
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा,
निवृत्ती हा खांद्यावरी,सोपानाचा हात धरी,
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ता ही सुंदर,
गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जिवाबरोबरी,
बंका कडेवरी, नामा करांगुळी उद्धरी,
जनी म्हणे गोपाळा,करी भक्तांचा सोहळा.
महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभते खणी, कितीक नरमणी, संत जन्मले हीच्या उदरात. अनादी काळापासून अनेक साधू संत महात्मे मय्येच्या काठावर ठाण मांडून बसले आहेत.
परीक्रमेच्या पूर्वसंध्येला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची रीत आहे. नर्मदा किनाऱ्यावरील आश्रम किंवा मंदिरे हे अखंड ऊर्जेचे स्त्रोत आहेत. त्यासाठी प्रकाशदादांनी गुरुचा महिमा समजावून सांगितला.
‘श्रीगुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी’
गुरु संतकुळीचा राजा, गुरु प्राणविसावा माझा
गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रैलोकी
गुरु सुखाचा सागरु, गुरु प्रेमाचा आगरू
गुरु धैर्याचा डोंगरु, कधी न डगमगला
गुरु वैराग्याचे बळ, गुरु परब्रह्म केवळ
गुरु सोडविती तात्काळ,गाठ लिंगदेहाची
गुरु साधकाची साय, भक्तालागी माय
गुरु कामधेनु गाय,भक्ता घरी दुभतसे
गुरु घाली ज्ञानांजन,गुरु दाखवी द्विजगण
गुरु सौभाग्य देऊन, साधू बोधना करी
गुरु भक्तीचे मंडन, गुरू दोषाचे दंडन
गुरु पापाचे खंडन,नानापरी वारीतसे
गुरु काया काशी, गुरु उपदेशी
तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रखुमादेवीवरासी, ज्ञान वाढीस लागले.
देव भेटला नाही तरी चालतो पण सद्गुरू भेटलाच पाहिजे. सद्गुरु शिष्याच्या अंतरंगातील जाणवा प्रेरित करतात. फक्त सद्गुरु आणि आई निरपेक्ष प्रेम करतात. बाकी सगळे मतलबाचे धनी असतात.
तुकाराम महाराज म्हणतात,
मायबाप बंधू भगिनी, दारिद्र्यात नसते कोणी,
जन हे सुखाचे,दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कुणी,
झाल्या हीन शक्ती,नाक डोळे गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे,
बाईल म्हणे खरे, मरता तरी बरे, नासले हे घर थुंकोनिया
तुका म्हणे माझे नव्हतेच कोणी.
दुपारी दीड वाजता ओंकारेश्वरला पोहोचलो. हॉटेल ‘टेम्पल व्ह्यू’ मध्ये मुक्काम होता. हॉटेलमधून ओंकारेश्वर देवळाचे, मांधाता पर्वताचे नयनरम्य दर्शन होत होते.
नावगाखेडी इथे दोन आश्रम आहेत. नर्मदा ही अवधूतांची माता आहे. ज्यांना लांबचे दिसते त्यांना अवधूत म्हणावे.भोजनानंतर सर्वप्रथम बडवाह येथे उत्तर तटावर स्थित धूनीवाले बाबांच्या (केशवानंद) आश्रमात गेलो. इंदोर जवळ सायखेडा गावचे केशवानंद. बाबांना नमस्कार केला. इथे बडे दादाजी गुरू स्थानावर आहेत तर छोटे दादाजी हे शिष्य स्थानावर आहेत. महाराष्ट्रात जसे साईबाबा तसे मध्यप्रदेशात धुनीवाले बाबा. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मंदीर परिसरात बाबांच्या सामर्थ्याची साक्ष देणारे रेल्वे इंजिन आहे. त्या काळात ब्रिटिशांनी इंदोर ते बैतुल अशी नॅरोगेज रेल्वे सुरू केली. ती काय आहे हे पाहण्यासाठी बाबा आपल्या शिष्यांसह इंदोरला गेले आणि त्या रेल्वेमध्ये चढून बसले. ब्रिटिशांनी रागावून त्यांना खाली उतरायला लावले. तर चार दिवस ते इंजिन सुरूच झाले नाही असे म्हणतात. तेव्हा ब्रिटिशांनी त्यांची क्षमा मागितली व परत बोलवले. त्यावेळेला ते स्वतः न चढता त्यांनी आपल्या शिष्यांना बसवले व रेल्वे बैतुलला जेव्हा पोचली तेव्हा स्वतः स्वामीजी स्टेशन वरती हजर होते. त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती ब्रिटिशांना आली. या प्रसंगाची आठवण म्हणून ते इंजिन त्या आश्रमाच्या प्रवेशद्वारात जपून ठेवले आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ व नीटनेटका आहे.
मग येथून जवळच असणाऱ्या श्रीराम संस्थान येथे गेलो. नर्मदा किनाऱ्यावर खूप आश्रम आहेत. पैकी एक म्हणजे श्रीराम संस्थान.गोंदवलेकर महाराज नामाचे प्रचारक, धारक, प्रसारक होते. ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा मंत्र त्यांनी समस्तांना वाटला. फक्त सेवा हे या आश्रमाचे ब्रीद आहे. इंदोर मध्ये त्यांचे दोन शिष्य होते आनंद सागर आणि ब्रम्हानंद सागर. त्यांना महाराजांनी अखंड रामनामाचे चिंतन करायला सांगितले. तिथे अजूनही दिवसभरात 13 तास रामनामाचा अखंड जप सुरू आहे. इथे राम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंतराय, गोंदवलेकर महाराज, नर्मदामाता, विष्णूभगवान व लक्ष्मीमाता, गरुड आदींच्या तसबिरी किंवा पुतळे आहेत.श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई तसेच मारुतीराय यांच्या वज्रलेप केलेल्या गोंदवलेकर महाराजांनी घडवलेल्या अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत. अगदी अलीकडे तेथे श्रीराम महाराज संस्थानची व्यवस्था पाहत होते, त्यांचे अपघातात अचानक निधन झाले. त्यांची समाधी सुद्धा तेथे आहे.
श्री गजानन महाराज संस्थान ओंकारेश्वर
गजानन महाराज संस्थान म्हणजे निरपेक्ष सेवेचे चालते बोलते व्यासपीठ. मंदिरात श्री गजानन महाराजांचा संगमरवरी अर्धाकृती पुतळा आहे. अतिशय सुंदर आणि प्रसन्न. जणू महाराज आपलीच वाट बघत आहेत असे वाटते. शेजारी शिवलिंग आणि नंदी महोदय आहेत. एका बाजूला श्री नर्मदा मातेची मनोहारी देखणी मूर्ती आहे. सर्व ठिकाणी मस्तक टेकविण्यासाठी छान चांदीच्या पादुका आहेत. गजानन महाराजांचा फोटो देखील आहे. मंदिरात सेवेकरी आहेत. पायी परिक्रमा करणाऱ्या मंडळींना मुक्कामाची आणि भोजनाची मोफत सोय आहे. भाविक भक्तजनांसाठी उत्तम निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहेत. छान दर्शन घडले.
श्री गजानन महाराज यांची नर्मदापात्रात बुडणारी नौका श्री नर्मदा मातेने वाचवली असा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात करण्यात आलेला आहे. ही घटना बडवाह जवळ नावघाट खेडी येथे घडली असं सांगितलं जातं. नर्मदा ही ओंकार कोळ्याची कन्यका असल्याचा उल्लेख गजानन विजय ग्रंथात करण्यात आलेला आहे.
ओंकारेश्वर येथील देवदर्शन आणि संकल्प पूजा
आज भल्या पहाटे उठलो. संकल्प पूजा करण्या आधी देवदर्शन घेतले. हॉटेलवरून छोटया गाडीने निघालो. झुलापुला पर्यंत गाड्या गेल्या. देवदर्शन करताना पायी फार चालावं लागलं नाही. प्रथम ओंकारेश्वर शिवलिंग दर्शनासाठी नर्मदेवरील झुलापुलावरून पायी मजल दर मजल करत गेलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या ओंकारेश्वर व ममलेश्वर या दोन्ही शिवलिंगांचे नर्मदाजल अर्पण करून सकाळी सकाळी छान दर्शन घडले. तिथेच आरती केली. आज गर्दी नव्हती. त्यामुळे ओंकारेश्वर मंदिरात दोनदा जाऊन दर्शन घेतले.
आद्यगुरू शंकराचार्य यांची गुफा देखील पाहिली. आद्यगुरू शंकराचार्य आणि त्यांचे सद्गुरु गोविंदपादस्वामी यांची ओंकारेश्वर येथे भेट झाली होती. गोविंदाचार्यांच्या साधनेत अडथळा आणणाऱ्या नर्मदेला शंकराचार्यांनी ओंजळीत धारण केले होते असे म्हणतात. ती जागा पण तिथे आहे. शंकराचार्यांनी तिथेच नर्मदाष्टक लिहिले. परिक्रमा उचलण्यापूर्वी मनासारखी दर्शने झाल्याने सर्वांना समाधान वाटले.
आणि मग छोट्या गाड्यांमध्ये बसून दक्षिण तटावर नागर घाटावर आलो. संत कमल किशोर नागर (मालवा) यांनी तो घाट विकसित केला आहे. समोर निर्मळ नर्मदा यथेच्छ दुथडी भरून वहात होती. सर्वांनी सहजी मनमुराद स्नान केले. पहिल्या दिवशी मनसोक्त स्नान झालं त्यामूळे सर्वांनाच समाधान वाटल. नदीमध्ये मांधाता बेट आहे ज्याचा आकार ओम सारखा आहे. बोटीने या दीपाची परिक्रमा करतात.
तोपर्यंत यशोधनच्या मुलांनी संकल्प पूजेची जय्यत तयारी केली होती. टेबल,खुर्च्या,तांब्याची चकचकीत पूजा भांडी ,सभोवती फुलांची रांगोळी, प्रत्येकाच्या हाताला अत्तर, स्त्रियांना नथ, गजरा, सर्वांच्या गळ्यात शुभ्र उपरणे, त्यावर पुष्पहार ,पुरुषांना गांधीटोपी, भिकबाळी ! हळद, कुंकू, गुलाल, अबीर, फुले, दही, दूध, तूप, मध, साखर, अक्षता, उदबत्ती, आरती अशी अगदी निगुतीने मांडणी होती. सर्वांना कपाळाला गंध लावले. एकूणच वातावरण निर्मिती झकास.
टेबलखुर्च्यांवर आरामात बसून पूजा सूरू झाली. अगदी समोर जगदानंदी नर्मदेचे पात्र. उत्तर तटावरचं सहज दिसणारं ओंकारेश्वराचं राऊळ.गुरुजींचे समजावून सांगणे. साक्षीला समोर मांधाता पर्वतावरची शंकराचार्यांची देखणी मूर्ती, सकाळची प्रसन्न वेळ. जणू काही सगळे शुभयोग सहज जुळून आले होते. संकल्प पूजा उत्तरोत्तर रंगत गेली. आरती, नर्मदाष्टक झाले. प्रसाद आणला. सर्वांना दिला.
प्रकाशदादांनी आमचे पूजेच्या शोभायमान पेहरावात भरपूर फोटो काढले. अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर पूजा झाल्याकारणाने सगळेच आकंठ समाधानात बुडालेले. परिक्रमा उचलली. आता आपण सर्वजण परिक्रमावासी झालो आहोत. आता थेट श्रीनर्मदेशी अनुसंधान करावयाचे आहे. नर्मदे हर!
भोजनोत्तर ‘अपराजित योद्धा बाजीराव’ यांच्या समाधीचे रावरखेड येथे दर्शन घेतले व नंतर लेपाला भारती ठाकूर यांच्या नर्मदालयाला गेलो.
तुफान गाड्यांमध्ये बसून रावरखेडला पोचलो. खेडी गावातील कुरंग नदी ओलांडून रावेर गावात जावे लागते. इथली नर्मदा विशालकाय आहे. पात्रामध्ये मोठ बेट देखील आहे. बाजीराव पेशव्यांच्या समाधीला आदराने नमस्कार केला. नर्मदा किनारी असलेल्या या समाधीस्थानाची अवस्था मात्र दुर्लक्षित आहे हे पाहून खूप वाईट वाटले. समाधीस्थानावर “ना चिरा ना पणती”! ही समाधी त्यावेळी ग्वाल्हेर येथील महादजी शिंदे यांनी बांधून घेतलेली आहे. शिवस्वरूप समाधी आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा जरीपटका फडकवणारा, शिवाजी महाराजांच्या डोळ्यातील स्वप्न साकार करणारा हा योद्धा दुर्लक्षित आहे हे खरोखरच आपले दुर्दैव आहे. निळा अबलख गंगा आणि सारंगा हे बाजीराव पेशवे यांचे आवडीचे अश्व होते. ते स्वतः त्यांची काळजी घेत. रात्र ही झोपण्यासाठी नसून शत्रूच्या घातासाठी असते असे त्यांना वाटे. पुण्यातील शनिवारवाड्याचे सात मजली बांधकाम त्यांनी केले होते. भल्या पहाटे स्नान करून पेशवे पहिल्यांदा पहिल्या मजल्यावर जाऊन दूरवर दिसणाऱ्या आळंदीतील माऊलींच्या समाधीच्या कळसाचे दर्शन घेत. मगच अन्नग्रहण करत. ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण विचारपुत्र आहोत असे म्हणवत असत. जर मध्यभारतात मराठ्यांना बुड टेकायला जागा नाही,तर मग कशाच्या आधारावर दिल्ली जिंकायची? दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला जावा यासाठी त्यांनी मध्य आणि उत्तर हिंदुस्तानात संस्थानांची स्थापना केली. इंदोर, ग्वाल्हेर, धार आणि बडोदा. दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ही व्यूहरचना केली होती. त्यांनी आणि त्यांचे बंधू चिमाजी यांनी संपूर्ण कोकणपट्टी फिरंग्यांच्या तावडीतून मुक्त केली होती. प्रचंड वेगवान हालचाली, अखंड सावधानता आणि उद्योगशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नासरजंग बरोबरची लढाई जिंकल्यानंतर ते मार्गक्रमण करत नर्मदा किनारी आले असताना उष्माघाताने त्यांच्यावर घाला घातला आणि लाख राहिले…. लाखाचा पोशिंदा गेला.
१८ ऑगस्ट १७०० श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा जन्मदिन.आजपासून बरोबर ३२५ वर्षांपूर्वी कोकणात १८/८/१७०० रोजी सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावातील बर्वे वाड्यातील बाळाजी विश्वनाथ भट व राधाबाई यांचे पोटी बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला. त्यांचे लहान बंधू म्हणजे वसईचा रणसंग्राम गाजविणारे चिमाजी आप्पा. ते अपराजित योद्धे होते. पराभव कधी पाहिलाच नाही.
प्रथम पत्नी काशीबाई पासून रघुनाथ, जनार्दन, रामचंद्र व बाळाजी ही चारपुत्र रत्ने बाजीराव पेशव्यांना झाली. द्वितीय पत्नी मस्तानी पासून समशेर हा मुलगा झाला. या समशेरनं पानिपतच्या युद्धात अतुलनीय कामगिरी बजावली. उमद्या मनाच्या शूरवीर बाजीरावांबद्दल कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीचे वारस दस्तुरखुद्द शाहू महाराज म्हणत,बाजीराव म्हणजे,’रणात वीर, दरबारात धीर गंभीर आणि लेखणीत संयमशील तीर’. एका बाजूला लाखभर सैन्य व दुसऱ्याबाजूला एकटा बाजीराव उभे केले तर मी त्यातून बाजीरावाची निवड करेन.
लाखांचा पोशिंदा त्या शूरवीराचं नाव बाजीराव. लाखभर सैन्याची ताकद ज्यांच्या ठायी एकवटली असा हिकमती महापराक्रमी दिग्विजयी मराठा योद्धा म्हणजे बाजीराव. दिल्लीच्या तख्ताला हस्तगत करायचं असेल तर मध्य व उत्तर हिंदुस्थानात मराठयांचा दबदबा असला पाहिजे असा लांबचा विचार करून श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बडोदा,इंदोर,धार, ग्वाल्हेर अशा संस्थानांची निर्मिती केली. त्यामुळे दिल्ली मराठयांच्या टप्प्यात आली. दिल्लीवर भगवा फडकला. अवघ्या हिंदुस्थानात मराठ्यांच्या साम्राज्याचा दबदबा निर्माण करणाऱ्या या अजेयवीरास मानाचा मुजरा. त्यांच्या समाधीचे दर्शन घेत असताना परिक्रमा एका ऐतिहासिक वळणावरती येते आणि ऊर अभिमानाने भरून येतो.
पुढचा प्रवास लेपाच्या दिशेने होता. वाटेत गहू आणि हरभरा यांची हिरवीगार शेती दृष्टीस पडत होती. तिथे प्रत्यक्ष भारतीताईं ठाकूर यांचे दर्शन झाले आणि त्यांनी सर्वांशी छान सुसंवाद साधला त्यांच्याबरोबर फोटो काढून घेण्याचा पण योग आला. त्यांचे वंचित मुलांच्या जीवनात ज्ञानदीप लावण्याचे कार्य महान आहे. नर्मदा किनाऱ्यावरील त्यांची नर्मदालय संस्था म्हणजे एक आधुनिक तीर्थक्षेत्र आहे असे प्रकाशदादा सांगत होते ते सार्थ वाटले. आजचा मुक्काम बडवाणी येथे जलसा हॉटेलमध्ये होता.
विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेलं बडवाणी हे मध्यप्रदेशातील जिल्ह्याचे ठिकाण आहे. ऐतिहासिक दृष्ट्या मेवाडच्या सिसोदिया घराण्याची ते संबंधित आहे. बडवाणीची वांगी चवदार म्हणून प्रसिद्ध आहेत. तुकतुकीत कांती, गरगरीत आकार ,हिरवा देठ, देठा भोवती काट्याचं कुंपण, जांभळा हिरवट रंग आणि भाजी तरी इतकी चविष्ट की तोंडात टाकली की विरघळावी. त्याचबरोबर इकडे ज्वाला नावाची हिरव्या रंगाची जाडजूड अशी तजेलदार मिरची सुद्धा मिळते. इथल्या पपया सुद्धा प्रसिद्ध आहेत.
सकाळी साडेसहाच्या सुमारास राजघाटाकडे निघालो. महात्मा गांधीजींची रक्षा या पात्रात विसर्जित केली होती म्हणून त्याला राजघाट असे म्हणतात. परिक्रमेच्या मार्गावरील हे एक सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे.
सरदार सरोवर धरण निर्मितीच्या वेळी इथला बराच भाग पाण्याखाली गेलेला आहे. त्याच्या संदर्भात प्रकाशदादांनी मेधाताई पाटकर यांच्या काही आठवणी सांगितल्या. सरदार सरोवर धरणाच्या वेळी विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे यासाठी मेधाताईंनी अपार प्रयत्न केले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या सीमेवरती असलेल्या या धरणासाठी तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना दाद दिली नाही. त्या वेळेला त्यांनी नवी दिल्ली येथे युनेस्को मध्ये आपली कैफियत मांडली. मग त्यांच्या विनंतीचा विचार सरकारला करावाच लागला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटून त्यांनी या धरणामुळे इथल्या लोकांचे जगणे कसे पाण्यात जाणार आहे हे लक्षात आणून दिले. तेव्हा 1967 मध्ये पुनर्वसनाचा कायदा झाला. परंतु सुप्रसिद्ध अर्थतज्ञ वि. म. दांडेकर म्हणत की, ‘काहींना घडवायचे असेल तर काहींना बुडवले पाहिजे’ हा सिद्धांत आहे. त्यानुसार मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी जी एक धरणांची शृंखला त्यावेळी तयार झाली त्यामुळे मराठवाडा जरी घडला तरी पुण्याचा डोंगरी भाग म्हणजे भोर ,वेल्हे, मावळ, मुळशी हे तालुके बुडले असे म्हणतात. तीच परिस्थिती नर्मदेच्या किनारी झाली. म्हणून एका लोकगीतात एक स्त्री म्हणते,’ बाई मी धरण बांधते, बाई मी मरण कांडते.’
पंडित नेहरू पंतप्रधान असताना सुरू झालेल्या या धरणाचे काम मोदींच्या कालावधीमध्ये पूर्ण झालेले आहे. विस्थापितांच्या अडचणीचे भान सरकारला मेधाताईंनी आणून दिले, त्यावेळेला बाबा आमटे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे नर्मदा किनारी लोकांच्या देवघरामध्ये मेधाताईंचा फोटो आहे असे लक्षात येते. ते लोक मेधाताईना नर्मदेचे प्रतिरूपच मानतात आणि आज या काठावरती त्यांचे स्मरण करणे ही एक मानसिक परिक्रमा आहे असे प्रकाशदादांनी सांगितले.
इथेच टेंबे स्वामींनी चातुर्मास करून एकमुखी दत्तप्रभूंची स्थापना केली होती. संन्यासी लोकांचा चातुर्मास दोन महिन्याचा असतो. आषाढी एकादशीला सुरू होतो आणि भाद्रपद महिन्यात पितृपक्ष सुरू होतो तेव्हा संपतो. असेच दत्त मंदिर त्यांनी उत्तर तटावर चिखलदा इथे पण बांधले होते. पण तेही धरणाच्या पाण्याखाली गेलेले आहे. सरदार सरोवर धरणात पाणी अडवताना इथला काही परिसर आणि दत्तमंदिर पाण्याखाली गेलेले आहे. उन्हाळ्यात नदीचे पाणी आटते तेव्हा म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मंदिरात जाऊन दर्शन घेता येते असे सांगण्यात आले. बडवाणी येथे नर्मदा पात्र सोडून बाहेर आलेली आहे. इथे स्नान झाले, आरती झाली आणि कणकेचे दिवे लावून नदीला औक्षण केले. कार्तिकी एकादशी होती त्यामुळे फराळ करून राजपीपलाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
प्रकाशदादा सांगत होते,नर्मदा सहा हजार पाचशे कोटी वर्षांपूर्वीची प्राचीन नदी आहे याला वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत. ती सर्वात वेगवान नदी आहे. तिच्या पात्रात तीन प्रकारचे कंकर सापडतात. जे लाल असतात त्यांना गणपती समजतात.जे करड्या रंगाचे असतात त्यांना कार्तिकस्वामी म्हणतात. आणि जे काळे असतात ते शिवलिंग असतात. या लिंगाना बाण असे म्हणतात. ते स्वयंभू असल्यामुळे त्यांच्या पूजेसाठी प्रतिष्ठापना करण्याची गरज नसते. नर्मदा ही शिवाची मानसकन्या आहे. अविनाशी पित्याची अविनाशी कन्या आहे. तिने तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले व तुम्ही माझ्यामध्ये या असे वरदान मागितले. त्यामुळे नर्मदेच्या पात्रात असणारे सर्व काळे कंकर शिवस्वरूप मानले जातात. शिव ही विलयाची देवता आहे. नर्मदेचे नाव त्याच्याबरोबर जोडले गेले. नर्मदे हर. हर म्हणजे शिव. शिव तिच्या बाबांच्या रूपात असल्यामुळे तिला अधिकार प्राप्त झाला आहे. अगदी कार्तिकस्वामी आणि गणपतीच्या बरोबर सुद्धा शिवाचे नाव घेतले जात नाही. ते भाग्य नर्मदेला लाभले आहे.
जे भयग्रस्त होऊन तिच्यापाशी जातात, तिच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत, त्यांचा ती रवा करते, म्हणजे त्यांना चूर्ण करून टाकते, म्हणून ती रेवा. रेवा याचा दुसरा अर्थ प्रवाहीपण असाही होतो. जे तिला समर्पित होतात त्यांना ती गरागरा फिरवते आणि त्यांचे शिवलिंगातच रूपांतर करते अशी मान्यता आहे. पण काही लोकांच्यावरती कोणत्याच गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही असे सुद्धा नर्मदेतले गोटे असतातच. म्हणूनच निर्बुद्ध लोकांना नर्मदेतला गोटा असे संबोधले जाते. ती मेकल पर्वतातून उगम पावते म्हणून तिला मेकलकन्या सुद्धा म्हणतात. नर्म दा. नर्म म्हणजे आनंद सौख्य देणारी म्हणून नर्मदा.नर्मदे हर !
बडवाणी सोडल्यानंतर खारेबादल हे मध्यप्रदेशमधील शेवटचे गाव लागते. तिथून पुढे नर्मदा महाराष्ट्रात प्रवेश करते. भादल नावाचे छोटेसे गाव आहे. विंध्याचल आणि सातपुडा या दोन्हीही पर्वतरांगांच्या मधून नर्मदा इथे वाहते. हे दोन्हीही डोंगर म्हणजे नर्मदेचे भाऊ मानले जातात की जे तिच्यावरती करडी नजर ठेवून असतात. महाराष्ट्रामध्ये नर्मदेला त्यामुळे काठच नाही आणि पाणी पण खूप खोल आहे. पाण्याला जास्ती उतारही आहे आणि मगरींचा तिथे फार सुळसुळाट आहे. मात्र परिक्रमा करणाऱ्या लोकांना त्यामुळे डोंगरावरूनच, शूलपाणीच्या जंगलातून जावे लागते. महाराष्ट्रात नर्मदा शूलपाणीच्या जंगलातूनच जाते. सरदार सरोवर धरणामुळे शूलपाणी मंदिराबरोबर इथली इतर मंदिरे कायमस्वरूपीच पाण्यामध्ये गेलेली आहेत. शहादा हे गाव जमिनीवरचे आहे,धडगाव नंदुरबार तालुक्यातील गाव उंचावर आहे. महाराष्ट्रात त्यामुळे नर्मदेचे दर्शन घेणे अवघड असते. मोठ्या वाहनांनी तर जाणे शक्यच नसते. तिला कुठेही काठच नाही. त्यामुळे आपल्याला शहादा मार्गे प्रकाशा या गावाच्याकडे वळावे लागते.
पुष्पदंतेश्वर शिवालय
एकदा पृथ्वीवर काशी नगरीची उभारणी करण्याचे स्वर्गलोकात ठरले होते. त्यासाठी जागा निवडताना जिथे दोन पेक्षा जास्त नद्यांचा संगम असेल व तिथे स्मशान असेल अशी जागा निवडण्यात आली. सहा महिन्यांच्या रात्रीतच ते बांधकाम पूर्ण करायचे ठरले होते. प्रकाशा येथे तापी, पुलिंदा आणि गोमयी नदीचा संगम आहे, ती जागा निश्चित केली.
त्यानुसार सहा महिन्यांच्या रात्रीत हे निर्माणकार्य पूर्ण करण्यासाठी स्वर्गातून यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आदी कलावंत आले होते. पैकी एक गंधर्व रोज पुष्प अर्पण करून शिवपूजा करून मग निर्माणकार्य करत असे. एके दिवशी पूजेत एक फूल कमी पडले म्हणून त्या गंधर्वांने पुष्प म्हणून आपला दंतच उपटून अर्पण केला. शिव प्रसन्न झाले व त्यास शिवमहीमन् लिहिण्याचा आशीर्वाद दिला. निर्माण कार्य चालू असतानाच रात्र सरली व दिवस उजाडला.प्रकाश पडला म्हणून या गावास प्रकाशा हे नाव पडले. प्रकाशा येथील काशी विश्वनाथ मंदिराचा चौथरा अर्धवट अवस्थेत राहिला अशी त्याची अख्यायिका आहे. तो तिथे पाहता येतो.
पुष्पदंत नावाचा गंधर्व प्रतिदिन एका राजाच्या बागेतून फुले चोरून नेत होता. राजाला चोराचा पत्ता लागत नव्हता म्हणून त्याला वाटले कि कोणीतरी गुप्त शक्ती असणारा चोर असावा. तो राजा हा शिवभक्त होता. चोराची शक्ती नाश पावावी म्हणून राजाने बागेमध्ये शिवनिर्माल्य टाकल. तेव्हा त्या निर्माल्याचे उल्लंघन झाल्याने पुष्पदंतची शक्ति नाश पावली. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने शंकराच्या कृपेकरिता शिवमहीमन् हे स्तोत्र रचले. या कथेचा श्लोक ३७ मध्ये उल्लेख आहे.
संगमावर संगमेश्र्वर महादेवाचे प्राचीन शिवालय आहे.प्रकाशा क्षेत्रास दक्षिण काशी असं म्हणतात. प्रकाशा येथील पुष्पदंतेश्र्वर मंदिरातील जानवे असणारे शिवलिंग आहे. येथेच शिवमहीमन् स्फुरले. जे ममलेश्र्वर मंदिरातील दगडी भिंतींवर ते कोरले आहे.
तापी मातेची मुर्ती
प्रकाशा येथील केदारेश्र्वर मंदिरात स्थापित करण्यात आलेली आहे. खरं तर तापी ही नदी आहे. मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात मुलताई नावाच्या गावात तिचा उगम झाला आहे. मात्र ती सर्वाधिक महाराष्ट्रात वाहते आहे. पुढं ती सुरतजवळ अरब समुद्रात विलीन झाली आहे. ७२४ किलोमिटर एवढी तिची लांबी आहे.पूर्णा, गिरणा,वाघूर या तिच्या उपनद्या आहेत. पोथ्या पुराणात तापी नदीचा उल्लेख सापडतो. तापी नदीमुळे महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिमभाग धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना खूप फायदा झाला आहे. खानदेशातील केळी, ऊस, हरभरा, वांगी आदी नगदी पिके तापी नदीच्या पाण्यावर तर पोसली जातात. तापी नदीमुळे खानदेश समृध्द झाला आहे हे बाकी खरं आहे. तापी पूर्वे कडून पश्चिमेकडे वाहते. भुसावळ, वरणगावच्या पुढं तापी नदीवर हातनुर येथे बहुत महत्वाकांक्षी धरण बांधण्यात आलेले आहे. आपल्या धर्मात नदीस देवत्व बहाल करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे असेल, प्रकाशा येथील केदारेश्र्वर राऊळात वरील प्रमाणे तापी नदीची प्रतीकात्मक मुर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. तापी ही सूर्य कन्या आहे.
प्रकाशा धरण
पुष्पदंतेश्वर मंदिर परिसरात प्रकाशा नावाचे धरण तापी, पुलिंदा आणि गोमई या तीन नद्यांच्या संगमावर बांधले आहे. तिथेच दगडू बाबांचा आश्रमही आहे. जिथे परिक्रमावासीयांची मोफत सेवा केली जाते.
प्रकाशा सगळं आदिवासी बहुल क्षेत्र आहे. सीमावर्ती भाग असल्याने मराठीवर हिंदी व हिंदीवर मराठीची छाप दिसते. गुजराती लहेजा देखील जाणवतो. या सर्वांच्या मधून जी नवी भाषा तयार झाली आहे तिला अहिराणी असं म्हणतात. लोकांचं राहणीमान वागणं बोलणं पोशाख या सर्वांवर या बदलांचा पडलेला प्रभाव जाणवतो. आदिवासी पावरा अर्थात लमाण समाजाचे इथे प्राबल्य आहे. अर्थात हे स्वाभाविक आहे.
मध्यप्रदेशातील वनविभागाच्या मालकीच्या रस्त्याने हा प्रवास होतो. निर्मनुष्य गुळगुळीत आणि काळ्या कुळकुळीत छान अशा रस्त्याने बऱ्यापैकी जंगलातून प्रवास. पळसूद पानसेमल, खेतीया अशी गावं लागतात. गहू हरभरा व केळीच्या बागा बऱ्याच ठिकाणी दिसतात.
बसच्या प्रवासात प्रकाशदादा खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व संयुक्त महाराष्ट्र याबद्दल विस्तृत बोलले. त्यानिमित्ताने बहिणाबाई चौधरी या महान कवियत्रीचे व संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्व योगदानकर्त्यांचे स्मरण झाले. ते म्हणाले,त्यांचं स्मरण करणे ही देखील परिक्रमाच आहे. प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, ना. ग.गोरे, एस.एम.जोशी,डॉ बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, उत्तमराव पाटील आदींचं संयुक्त महाराष्ट्राच्या साठीचं योगदान शब्दातीत आहे. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी देशाचे तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. १०५ हुतात्मे झाले. तेव्हा महाराष्ट्रराज्य निर्माण झाले आहे.
कितीएक अनामिकांच्या त्यागातून हा महाराष्ट्र अस्तित्वात आला आहे. आपल्या कातड्याचे जोडे करून त्यांना घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. याच काळात राष्ट्रसेवादलाचा जन्म झाला. या सांस्कृतिकदलाने निळू फुले, दादा कोंडके, वसंत बापट, वसंत सबनीस, शाहीर साबळे, शाहीर अमर शेख, शाहीर लीलाधर डाके असे एकापेक्षा एक असे नामवंत हिरे महाराष्ट्रास दिले. कुणी लेखक, तर कुणी शाहीर, तर कुणी कवी, तर कुणी फर्डे वक्ते, तर कुणी हाडाचे कलाकार. ते सर्वजण झटले म्हणून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.
पठ्ठे बापूरावनी दोन लाख लावण्या लिहिल्या. ते शीघ्रकवी होते. नाव श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी
जन्म ११/११/१८६८ मृत्यू २२/११/१९४१. जन्मगाव सांगली जिल्हा वाळवे तालुका हरणाक्षरे गावे.
१९३६ साली त्यांनी मुंबईचे वर्णन करणारी जी लावणी लिहिली ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विशेष गाजली.
तसेच शाहीर राम जोशी. शीघ्रकवी होते. त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करणे आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही वैचारिक परिक्रमा आहे.
बहीणाबाई चौधरी
खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांचं मराठी सारस्वतामधील योगदान अतुलनीय असं आहे.
जन्म - ११/०८/१८८० मृत्यू - ०३/१२/१९५१ जन्मगाव असोदे, जळगाव
आईचे नाव भिमाबाई. वडिलांचे नाव उखाजी महाजन. माहेरी श्रीमंती होती. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याबरोबर बहिणाबाईचं लग्न झालं. रेल्वेरुळाच्या पलीकडेच सासर. त्यांना तीन मुले झाली सोपानदेव, ओंकार आणि काशीबाई.
२९ व्या वर्षी वैधव्य आलं.पडकी विहीर आणि बोरी बाभळीची झाडे त्यांच्या वाटणीला आली. बहिणाबाईंची गाणी किंवा कविता म्हणजे खानदेशी मातीतील महाकाव्यच. स्वतः निरक्षर असूनही भल्याभल्यांना विचार करायला लावणारी बहिणाबाईंची कविता सरस आहे आणि देखणी देखील आहे. किंबहुना सरस आहे म्हणूनच देखणी आहे. मनस्वी आयुष्य त्या जगल्या. बर्यावाईट प्रसंगांना धीटपणाने सामोरे गेल्या.तक्रार केली नाही. मृदू क्षमाशील राहून सुखातलं सुख वाढवलं आणि आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर आपल्या अनुभवांच्या सारसर्वस्वाला त्यांनी शब्दरूप दिलं.
‘मतलबाचेसाठी मान माणूस डोलवी
इमानाचेसाठी कुत्रा शेपूट हालवी’
‘माझी माय सरसोती
मला शिकविते बोली
लेक बहिणाच्या मनी
किती गुपित पेरली.’
बहिणाबाईंच्या कवितांची तुलना जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांशी केली जाते. काम करत असताना त्या सतत गुणगुणायच्या. त्यांचे सुपुत्र सोपानदेव यांनी त्यांना समज आल्यानंतर ते सारं लिहून ठेवलं. ते लिहिलेले कागद ते कौलांच्या फटीमध्ये खोचून ठेवत. बहिणाबाईंच्या मृत्यूच्या माघारी घराची वाटणी झाली तेव्हा सोपानदेवनी ते आईचे कागद मागून घेतले. ते घेऊन ते प्र. के. अत्रेंच्याकडे गेले. ते वाचून अत्रे म्हणाले, हे तर मराठी सारस्वतातलं बावनकशी सोन आहे आणि त्यांनीच नंतर बहिणाबाईंच्या कविता प्रकाशित केल्या. मराठी साहित्याचे दालन समृद्ध झालं. त्या लिहितात,
‘जेव्हा इमान सचोटी, पापामधे रे बुडाले, तेव्हा याचं मानसान, किल्ल्या कुलूप घडवले.’
यावरून त्यांच्या असामान्य प्रतिभेची कल्पना येते.परवा नवी दिल्लीत संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाची सांगता नामवंत लेखिका तारा भवाळकर यांनी बहिणाबाईंच्या काव्य पंक्तीनी करावी हा बहिणाबाईंच्या काव्याचा गौरव आहे.
रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची सवय,
रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव.
आपणा सर्वांना याचा सार्थ अभिमान वाटतो. खानदेश कन्या बहिणाबाई यांचं समयोचित स्मरण ही देखील मानसीक परीक्रमाच आहे.
गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला या गावी मुक्कामी आलो. हॉटेल राम हील युनिटी.
राजपिपला ते अंकलेश्वर
एकादशीचा फराळ झाला. पहिला चहा सकाळी ७ वाजता,सकाळी ८ वाजता बालभोग झाला.
सकाळी ९ वाजता निघालो. गुवारच्या मय्या किनाऱ्यावर गुजरात मध्ये उत्तरवाहिनी नर्मदा पात्रात स्नान केले. हा तसा निर्जन किनारा आहे. निर्मळ पण वेगवान. आज नर्मदा पात्रात पाणी कमी होते. चैत्रात लोक आवर्जून उत्तरवाहिनी नर्मदेची पायी परिक्रमा करतात. ते आज बसच्या परिक्रमेत सहजी घडलं. उत्तरवाहिनी नर्मदेत आज स्नान जाहले. इथली नर्मदा निवळ शंख. निर्मनुष्य.
रामानंद आश्रम
महात्मा रामानंद आसेतुहिमाचल फिरले. पण नर्मदा किनारा आवडला. असे म्हणतात साधना नर्मदाकाठावर तर मृत्यू गंगाकिनाऱ्यावर. काठावर दोन एकरात रामानंद आश्रम आहे.इथे अत्यंत सुंदर पद्मासनातले राम सीता आहेत. देखणा संकटमोचन हनुमंत आहे. नर्मदा व वैष्णोदेवीमाता आदी देवता विराजमान आहेत व मुख्य म्हणजे पाऱ्याचे अतिसुंदर शिवलिंग आहे. अष्टसात्विकभावाने अशक्य ते शक्य होते. परिसर रमणीय आहे. आज येथेच आरती केली. इथे परिक्रमावासी राहू शकतात.
तपोवन आश्रम
जवळच तपोवन आश्रम आहे. हसमुख साईबाबा व दत्त प्रभू तसेच हनुमंतराय आहेत. इथे स्वामी पूर्णानंद सरस्वती हे महात्मे आहेत. ते साईबाबा व दत्त भक्त आहेत. वय ८० च्या पुढे.
त्यांनी क्षेत्रसंन्यास घेतला आहे. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आश्रम सोडायचा नाही. त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली आहे. त्यांनी देहावर तुळशीपत्र ठेवले आहे. बाबा म्हटलं तर देहात आहे म्हटलं तर देहात नाहीत.आठ आठ दिवस अन्नग्रहण न करता नर्मदा जलावर राहतात. ही कठोर साधना ते करत आहेत. ते पूर्वी खिडकीतून दर्शन देत. म्हणून त्यांना ‘खिडकीतला बाबा’ असंही म्हणतात. महात्मा खूप मोठा आहे. या महात्म्यास एकदा एकाने प्रश्न विचारला होता. महाराज तुम्हाला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते,तुम्हाला भेटल्यानंतर त्याची पूर्तता होते का? यावर या महात्म्याने उत्तर दिले. आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर येतो तेवढेच आंबे येतात का?
नर्मदेच्या काठावर असे अनेक साधनामस्त अवलीये आहेत. या संत सज्जनांच्या सहवासात जीवाचा उद्धार होतो. आंब्याची खूप खूप झाडे आहेत. परिसर रम्य आहे. तुळस, कमळपुष्पे विपुल प्रमाणात आहेत.
शुलपाणेश्वर
मूळचं शूलपाणी मंदिर महाराष्ट्रात मनिबेली या गावात होतं. परंतु सरदार सरोवर धरणात पाणी साठविल्या नंतर हे मंदिर व शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.
आता मूळचे मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर गुजरातराज्यात गोरा कॉलनी याठिकाणी नवे शूलपाणी मंदिर बांधलं आहे. हे नवे मंदिरही अत्यंत आकर्षक व प्रशस्त आहे. इथे शिवलिंगास स्पर्श करून नर्मदा जलाचा अभिषेक करता येतो.
मूळचे मंदिर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील मनीबेली नामक गावात सरदार सरोवर धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर दूर होते. तेथे नर्मदा आणि देवगंगा या दोन नद्यांचा संगम होता. तेथे अक्कलकोट स्वामीसमर्थांनी चातुर्मास केल्याचा उल्लेख आहे.
भगवान शिवाने आपल्या जवळील त्रिशुलाने समस्त राक्षस गणांचा वध केला. त्रिशुलास लागलेले रक्त काही केल्या निघत नव्हते. भगवान शिव, शूलपाणीचे शिवलिंग असलेल्या निबीड अरण्यात आले.त्यांनी त्रिशूल जमिनीवर आपटले. त्यातून एक जलप्रपात निर्माण झाला. त्या पाण्याने त्रिशूलावरील रक्ताचे डाग धुतले गेले. शूल म्हणजे पिडा. नष्ट झाली. म्हणून शूलपाणेश्र्वर हे नाव रूढ झाले.
दुपारी भोजन घेऊन नीलकंठ धाम पोयचा अर्थात स्वामी नारायण मंदिर बघण्यासाठी गेलो.हे स्थान दक्षिण तटावर आहे.
हे गुजरातमध्ये, नर्मदा नदीच्या काठावर असलेले एक ठिकाण आहे, जे मुख्यत्वे नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे; हे एक मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, गुजरातच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा भाग आहे. स्वामीनारायण पंथाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे नीलकंठ धाम मंदिरामुळे ओळखले जाणारे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात महादेवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती असून मंदिराचा परिसर अत्यंत आकर्षक आहे. मंदिर इमारती भोवती गणेश, हनुमान, शिवलिंग स्थापन केलेली मंदिरे आहेत तसेच इतर अनेक छोटी मंदिरेही आहेत. महालाचा आभास होईल याप्रमाणे हे मंदिर बांधले गेले आहे. रात्री या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. रोज हत्तीवरून मिरवणूक असते. चारी वेद, बारा ज्योतिर्लिंगे, दशावतार, देवीचे अनेक अवतार अशी सुंदर सुंदर मंदिरे स्वामीनारायण मंदिराच्या सभोवताली आहेत. सर्व मूर्ती अतिशय देखण्या असून मध्येमध्ये शिवलिंगावर सतत अभिषेक करणारे कारंजे सुद्धा आहेत. मंदिर पाण्यावरील बेटासारखे आहे. इथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मंदिरात आत शिरताना पदपथावर कृष्ण लीला, स्वामीनारायण भगवान, गणेश, शंकर, हनुमान, गरुड यांची सुंदर शिल्पे आहेत.
चहापान करून नर्मदा किनारी भालोद येथे गेलो..
भालोद
भालोद येथे शरदचंद्र प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले श्रीदत्त मंदिर आहे. येथे नेपाळ मधील गंडकी नदीच्या पात्रात सापडणाऱ्या काळया पाषाणातील अतिशय देखणी अशी श्रीदत्त मूर्ती आहे. मूर्तीच्या छातीवर गोमुख आहे. समोर औदुंबर वृक्ष आहे. त्याच्या खोडातून उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा प्रकट झाले आहेत. भालोद हे दत्त स्थान गुजरात राज्यात राजपारडी गावाचे पुढे अगदी नर्मदा तटावर आहे.
१४०० शतका मधील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती, ज्याची विशेषता आहे की अंधारात पहा की उजेडात, पोटावर गोमुख दिसते. नर्मदा परिक्रमेमध्ये श्रीदत्तप्रभूंची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. जबलपूर, होशंगाबाद, गरुडेश्वर, राजघाट (चिखलदाच्या समोर) आणि भालोद. यातील दक्षिण किनाऱ्यावर राजघाट आणि भालोद हीच दोन दत्तमंदिरे आहेत. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष हाताने प्रस्थापित झालेले राजघाटचे दत्त मंदिर आहे. यानंतर जर दुसरं म्हणाल तर ते भालोदचे एकमुखी दत्त मंदिर हे आहे. राजघाट येथिल श्रीदत्तमंदिर हे सुद्धा एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.
स्वामी महाराजांच्या चातुर्मास चिखलदा (म. प्र.) येथे असताना भक्तांच्या आग्रहाखातर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राजघाटच्या मंदिराचे कार्य झाले आहे. योगायोगचं असेल कदाचित! महाराजांच्या स्वप्न दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा, स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद येथे राहण्यासाठीचा आदेश मिळाला. याच दरम्यान बडोदा येथे काशिताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमुर्ती भालोद येथे अचानक आली आणि येथे दत्त मंदिर स्थापन झाले. काशिताई निरखे यांच्या आजोबांना रात्री दत्तप्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मी नर्मदेच्या पाण्यात आहे, मला तू घेऊन जा, असे स्वप्नामध्ये सांगितले. त्याप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती शोधत आली आणि बडोदा येथे त्यांचे मंदिर देखिल बनले. आजोबांनंतर त्यांचा मुलगा आणि मग नातीकडे (काशीकडे) मंदिराचा कारभार आला. त्यांनी ८५ पर्यंत वयाची मजल गाठली. पुढे कार्य होत नव्हते, काय करावे ते कळत नव्हते. पण शेवटी भक्तांची काळजी देवालाच असते ना ! त्यांना रात्री स्वप्न पडले आणि श्रीदत्तप्रभूंनी आदेश दिला कि उद्या नर्मदा किनाऱ्यावरून जो गृहस्थ येईल त्याला तू मला देऊन टाक. अगदी तसेच घडले. पू. प्रतापे महाराज मंदिरात पोहोचले आणि दत्तप्रभू भालोदला आले. नर्मदा किनाऱ्यावरील भालोद येथील ही मूर्ती एकमुखी आणि शाळीग्रामाची आहे. वक्षस्थळावर गोमुख स्पष्टपणे दिसते ! निरखून बघितल्यावर योगाचे षट्चक्षु पण लक्षात येतात!
मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे, आश्रमासमोर नर्मदचे विशाल पात्र, सुंदर स्वच्छ पाणी, मोरांचा सदैव आश्रमातला वावर, मनाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही! भालोद या ठिकाणी कन्यापूजन हा विधी केला जातो. तसेच नर्मदामातेची ओटी भरली जाते. येथे हमखास नर्मदा परिक्रमार्थी भेटतात. त्यांचेसाठी सदावर्त आणि राहण्याची व्यवस्था येथे आहे. याठिकाणी श्रीसत्यदत्तपूजा आणि दत्तयाग हे विधी करता येतात. श्रीगुरूचरित्राच्या पारायणासाठी राहता येते. येथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून होडीने श्रीक्षेत्र नारेश्वराला जाता येते. खरे तर हे मंदिर आमच्या नर्मदा परिक्रमेच्या कार्यक्रमात नव्हते तरी सुद्धा प्रकाशदादांनी वेळेत बसवून आम्हाला या सुंदर मंदिराचे दर्शन घडवले त्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
अंतिम टप्प्यात अंकलेश्वरच्या दिशेने निघालो. अंकलेश्वर हे गुजरात राज्यातील एक मोठे शहर आहे.या शहरामध्ये सिल्वर लिफ हॉटेलमध्ये वास्तव्य. उद्या दुपारी समुद्र प्रवास आहे.
मुक्काम अंकलेश्वर येथे होता. आपण विमलेश्वर गावात आलो. इथं याच नावाचं शिवलिंग आहे. जवळच रत्नेश्वर महादेव आहे.
इथे विमलेश्वर शिवलिंगाच्या आत नर्मदा जल आहे. ते तीर्थ म्हणून दिलं जातं. मंदिर आणि परिसर मोठा आहे. समुद्र प्रवास करण्यासाठी इथे यावच लागतं. विमलेश्र्वर हे एक गाव आहे. गावात दुधाचा व्यवसाय केला जातो. लोक शेतीही करतात. परिक्रमावासीयांना समुद्र प्रवास करण्याच्या निमित्तानं या गावात यावेच लागते. गावकरी आणि प्रशासन यथाशक्ती, यथामती आलेल्या भाविक भक्ताजनांची अहर्निश म्हणजे ऑक्टोबर ते जुन एवढ्या प्रचंड मोठ्या कालखंडात सेवा करतात. हे एक असिधारा व्रत आहे. गाव आणि गावचे गावकरी दोन्हीही धन्य आहेत. इथे अन्नक्षेत्र आहे.
पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना इथे भोजन प्रसाद दिला जातो. निवासाची सोय देखील केली जाते. देव दर्शन घेऊन छोट्या गाड्यांमध्ये बसून खाडीच्या किनाऱ्यावर आलो.
नर्मदा मैयाला भेटायला समुद्र महाराज 21 किलोमीटर पुढे आले आहेत. जिथे नर्मदा समुद्रात विलीन होते त्याला खंबातचे आखात म्हणतात. तिथले मोती प्रसिद्ध आहेत. विमलेश्वर येथून पाच किलोमीटर अंतरावरील खाडीपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता बांधला आहे. त्या रस्त्याने छोट्या हलक्या कारने जाता येतं. कारमधून उतरलो की समोर नवा लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. त्यावरून जाताना पायाला चिखल, माती, धूळ लागत नाही. पूल संपला की आपण बोटीत जाऊन बसतो. श्री नर्मदा मय्या व समुद्र महाराज यांच्या कृपेने 100 व्या श्री नर्मदा परिक्रमेचा समुद्र प्रवास आज दुपारी दिड ते चार ते या दरम्यान संपन्न झाला.
मोठी बोट मिळाली होती. तिचा वेग जास्त होता. 42 परिक्रमावासियांना घेऊन बोट निघाली. हा एक सुखदायी अनुभव आहे. समुद्र प्रवासात भय वाटलं नाही. दोन तासात समुद्र प्रवास पूर्ण झाला. छोटया बोटीने एरवी किमान तीन तास लागतात. समुद्र प्रवास आता सुरवातीपासून शेवटापर्यंत खूपच सोयीचा आणि सुखकर झाला आहे. इथे बांबूच्या शिडीवरून बोटीत जावं लागायचं. आता मात्र लोखंडी शिड्या बसवून सर्वांची सोय करण्यात आली आहे. बोटीत बसणं त्यामुळं आता एकदम सोपं झालं आहे.
सुरक्षिततेसाठी प्रत्येकाला लाईफ जॅकेट दिले जाते. बोटीतून उतरताना चढताना प्रत्येकाची काळजी घेतली जाते. भरतीचं पाणी बघता बघता वाढलं. सर्वजण बोटीत बसलो.आणि बोट सुरू झाली.लिंबू सरबत दिले गेले. रोज दुपारी ताज्या लिंबांचा रस काढून सरबत देत होते. ते संजीवनी सारखे काम करत होते. त्यामुळे उत्साह टिकून राहण्यास मदत होत होती. सगळे मजेत, गाणे गात प्रवास सुरू होता. सकाळी सर्वांना समुद्र देवाची मानसपूजा करायला सांगितली होती. ती समुद्र देवापर्यंत नक्कीच पोहोचली होती. समुद्र महाराज शांत होते कारण हवा संथ गतीने वाहत होती. त्यामुळे बोट सरसर पुढे सरकत गेली.
उत्तर तटावरून नर्मदा जिथं सागरास येऊन मिळाली तिथं नावाड्यानं जल परिवर्तन केलं.
आता आपल्याकडे सागर महाराज पाहुणे आले आहेत. नावाड्यास यथोचित दक्षिणा देऊन सन्मानित केलं गेलं. बघता बघता उत्तरतट दिसू लागला. उतरताना सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या असणारा धक्का बांधला आहे. त्यामुळं बोटीतून उतरणं अगदी सहज सोपं झालं आहे. बस जवळ गेलो. बस मिठी तलाई येथे गेली. इथे गोड्या पाण्याची विहीर आहे. हातपाय धुणे झालं. नर्मदेचा उगम मध्य प्रदेशात अमरकंटक येथे झालेला आहे. नर्मदा गुजरात मध्ये भरूचच्या पुढे 40 कि.मी. वर मिठीतलाई येथे अरबी समुद्राला मिळते. मार्कंडेय ऋषीनी परिक्रमा करताना त्यांचा कमंडलू या विहिरीमध्ये बुडवला तेव्हा ते पाणी गोडं झाले असे म्हणतात. दंतकथा.
परिक्रमाा बघता बघता दक्षिणतटावरून उत्तरतटावर आली. मय्याकृपा अपार आहे.
मुक्काम दहेज. हॉटेल रिजेंटा.
दहेज ते नारेश्वर
उत्तर तटावरील परिक्रमेतील पहिला टप्पा
१०० व्या श्री नर्मदा परिक्रमेत काल समुद्र प्रवास झाला .समुद्र प्रवासानंतर उत्तर तटावरील श्री नर्मदा परिक्रमा प्रारंभ होते. उत्तरतट हा स्वमोक्षार्थ सांगितला आहे. आपल्यासाठी म्हणून काही एक मागण्याचा अधिकार या तटावर आपणास लाभला आहे. मग मागायचच असेल तर आपण असं काही मागू जे आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
आज सकाळी लवकर उठून सर्व आन्हिके पूर्ण करून आरती करून आणि बालभोग घेऊन भरूच कडे निघालो.
गुजरात राज्यातील भरूच शहराजवळ नर्मदा नदीच्या काठावर श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे, जे भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि शांततापूर्ण आध्यात्मिक स्थान आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान शंकराची १,००८ नावे (शिव सहस्रनाम) कोरलेली आहेत. या मंदिराच्या परिसरात हनुमानजींची एक मोठी आणि विस्तीर्ण मूर्ती असलेले आणखी एक मंदिर आहे.
प्रकाशदादांचा आजचा चिंतनाचा विषय होता..मोक्ष कुठं मिळतो? असं म्हणतात,मोक्ष नर्मदेच्या काठावर मिळतो. नर्मदा मोक्षदायिनी आहे.
मोक्ष कोणी पाहिला?
मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष! प्रापंचिक जीवनाची आसक्ती कमी होणे आणि ईश्वरभक्तीकडे आपण ओढले जाणं म्हणजे मोक्ष. आता अधिकार न दाखवता ‘असं का असं का’ असं न म्हणता ‘असू दे असू दे’ असं म्हणता येणं याचं नाव मोक्ष आहे. आपल्याच घरात पाहुणे म्हणून राहता येणं याचं नाव मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे केवळ जगापासून दूर जाणे नसून, जगात राहूनही जगाच्या आसक्तीतून मुक्त होणे. (जीवनमुक्ती) किंवा देहाचा त्याग केल्यानंतर मिळणारी अवस्था (विदेहमुक्ती) असू शकते.
हरेक विषयात मत न मांडता साक्षी भावानं वागता येणं याचं नाव मोक्ष आहे. स्वतःच्या आत डोकावत आपल्यातील त्रुटी लक्षात घेऊन इतरांशी समजूतदारपणाने वागता येणं याचं नाव मोक्ष आहे. प्रापंचिक जीवन मिथ्या वाटणं आणि ईश्वर सत्य वाटणं म्हणजे मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू होणे. सगळ्यात असणे पण कशातच नसणे म्हणजे मोक्ष.
आपले चार वेद,सहा शास्त्रे, अठरा पुराणे इत्यादी सर्व ग्रंथ आपण वाचले नाहीत तरी धर्मशास्त्राने मोक्षाचे मार्ग सांगितले आहेत ते समजून घ्यावेत.
मोक्ष तीन प्रकारे मिळवता येतो. पहिला प्रकार गंगाकाठी काशीत मृत्यू येणे. काशी ही शिवाची नगरी. इथे मृत्यू आला तर जीव शिवतत्वात विलीन होतो. शिव ही विलयाची देवता म्हणजेच मृत्यूची देवता आहे. मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. शंकराची पिंड म्हणजे पुरुष तत्त्व आहे. मृत्यूचे रहस्य शिवाने जाणले. माणूस जलातून जन्माला आला आणि मृत्यूनंतर जलातच सामावून जातो हे समजून घेणे म्हणजे मोक्ष. ‘ जायते यस्मात्च लोयते यास्मिन इति जल’ .गंगेच्या काठावर मोक्ष हवा तर मृत्यूची वाट पाहायला हवी. गंगाकिनाऱ्यावर मृत्य आला म्हणजे आपण शिवतत्वात विलीन झालो आणि पर्यायाने मोक्षाचे धनी झालो. यासाठी काशीनगरीत मृत्युची वाट बघत बसणं. पण काशीला जायचे तर पूर्ण विरक्त होऊन जावे. देह काशीत आणि मनाने घरी असे उपयोगी नाही.
यमुनेच्या काठावर मोक्ष मिळवणे हा दुसरा प्रकार.आणि यासाठी त्यांनी कृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचं समर्पक उदाहरण दिलं. यमुनेच्या काठावर मोक्ष मिळतो…..मात्र आपण सुदाम्याएवढे निरपेक्ष असायला हवे. काही मागायचंच नाही. राधेच्या भूमिकेत जगता येणं याचं नाव मोक्ष आहे. रा म्हणजे लाभो, धा म्हणजे मोक्ष. देवाकडे काहीच मागायचे नाही हे प्रपंचात फार अवघड असतं. मोक्षासाठी आतुर असणे म्हणजे राधेच्या भूमिकेत जगणं. म्हणजे आपण राधा आणि सुदाम यांच्या मनोवृत्तीत प्रवेश केला पाहिजे. हे दोन्ही मार्ग सोपे नाहीत याची आपल्याला कल्पना आहे.
त्यामुळे आपण मय्याकिनाऱ्यावर आलो आहोत. नर्मदेच्या केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. हा मार्ग सर्वांना सहज शक्य आहे. म्हणून नर्मदा परिक्रमा करायची. तिच्या सहवासात अधिकाधिक काळ घालवायचा.
मार्कंडेय पुराणात असे सांगितले आहे की, ‘सर्व तीर्थेषु यत् पुण्यं, सर्व यज्ञेषु यत् फलम, सर्ववेदेषु यत् ज्ञानम्, तत् सर्व नर्मदेतीरे.’ आपण पुण्यप्राप्तीसाठी यात्रा करतो. ज्ञानप्राप्तीसाठी वेदांचा अभ्यास करतो. फलप्राप्तीसाठी यज्ञादिक कर्मे करतो. परंतु आपली संस्कृती सांगते, हे सर्व नाही केले तरीही चालेल. मोक्ष प्राप्तीसाठी फक्त नर्मदेचे दर्शन सुद्धा पुरेसे आहे. कारण सर्व देवता तिच्या किनारी वास करतात. ती साधू संतांची भूमी आहे. ती वैराग्याची जननी आहे आणि अवधूतांची माता आहे. असे अनन्यसाधारण महत्व नर्मदामैयाचे आहे. ज्याप्रमाणे संत तुकाराम म्हणतात, ‘चंद्रभागे माजी स्नान, तुका म्हणे हेचि दान’. चंद्रभागेमध्ये स्नान करणे हे प्रत्यक्ष विठोबाच्या दर्शना एवढेच त्यांना महत्त्वाचे वाटते. त्याच अर्थाने नर्मदा किनारी स्नानाचे महत्त्व आहे. प्रपंचासाठी कष्टवलेले शरीर नर्मदेच्या स्नानाने मोक्षप्राप्तीसाठी अनुकूल बनवायचे आहे.
नर्मदेच्या केवळ दर्शनाने देखील मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. नर्मदा सर्व स्थानांवर पूजनीय आहे. मोक्ष म्हणजे आसक्ती कमी होणं. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. गढूळलेलं मन शांत होणं हा मोक्ष आहे. मनाचा तळ दिसणं हा मोक्ष आहे.
नारेश्वर अर्थात रंगावधुत स्वामी...
रंगावधूत स्वामींचं मूळ नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असं आहे..महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवळे गावाशी त्यांचा वडिलोपार्जित संबंध आहे. त्याचा जन्म २१/११/१८९८, वडील विठ्ठलपंत,आई रुक्मिणी,आजोबा जयराम भट्ट. त्यांच्या आजोबांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना गुजरात मधील गोध्रा येथे सखारामपंतांच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये पुजारी म्हणून पाठवले. तेथे कार्तिक महिन्यात कुष्मांड नवमीला त्यांना मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी विठ्ठल ठेवले. नंतर त्यांना नारायण नावाचा दुसरा मुलगाही झाला. नंतर विठ्ठलपंत प्लेग साथीमध्ये गेले. आपल्या भावाची मदत घेऊन रुक्मिणीबाईंनी संसार सुरू केला. त्यांच्या मूळगावी देवळेला जाऊन त्यांनी मुलांची मुंज केली. त्यानंतर देवदर्शनासाठी त्या मुलांना घेऊन नरसोबाच्यावाडीला गेलेल्या असताना तिथे सद्गुरू कृपेने टेंबे स्वामी भेटले. त्यांनी पांडुरंगाला अनुग्रह दिला. प्रसाद म्हणून हातावर खडीसाखर ठेवली. नंतर पांडुरंग संस्कृत घेऊन एमए झाले. डाकोरला रणछोडदास श्रीकृष्णाच्या दर्शनाच्या वेळी त्यांना रेल्वेमध्ये महात्मा गांधी भेटले. त्यांना सतत कोणीतरी ‘पोथी वाच’ असे आपल्याला सांगत आहे असा भास होत असे. त्यांच्या मामाच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या घरातील माळ्यावरून जुन्या पोथ्यांचे बाड काढले तर त्यात त्यांना गुरुचरित्र पोथी मिळाली. त्यांनी 108 वेळा तिचे वाचन केले. त्यांना अनेकदा टेंबेस्वामी स्वप्नात येऊन दृष्टांत देत असत त्यानुसार ते अनुकरण करत असत. त्यांनी दत्तलीला या ग्रंथाची पण पारायणं केली. नर्मदेची पायी परिक्रमा केली. नंतर टेंबे स्वामी त्यांच्या स्वप्नात आले. अवधूताच्या रंगात रंगले म्हणून पांडुरंगास ‘रंगावधूत स्वामी’ हे नाव त्यांचे सद्गुरु टेंबे स्वामी यांनी बहाल केले.
खरं सांगायचं तर जग नावं ठेवतं.आणि सद्गुरु नाव ठेवतात. टेंबे स्वामी त्यांना म्हणाले की तू आता अध्यात्मसाधनेसाठी अशी जागा शोध की जिथून तुला कोणीही उठ म्हणणार नाही. ते प्रथम ओंकारेश्वरला आले. तिथे चंद्रशेखरआनंद नावाचे ९६ वर्षाचे महात्मा होते. त्यांच्या सहवासात आपण राहावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्या महात्म्याने त्यांना सांगितले की या चार-आठ दिवसात माझी जीवनयात्रा मी संपवणार आहे. त्यामुळे तू खांडव्याला धुनीवाले बाबांच्याकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घे. त्यांच्या सूचनेनुसार ते नर्मदा किनारी खांडव्याला धुनीवाले बाबांच्या आश्रमामध्ये गेले. तिथे धुनीवाले बाबा भेटायला आलेल्या असंख्य भक्तांच्या कडून मिळणाऱ्या भेटी धुनीला अर्पण करत बसले होते.पण रंगावधूतस्वामींनी भेट म्हणून दिलेले दोन आंबे बाबांनी खाऊन टाकले. त्यांनी रंगावधूतस्वामींना तू नर्मदा किनारी नारेश्वरला जा असे सांगितले. नारेश्वर हे दहा गावांचे खरे तर स्मशान होते. गुरुची आज्ञा मानून ते तिथे गेले तर तिथे त्यांना साप आणि मुंगूस एकत्र खेळताना दिसले. यक्ष, किन्नर, गंधर्व यांचे तिथे गायन सुरू आहे असे त्यांना वाटले. ते तिथे रमले. त्यांनी आपल्या आईबरोबर 40 वर्षे तिथे वास्तव्य केले. तिथली कडूनिंबाची झाडे सुद्धा त्यांच्या सहवासाने, स्पर्शाने गोड झाली असे म्हणतात. नारेश्वर खरंतर दहा गावांचं स्मशान. परंतु रंगावधूतस्वामींचे येण्यामुळे तिथे स्वर्ग अवतरला. रंगावधूतस्वामींचा दत्तसंप्रदायातील अधिकार बहुत मोठा आहे.
नारेश्वर ते गरुडेश्वर अशी पायी परिक्रमा करण्याची संकल्पना रंगावधूत स्वामींचीच आहे. शिष्य स्थानापासून गुरुस्थानापर्यंत पायी चाललात तर संपूर्ण परिक्रमा पूर्ण केल्याचे फळ मिळेल अशी आपल्या गुरुस्थानावर रंगावधूतस्वामींची नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे. गुरूचरित्र ग्रंथ गुजराती भाषेत अनुवादित केला. गुरूचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायातील सार सांगणारी एकेक ओवी लिहून ५२ ओव्यांची दत्त बावनी रंगावधूतस्वामींनी लिहिली. दत्त बावनी म्हणजे गुरूचरित्र ग्रंथाचं सार सर्वस्व. त्यांनी १९००५ ओव्यांचा गुरूलीलामृतसार ग्रंथ लिहिला.वासुदेव सप्तशती म्हणजे सद्गुरु स्तवन लिहिले. अशा अर्थाने रंगावधूतस्वामींचे आपल्यावर बहुत उपकार आहेत. दत्त संप्रदायामध्ये गुजरातमध्ये रंगावधूतस्वामींना बापजी म्हणून संबोधतात.
त्यांनी आयुष्यभर दत्तनामाचे स्मरण करत देह देवापाशी वाहिला. त्यांनी हरिद्वार येथे १९/११/१९६८ रोजी देह त्यागला आणि याच नारेश्वरी २१/११/६८ त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यावेळी वीस लाख गुजराती बांधव जमले होते असे सांगतात. हरिपाठ ज्याप्रमाणे वारकऱ्यांची संध्या आहे तसेच महत्त्व रंगावधूतस्वामींच्या दत्तबावनीला आहे. त्यांनी गुजरात मध्ये दत्तसंप्रदायाचे प्रचाराचे आणि प्रसाराचे फार मोठे कार्य केले. परिक्रमेत नारेश्वर या स्थानास विशेष महत्त्व आहे. परिक्रमेत तिथे जातातच. आज मंदिरात गर्दी नव्हती. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे कोठेही दानपेटी नाही. तिथे नारेश्वर शिवलिंग आहे.दर्शन अगदी छान झालं.त्यांच्या आईसाहेबांचं देखील दर्शन घेतलं. त्या स्थानावर ‘न मातु: परम् दैवतम’ असे लिहिलेले आहे.
बसमध्ये प्रकाशदादांच्या मुखातून रंगावधूतस्वामींच्या चरित्राचे कथन ऐकताना परिक्रमा सुफळ झाली अशी भावना नक्कीच मनामध्ये दाटून आली. स्वामीजी नेहमी सांगत की साधनेमध्ये रमा.साधनात नको.
कोहना
बसने कोहना या ठिकाणी गेलो. कोहनामधे हसमुख हनुमंत राय ,सर्वेश्वर विनायक आणि स्फटिकाचे अखिलेश्वर शिवलिंग पाहिलं. नर्मदा दर्शन झाले. इथे दुपारचं वनभोजन झालं यशोधनच्या महाराजांच्या हाताला खरंच खूप चव आहे. स्वयंपाक घरात अन्नपूर्णेचा निवास आहे .अन्नदाता सुखी भव.
नर्मदा परिक्रमेत गुजरात राज्यात एकूण पाच मुक्काम होतात. पहिला राजपीपला, दुसरा अंकलेश्वर, तिसरा दहेज आणि चवथा केवडिया कॉलनी येथे दोन.
स्टॅच्यू ऑफ युनिटी
लोहपुरुषाचा जगातील सर्वात उंच पुतळा..
आज दुपारच्या सत्रात जगातील सर्वात उंच असा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहिला. या अलौकिक पुतळ्याने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो हे बाकी नक्की. कारण जगातील सर्वोच्च पुतळा आज हिंदुस्थान मध्ये आहे.आणि महत्वाचं म्हणजे तो श्रीक्षेत्र गरूडेश्र्वर येथे आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं या देशाप्रतीचं योगदान फार उच्चकोटीचं आहे. त्यांना लोहपुरुष म्हणतात. संस्थाने खालसा करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या हातून घेतला गेला. अखंड भारताचं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी प्रसंगी कठीण कारवाई करण्यात अग्रभागी असणारे सरदार वल्लभभाई पटेल आपल्या अभिमानाचा विषय आहेत.
त्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा त्यांच्या प्रति समस्त भारतीयांनी प्रकट केलेला आदरभाव आहे. पुतळा व परिसर केवळ अवर्णनीय आहे. इथला ध्वनी प्रकाश कार्यक्रम त्याहून सरस. डोळ्यांचे पारणे फिटते. खूप खूप समाधान वाटते. आजची संध्याकाळ अशा प्रकारे संस्मरणीय झाली. इथले सर्वच बांधकाम, तंत्रज्ञान पाहून अभियांत्रिकी शाखेच्या सर्व विभागातील अभियंत्यांना मानाचा मुजरा करावा असे वाटले.
मुक्काम गरुडेश्वर. सयाजी हॉटेल.
मालसर
हे क्षेत्र नर्मदा किनाऱ्यावर गुजरातराज्यात उत्तर तटावर आहे. तालुका शिनोर जिल्हा वडोदरा.
येथे किमान सव्वाशे वर्षे जुने स्वामी माधवदास यांनी स्थापन केलेले सत्यनारायण व श्रीकृष्ण यांच्या एकत्र मूर्ती असणारं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. माधवदास हे बंगालचे सत्पुरुष होते. त्यांनी मिरच्या खाऊन नर्मदा तटावर मालसर येथे साधना केली. गावात सत्यनारायण देवतेचे मंदिर बांधण्याचा त्यांनी संकल्प सोडला. त्या दृष्टीने वास्तूशास्त्रानुसार देवाचे गर्भागार बांधले. सत्यनारायण देवतेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठीं सिंहासन बनवले. बडोदा संस्थानचे अधिपती सयाजीराव गायकवाड त्यांना भेटण्यास व काही मदत करण्यासाठी येथे आले. माधवदास यांच्या विनंतीला मान देऊन सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा ते मालसर अशी रेल्वे लाईन सुरु केली. आणि एके दिवशी रेल्वेच्या डब्यातून सर्व प्रवासी उतरले तरी एक मोठे बेवारस पार्सल तिथे राहिले. ते कोणाचे आहे हे पाहायला गेल्यावर त्याच्यावर सत्यनारायण देऊळ,मालसर असा पत्ता होता. म्हणून ते पार्सल उतरून देवळात आणले तर त्यामध्ये श्रीसत्यनारायण आणि श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती होती. नियोजित सत्यनारायण मंदिरात मग कृष्णभगवंत आणि सत्यनारायण या देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या गेल्या. मूर्ती अत्यंत साजीरी. एकटक बघत बसावं.
सत्यनारायण कुणा माऊलीचा बाळ
त्याच्या प्रसादाला लागे दुध साखर केळ
सत्यनारायण कुणा माऊलीचा विडा
त्याच्या प्रसादाला लागे शेरभर गरा
सत्यनारायणाच्या पूजा घातल्या मी बारा
केळीच्या मखरात समयीचा ग तोरा
भर दुपारी मंदिरात गेलो होतो. दर्शन झालं.
तिथेच मूळचे इंदोरचे श्रीकृष्ण डोंगरे महाराज भागवत कथा सांगत असलेले स्थान आहे. सत्यनारायण मंदिराच्या पुढं सिमेंटचा चौथरा आहे. त्यावर बसून पूज्य श्रीकृष्ण डोंगरे महाराजांनी सतत ३३ वर्षे भगवान श्रीकृष्णाचं लीळाचरित्र म्हणजे भागवत कथा सांगितली आहे. समोर तीन कदंब वृक्ष आहेत. डोंगरे महाराज म्हणजे त्याग, तपस्या आणि संयम यांची मूर्ती. भागवताचे वक्ते. कृष्णभक्त. देहाला झाकायला केवळ एक धोतर. समोर छोटी कृष्णमूर्ती ठेवून ते कथा सांगायचे. समोर लोक किती बसले आहे याला ते महत्त्व देत नसत. प्रसंगानुरुप त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तथा देहबोली बदलायची. मिळणारी बिदागी ते सामाजिककार्यास देऊनच मग ते आसन सोडायचे. त्यांचं सोवळे अत्यंत कडक होते. डोंगरे महाराज हे कथा सांगताना कृष्णमय व्हायचे. इच्छेविरुद्ध जर कुणी दर्शन घेतले तर महाराज उपवास धरत. त्यांचे खरे नाव श्री रामचंद्र डोंगरे असे होते.
महाराज नीतिमान आयुष्य जगले. भगवत् गीतेचे सार म्हणजे न्याय आणि नीती हेच आहे. महाराजांनी शेवटची कथा शुकताल येथे सांगितली. भागवत कथा म्हटलं की डोंगरे महाराजांचे नाव आपसूक येतेच. आदर्श पुरुष, त्याग, तपस्या यांची संयमी मूर्ती म्हणजे डोंगरे महाराज. तिथल्या चौथर्याची धूळ कपाळावर लावावी असे प्रकाशदादांनी सांगितले. मालसर मध्ये वर्षभर भागवत कथा चालते.
इथं राहण्याच्या व भोजनाच्या चांगल्या सोयी आहेत. मातृपितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी इथे येऊन त्यांच्या स्मरणार्थ भागवत कथा करण्याची रूढी परंपरा आहे.
श्रीमद्भागवत
हिंदूधर्मात जी अठरा पुराणे सांगितली आहेत त्यापैकी एक म्हणजे श्रीमद्भागवत.पुराणांच्या क्रमवारीत भागवत हे आठवे पुराण आहे. भागवत पुराण व गीता यांचे आधी श्रीमद् हा शब्द वापरतात. कारण ही साक्षात देववाणी आहे. हा पौरूषेय ग्रंथ आहे.
भागवत पुराणाचा संक्षिप्त परिचय पुढील प्रमाणे आहे.भाषा... संस्कृत. विषय... कृष्ण भक्ती.
पाने १८०००. लेखक व्यास महर्षी. कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारा वैष्णव ग्रंथ म्हणजे श्रीमदभागवतपुराण. हा ग्रंथ म्हणजे भारतीय वाड:मयाचा मुकुटमणी आहे. भक्तियोगाचे महत्व समजावून सांगितले आहे. भागवतातील प्रत्येक श्लोक हा कृष्णभक्ती सुगंधित करतो. यात साधनज्ञान, सिद्धज्ञान, साधनभक्ती, सिद्धभक्ती,मर्यादा मार्ग, अनुग्रहमार्ग, द्वैत अद्वैत समन्वय आदी विविध विषय हाताळलेले आहेत. श्रीमद भागवत हा सर्व वेदांचे सार असून त्याचे रसपानाने जो तृप्त होईल त्याचे मन अन्य कुठेच रमणार नाही. या कथेच्या श्रवणाने परिक्षित राजाचा उध्दार झाला.
भागवत कथा हीच साधन असून हेच साध्यही आहे. जगावं कसं हे भगवदगीता शिकवते. तर मरावं कसं हे भागवत शिकवते. वस्तू कष्टाने मिळविता येतात. भगवत भक्ती मात्र त्याच्या ईच्छेनेच घडते. सत्संगा शिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय देव नाही.
इथल्या अंगारेश्वर महादेवाचे देऊळ यवनानी आक्रमण करून तोडायला सुरुवात केली पण तेवढ्यात तेथे हजारो भुंगे आले आणि त्यांनी यवनांना त्रस्त करून सोडले. या घटनेमुळे त्याला पश्चाताप झाला आणि त्या यवनाने नव्याने शिवमंदिर बांधून दिले. ते पाहिले. त्याच्या खुणा मंदिराच्या मागील भिंतीवर आजही पाहायला मिळतात. देवळाच्या पाठीमागच्या भिंतीवरती खिडकीच्या आकाराची मशिदीची प्रतिकृती आहे. मंदिरात गणपती व हनुमान आहेत. परिसर स्वच्छ आहे. जवळच पंचमुखी हनुमंतराय तसेच राम लक्ष्मण व सीता माई यांच्या मूर्ती असणारं मंदिर आहे.
मालसर दर्शन करून, बालभोग घेऊन शिनोर कडे निघालो.
शिनोर
मालसर पासून शिनोर पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे वडोदरा जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. मोठी बाजारपेठ आहे. जुनं गाव असल्या कारणाने रस्ते लहान. पूर्वीच्या सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातील गाव. गुजराती धाटणीचे अनेक जुने वाडे, माड्या आणि घाट आजही पहायला मिळतात. उत्तरतटावरील शिनोर मध्ये नर्मदा किनाऱ्यावर प्राचीन श्री गणपती मंदिर असून देवाच्या दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. गणपती उजव्या सोंडेचा आहे. मंदिर बहुत पुरातन आहे. इथे पायीवाल्यांसाठी अन्नक्षेत्र आहे. समोर विशाल नर्मदा पात्र आहे. भलामोठा घाट आहे. आता पाणी जास्त आहे. हे स्थान पायीच्या मार्गावर आहे. आजचं नर्मदा स्नान शिनोर येथील घाटावर झाले.
शिनोर ते सौभाग्य सुंदरी
शिनोर पासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर सौभाग्य सुंदरी नामक देवीचे मंदिर आहे.
हे स्थान पायीच्या मार्गावर आहे. कणाकणाने वाढणारी देवी अखंड सौभाग्य लाभावे म्हणून पूजण्याची प्रथा आहे. इथे अनेक शिवमंदिरे आहेत. बिल्व वृक्ष आहेत. वीरगळ आहे. परिसर निर्जन आहे. गावाचं नाव कंजेठा. इथल्या नदीच्या किनाऱ्यावरती आलेली मगर विजयने दाखवली. मगर हे नर्मदा देवीचे वाहन आहे. देवी निपुत्रिकांना नवसाला पावते अशी श्रद्धा आहे.
अनुसया माता
हे स्थान दत्तक्षेत्र म्हणून ओळखले जाते. अनसूयेने येथे कडक तप केले. ती थंडीमध्ये बर्फात बसायची तर उन्हाळ्यामध्ये सभोवताली आग पेटवून मध्ये उभी राहायची. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी येथेच अनुसयामातेची सत्व परीक्षा घेतली आणि दत्त प्रभू जन्मास आले. अशी कथा इथं सांगितली जाते. महाराष्ट्रात माहूर गडावरील दत्त शिखरावर पण अशीच कथा सांगितली जाते. पण इथल्या गुजराती बांधवांच्या मते हेच दत्तक्षेत्र आहे.
बद्रिकाश्रम आजचे दुपारचे भोजन या आश्रमात झाले. नर्मदा किनारी उत्तरतटावर एका अत्यंत मोक्याच्या जागी बद्रिकाश्रम आहे. मोठा संपन्न आश्रम आहे. पायी परिक्रमा करताना इथं चहा नाश्ता भोजन आणि निवास आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. इथं कितीतरी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. समोर विशाल नर्मदा पात्र अखंड दिसते. उत्तरतटावरील श्री नर्मदा परिक्रमा मार्गावरील दुसरा टप्पा. येथे दुपारचे भोजन घेऊन कुबेरभंडारी कडे निघालो.
गंगनाथ
येथे गंगनाथ नावाचे शिवलिंग आहे. इथून चांदोदपर्यंतचे मय्या पात्र दिसते. तात्या टोपे भूमिगत असताना येथे येऊन राहिले होते. मार्कण्डेय पुराणात वरील शिवलिंगाचा उल्लेख आहे. परिसर मोठा आहे. इथे मोर, लांडोर, पोपट आणि विविध पक्षी सहज दृष्टीस पडतात. प्राचीन काळापासून हे स्वयंभू लिंगाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महान मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठराला सर्व पापांचा नाश करणाऱ्या ज्या कल्होरी तीर्थावर जायला सांगितले तोच हा गंगनाथ महादेव आश्रम.
कुबेर भंडारी
हिंदू पौराणिक कथांमध्ये, कुबेर हा संपत्तीचा देव आणि देवांचा खजिनदार म्हणून ओळखला जातो. त्याच्याशी संबंधित अनेक कथा आहेत, ब्रम्हदेवाचा पुत्र पौलस्य. पौलस्याचा पुत्र विश्रवा. त्याला दोन पत्नी होत्या इडविदा आणि कैकसी. कुबेर हा विश्रवा ऋषी आणि त्यांची पत्नी इडविदा यांचा मुलगा होता. यामुळे तो लंकापती रावणाचा सावत्र भाऊ होता. घराण्याची सर्व संपत्ती मोठा मुलगा या नात्याने कुबेराकडे आली तेव्हा रावणाने शिवाची आराधना केली शक्ती प्राप्त करून घेतली आणि कुबेराच्या पराभव करून सर्व संपत्ती काढून घेतली. मग कुबेराने तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले, ज्यांनी त्याला संपत्तीचा रक्षक (धनपाल) बनवले आणि लंकेचे राज्य दिले. तसेच त्याला 'पुष्पक विमान' भेट दिले.
मात्र, रावणाने कठोर तपस्या करून भगवान शंकराकडून शक्ती मिळवली आणि कुबेराला लंकेतून हाकलून दिले. पौराणिक कथेनुसार, लंकेतून हाकलल्यानंतर कुबेराने परत शिवाकडे धाव घेतली तेव्हा शंकराने त्याला तू नर्मदा किनारी जा, तिथे देवी पार्वती जगदंबेच्या स्वरूपात अवतीर्ण झाली आहे आणि तिच्यासमोर कोणाचीही शक्ती चालत नाही असे सांगितले. तेव्हा याच ठिकाणी येऊन भगवान शंकराची आणि महाकाली मातेची आराधना केली होती. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव, येथे कुबेर भंडारीच्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात की इथे कुबेर अदृश्य झाला आणि शिवस्वरूपात प्रगट झाला. या मंदिरात नंदी नाही, हे एक वैशिष्ट्य आहे.
अशी श्रद्धा आहे की धनत्रयोदशी किंवा अमावस्येच्या दिवशी या मंदिरात दर्शन घेतल्यास भाविकांना समृद्धी आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते. नर्मदा किनाऱ्यावर उत्तरतटावर करनाळी या गावात कुबेर आल्याचा उल्लेख आहे. इथे कुबेर शिवलिंग स्वरूप आहेत. देवी पार्वती जगदंबेच्या रूपात आहे. देव आणि आपण यातील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे छान दर्शन घेतले. योगी अरविंद ईथे आले होते. ईथे वर्षभर भाविक येत असतात. हे प्रसिद्ध क्षेत्र आहे.
शिव पुराणानुसार, कुबेर पूर्वजन्मी 'गुणनिधी' नावाचा एक ब्राह्मण होता. सुरुवातीला त्याने धर्मशास्त्राचे अध्ययन केले, परंतु नंतर वाईट संगतीत लागून जुगार खेळू लागला आणि चोऱ्या करू लागला. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. एकदा एका शिवमंदिरात चोरी करताना त्याने अजाणतेपणाने दिवा प्रज्वलित केला, ज्यामुळे मंदिरातील अंधार दूर झाला. त्याच्या या अजाणतेपणी केलेल्या पुण्यकर्मामुळे आणि भक्तीभावामुळे भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. या पुण्याईच्या बळावर त्याला पुढील जन्मी कुबेर म्हणून जन्म मिळाला आणि संपत्तीचा देव बनण्याचे वरदान मिळाले.
आज अमावस्या होती त्यामुळे कुबेर भंडारीला जत्रेसाठी गर्दी होती. तरी यशोधनच्या व्यवस्थित नियोजनामुळे दर्शन छान झालं.
मजल दर मजल करत गरुडेश्वर मुक्कामी आलो. सयाजी हॉटेल.
टेंबे स्वामींचा परिचय, जन्म १३/८/१८५४
श्रावण वद्य पंचमी. माणगाव सिंधुदुर्ग. आई रमाबाई. वडील गणेश भट्. आजोबा हरी भट्. आजोबा हरिपाठ भट्ट माणगावला पुजारी. त्यांचा मुलगा गणेश भट्ट व त्याची पत्नी रमाबाई सुद्धा तिथेच राहायचे. दत्त संप्रदायी. गणेश भट्टांनी गाणगापूरला बारा वर्षे साधना केली. नरसिंह सरस्वतीने बटुरूपात दर्शन देऊन सांगितले की मी तुझ्या घरात जन्म घेईन. जेथे धर्म, नीती, न्याय असतो तेथे अष्ट सिद्धींचा निवास असतो. तेथे योगी जन्माला येतो. त्याप्रमाणे मुलाचा जन्म झाला त्याचे नाव ठेवले वासुदेव. (१८.०८.१७५४.)
गावात एकदा कोणा एकाची गाय इतकी ओढाळ होती की दुधाळ असून पण दूध देईना. म्हणून गावकऱ्यांनी वासुदेवाला बोलावले आणि जेव्हा त्याने फक्त गाईकडे स्नेहदृष्टीने पाहिले तेव्हा तिने कोणतीही तक्रार न करता भरपूर दूध दिले. असा हा अणुरेणुवर सत्ता चालवणारा वासुदेव म्हणजे प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतींचे रूप होता. एकदा वासुदेव गावकऱ्यांच्या बरोबर परगावला गेला होता आणि परत येताना जंगलामध्येच अंधार झाला तर वाटेमध्ये एक भला मोठा नाग रस्ता अडवून बसला होता. सगळे गावकरी घाबरून गेले. परंतु वासुदेवाने त्या नागाभोवती काठीने एक रिंगण केले. नाग त्या रिंगणामध्येच स्तब्ध झाला. सगळे गावकरी आपापल्या घरी गेले. वासुदेव सुद्धा घरी गेला आणि त्याच्या लक्षात आले की त्या नागाचे काय झाले पाहून यावे म्हणून तो परत रात्रीच जंगलात गेला तर तो नाग अजूनही तिथेच होता. जेव्हा त्याने रिंगण पुसले तेव्हा तो नाग तेथून निघून गेला. असा लौकिक वाढत होता. अन्नपूर्णा पत्नी. सासू सून कलह फार. भिक्षुकीवर उपजिवीका. अनवाणी वाडीला आले. पादुका दर्शन नाकारले गेले. रात्री यतीवेषात नरसिंह सरस्वतीनी दक्षिण दरवाजात दर्शन दिले. कागलमधे दोन दत्तमूर्ती घेतल्या. एक संगमरवरी व एक पितळी. माणगावला मंदीर उभारले. दत्त महाराजांच्या आज्ञेवरून पत्नी सहित वाडीला गेले. नरसोबावाडीला गोखलेंच्या ओसरीवर संसार थाटला. मृत मुलगा जन्माला आला. मग गंगाखेडला गेले. जनाबाई चे गाव. तिच्या ओव्या पण सहज आठवल्या.
जनी धुते धुते विठोबाचा झगा, अबीर बुक्क्याने दरवळते चंद्रभागा
जनी धुणं धुते रखमाबाईच लुगडं, अबीर बुक्क्याचा सुवास चोहिकड
विठ्ठल म्हणे जने, नाही करमत, पुढे जातो चंद्रभागे, याचं कर धुण्याच निमित्त
जनी धुणं धुते, विठ्ठल खडकावरी उभा, दोघांच्या पिरतीला हसली चंद्रभागा.
रुक्मिणी म्हणे देवा जनीशी काय नातं,सुखाचं पाखरू, भक्तीसाठी येत जातं.
रुसली रुक्मिणी,जेवना दूध पोळी, जेवना दूध पोळी, रुक्मिणी शिवी चोळी,
रुसली रूकमिणी, बसली खिडकीत, प्रीतीचा पांडुरंग, सारी पंढरी हुडकीत.
विठ्ठल म्हणे, जनी माझी सासुरवाशी, इळभर काम, उस घेती जात्यापाशी
दयाळ मनाची, जनाबाई तू उठ,काकड आरतीला, लोक पाहतात वाट.
गंगाखेडला असताना तिथे वासुदेवांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांच्याजवळ असलेल्या दत्ताच्या मूर्तीने त्यांना पुढील सूचना दिली की आता त्यांना उज्जैनला जायचे आहे कारण तिथे नारायणानंद सरस्वती त्यांची वाट पाहत आहेत. त्याप्रमाणे वासुदेव म्हणजेच टेंबे स्वामी उज्जैनला गेले तिथे नारायणानंद सरस्वतीनी त्यांची कुंडलिनी जागृत केली. गुरू नारायणानंद सरस्वती उज्जैन. त्यांनी त्यांना 'परमहंस परीव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद थोरले स्वामी महाराज' असे नाम दिले. तिथून ते ब्रम्हवर्तावर गेले तिथे प्लेगच्या साथीने लोक त्रस्त झाले होते. त्यांना त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र दिला. दत्त संप्रदायाच्या बीज मंत्राची निर्मिती टेंबे स्वामींनी केली. असाच बाबाजीनी तुकारामांना 'रामकृष्ण हरी' हा मंत्र दिला होता. ओतूर गावात मांडवी नदीच्या काठी वारुळ स्वरूपात बाबाजींची समाधी आहे. समर्थ संप्रदायाचा मंत्र 'जय जय रघुवीर समर्थ' त्याचप्रमाणे परिक्रमेचा मंत्र 'नर्मदे हर.' कागलचा व्यापारी ज्याने त्यांना मूर्ती दिल्या होत्या त्याला समजले की टेंबे स्वामी नरसिंह सरस्वतीचा अवतार आहेत.तो त्यांना हुडकत नरसीनामदेवला आला. तिथे गोदावरी आणि कयाधू या दोन नद्यांचा संगम आहे. तिथे त्याने एक अपूर्व दृश्य बघितले की टेंबे स्वामींच्या मांडीवरती दत्तगुरु खेळत आहेत.
पिठूर येथे टेंबे स्वामी चातुर्मासासाठी थांबलेले असताना गंगेवरती स्नान करून येताना एका महारोग्याने मागून त्यांच्या पायावर पाणी घातले. आणि त्यामुळे भिजलेली माती आपल्या अंगाला तीर्थ समजून लावून घेतली. आश्चर्य म्हणजे तो पूर्ण बरा झाला. परंतु त्याच्या आजार टेंबे स्वामींना आला. त्यांना संग्रहणीचा पण आजार होता. म्हणजे फक्त अन्नच नव्हे तर साधे पाणी पिले तरी त्यांना शौचाला जावे लागत असे आणि जितक्यांदा ते जाऊन येत तितक्या वेळा गंगास्नान करून घाट चढून वर येत असत. असंख्य स्नाने करून सुद्धा त्यांचा रोग बरा होईना व ते विद्रूप झाले होते. एकदा गंगा त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाली की तू नर्मदा किनारी जा. मनात गंगा असली तरी तुझ्या भाग्यामध्ये नर्मदा आहे. ते हौशिंगाबाद येथे खर्रा घाटावर नर्मदेच्या दक्षिण तटावर आले. तिथे तीनशेपन्नास वर्षे जुने औदुंबराचे झाड होते. नर्मदेची असंख्य स्नाने व साधना करून त्यांचा देह पूर्ववत दिव्य झाला. हे सर्व रोज पाहणारा एक गुराखी त्यांची योग्यता जाणून त्यांना नमस्कार करायला आला त्यांनी त्याला पुढे येऊ नकोस तू उद्या नमस्कार करायला ये व येताना मूठभर जोंधळे घेऊन ये असे सांगितले. तोपर्यंत त्यांनी स्वतः भोवती एक संरक्षक कडे निर्माण केले. दुसरे दिवशी तो गुराखी जोंधळे घेऊन आला तेव्हा त्याला त्यांनी ज्वारीचा एक एक दाणा आपल्या डोक्यावर टाकायला सांगितला. तर त्यांचे डोके तपाने इतके तापले होते की त्या सर्व जोंधळ्याच्या लाह्या झाल्या. टेंबे स्वामी कोणाचाही स्पर्श करून घेत नसत. सोवळे इतके कडक होते की ते एकदा दक्षिणेकडे गेलेले असताना त्यांनी रोज एक अशा 51 खारका खाऊन तिथे दिवस काढले होते. नरसिंह सरस्वतींचे प्रगट स्वरूप म्हणजेच टेंबे स्वामी. त्यांनी खर्रा घाटावर एकमुखी दत्ताची पद्मासनातील मूर्ती स्थापन केली.
स्वामींनी कलियुगात दत्त पुराण लिहिले. हे १९ वे पुराण आहे. महाराजांचे घोरकष्टोधरण स्तोत्र सुप्रसिद्ध आहे. त्यांनी कुरवपूरला ते लिहीले. महाराजांनी नद्यांवर स्तोत्रे लिहिली. आद्यगुरू शंकराचार्य रचित धर्माच्या घटनेत कालमानपरत्वे निर्माण झालेले दोष दुरुस्त करण्याचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. स्वामींचं गरुडेश्वरी १३ महिने वास्तव्य होतं. ते दंडी स्वामी होते त्यामुळे त्यांच्या देहास जलसमाधी दिली गेली. स्वामींनी २३ चातुर्मास केलें. शेवटचा चातुर्मास करण्यासाठी शूलपाणीच्या जंगलातून निघाले असताना वाटेत त्यांना एक भिल्ल भेटला. तो त्यांना गरुडेश्वर पर्यंत घेऊन गेला.तो भिल्ल म्हणजे अश्वत्थामा होता. त्यांनी तिथे एक झोपडी उभारली. तेच आजचे दत्ताचे देऊळ. त्यांनी आपल्या भक्तासाठी भगवद् गीता हाताने लिहून दिली.
इथं स्वामींच्या निर्गुण निराकार अशा चरण पादुका आहेत. त्याबद्दल एक आख्यायिका आहे. मंदिरामध्ये एक शूद्र माणूस सेवा करत असे. त्याने टेंबेस्वामींना त्यांच्या अखेरच्या काळात मला तुमची आठवण म्हणून तुमच्या पादुका द्या अशी विनंती केली. स्वामींनी उभ्या आयुष्यात पायात जोडे घातले नाहीत. डोक्यावर छत्री धरली नाही. तसेच स्वयंचलित वाहनात बसून कधीही प्रवास केला नाही. महाराजांचं सोवळं खूप कडक होतं.
म्हणून त्यांनी त्याला नर्मदेमधील दोन दगड आणायला सांगितले व त्याच्यावर ते पाय देऊन उभे राहिले. त्या पायाचे ठसे त्यावर उमटले. ज्यावेळी मंदिराचे बांधकाम सुरू केले तेव्हा त्या शूद्राने त्या पादुका देवळात स्थापन करायला सांगितले. ज्यामुळे सर्व भक्तांना त्यांचे दर्शन घेता येईल.
टेंबे स्वामींना आपण देह कधी ठेवणार हे जेव्हा जाणवलं. तेव्हा त्यांना त्यांच्याशी बोलणाऱ्या दत्त मूर्तीची काळजी पडली होती.तेव्हा त्यांनी आपले परमशिष्य श्री योगानंद यांना सांगितलं होतं की, माझ्या पश्चात ही मूर्ती गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर किंवा माणगाव येथील श्रीदत्त मंदिरात नेऊन पूजेत ठेवा. तेव्हा महाराजांच्या बरोबर रोज बोलणारी दत्त मूर्ती त्यांच्यावर रुसली. त्या मूर्तीने योगानंद यांना सांगितलं होतं की,मला वरील पैकी कुठंही जायचं नाही तर मला गरूडेश्र्वर येथेच राहायचं आहे. कलियुगातील माझ्या लीला या आता गरूडेश्वरी पहायला मिळतील. दत्तप्रभूंना देखील नर्मदा किनाऱ्याने मोहित केले आहे. नर्मदा किनारा हा साधुसंतांच्या आणि देवादिकांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. टेंबेस्वामींचे शिष्य रंगावधूत स्वामी, गुळवणी महाराज, योगानंद दीक्षित महाराज. आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी रात्री साडेअकरा वाजता पद्मासनात बसून उत्तरेकडे बघत स्वामींनी इहलोकीची यात्रा पूर्ण केली. देहावसान.२४/६/१९१४.
(एकदा विष्णू भगवान त्यांच्या वाहनावरून पृथ्वीवरती आलेले असताना त्यांना गरुडेश्वरला काहीतरी गडबड आहे असे वाटले. काय आहे ते पाहून ये असे म्हणून त्यांनी गरुडाला पाठवले तर तिथे गजासुर नावाच्या राक्षसाने सर्वांना त्रस्त करून सोडले होते. गरुडाने गजासुराला ठार मारले. परंतु त्याचा देह नर्मदेत पडल्यामुळे तो चांगल्या गतीला प्राप्त होऊन गेला. तो परत बलवान होईल या भीतीने विष्णू घाबरला आणि त्याने त्याला येऊन विचारले की तुला काय हवे आहे . तेव्हा गजासुर म्हणाला की या स्थानाला गरुडेश्वर असे नाव द्या)
महाराजांकडे असणारी पंचधातूची दत्तमूर्ती त्यांच्याशी बोलायची. ज्या ठिकाणी स्वामींनी देह सोडला त्या ठिकाणी स्वामींचं समाधी मंदिर बांधलेलं आहे. समाधी स्थान पाहिलं. सामूहिक आरती केली.
गरूडेश्र्वर येथील टेंबेस्वामी स्थापित दत्त मंदिरात मधोमध संगमरवरी दत्तप्रभू मूर्ती. उजव्या हाताला देवी सरस्वती आहे. आपल्या डाव्या हाताला आद्यगुरू शंकराचार्य आहेत. ताम्हणात एकमुखी दत्तमूर्ती आहे जी इंदोरची महाराणी इंदिराबाई होळकर यांना टेंबेस्वामींनी दिलेली होती. तीन शिरे सहा हात असणारी दत्तमूर्ती टेंबेस्वामींशी बोलत असे. याशिवाय उत्सवमूर्ती. स्वामींच्या संगमरवरी चरण पादुका आहेत. टेंबेस्वामी हे आद्यगुरु शंकराचार्य यांचीच परंपरा सांगत होते आणि ते दंडीस्वामी होते..
आद्यगुरु शंकराचार्य यांनी हिंदू धर्माची संहिता लिहिली. त्या संहितेत कालानुरूप काही दोष दुरुस्त्या करण्याचं महनीय कार्य टेंबे स्वामी यांनी केलं. म्हणून शंकराचार्य हे दत्त मंदिरात विराजमान आहेत.तर टेंबेस्वामी यांनी लिहिलेलं साहित्य हे संस्कृतप्रचुर आहे. त्यांच्या जिव्हाग्रावर देवी सरस्वतीचा निवास होता. त्यामुळे देवी सरस्वती देखील दत्त मंदिरात पाहायला मिळते. दत्तप्रभूंच्या समोर टेंबे स्वामींची उत्सवमूर्ती सुद्धा विराजमान आहे.
गरुडेश्वर ते महेश्वर उत्तरतट परिक्रमा. आज सकाळी जरा लवकर उठून सर्व आन्हिके उरकून गरुडेश्वरी दत्तमंदिरात सकाळी सकाळी गेलो. टेंबे स्वामींशी बोलणाऱ्या दत्तमूर्तीस ( तीन शिरे सहा हात).आणि इंदिराबाई होळकर यांना टेंबे स्वामींनी दिलेल्या एकमुखी दत्तमूर्तीस नर्मदा जलाचा जो अभिषेक घालतात तो पाहिला.
गरुडेश्वर चा घाट १९४० सालात इंदोरची महाराणी इंदिराबाई होळकर यांनी बांधला होता.परंतु काळाच्या ओघात अतिवृष्टीत तो वाहून गेला. पुढची काही वर्ष नर्मदेवर जाताना मोठी कसरतच करावी लागत होती. आता मात्र नवा घाट बांधलेला आहे..उतरायला आणि चढण्यास सोपा वर येताना घाटाच्या पायर्या कमी उंचीच्या केल्याकारणाने ते अजून सोपं झालं आहे. नर्मदा स्नान केले. इथली नर्मदा नितळ निर्मळ आहे. आज पात्रात नर्मदा दुथडी भरून वाहत होती.
गरूडेश्वर ते मालसर या दोन तासांचे प्रवासात प्रकाशदादांनी, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज अर्थात श्री टेम्बे स्वामींच्या चरित्रावर सर्वांशी सुख संवाद साधला. टेंबे स्वामींच्या चरित्रातील माहिती ऐकत नर्मदा किनाऱ्यावर येऊन पोचलो.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
महेश्वरपर्यंत प्रवासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र कन्यकेबद्दल प्रकाशदादांनी संवाद साधला. त्यांच्या जीवनातील ठळक घटनांचा पट मांडला. तो सर्वांनाच आवडला. महेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महनीय अशी कारकीर्द घडली आहे. त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा महेश्वरात आजही जागोजागी पाहायला मिळतात.
संतपदाला पोहोचलेली इंदोरची महाराणी म्हणजे अहिल्यादेवी. अहिल्या देवी होळकर यांची शिवलिंग स्वरूप समाधी महेश्वर .
जन्म...३१/०५/१७२५ मृत्यू....१३/०८/१७९५
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे महेश्वरस्थित समाधी स्थान
श्रावण वद्य चतुर्दशी अर्थात १३/०८/१७९५ या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली जीवन यात्रा महेश्वरला पूर्ण केली. नर्मदेच्या काठावर त्यांची शिवलिंग स्वरूप समाधी आहे. नर्मदेचं दुसरं रूप म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्राची थोर सुकन्या म्हणजे अहिल्यादेवी. दानधर्माची अगाध सरिता प्रवाहित करणारी पुण्यसरिता म्हणजे अहिल्यादेवी. सदैव रयतेच्या कल्याणासाठी प्रजाहितदक्ष असणारी इंदोरची महाराणी म्हणजे अहिल्यादेवी.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती. तेथे कर माझे जुळती.
अहिल्येश्वर शिव मंदिर
अहिल्येश्वराच्या देवळात बाईंना साक्षात शिवाने दर्शन दिले आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत.बाजूला आल्या गेलेल्यांसाठी ओवऱ्या आहेत. मंदिरा सभोवती अप्रतिम शिल्पकला पहावयास मिळते.शिल्पकारांनी मन लाऊन विस्मयकारक शिल्पे कोरलेली आहेत. याचा अर्थ त्यांना योग्य मेहनताना मिळत होता. याचाच अर्थ राजाची तिजोरी धनधान्याने भरलेली होती. याचाच अर्थ राजा आणि प्रजा सुखी होते. इथल्या शिल्प कलेचे प्रतिबिंब महेश्वरी साड्यांच्या कलाकुसरीत उमटले आहे. मंदिर आजही भरभक्कम आहे. इथेच नि:शस्त्र रामराया आहेत. राजराजेश्वराच्या देवळात शिवलिंगाच्या मागे परंतु वरच्या बाजूला सात आणि चार अखंड नंदादीपक तेवत आहेत. इथेच कार्तवीर्याची प्रतिमा आहे. आवार प्रशस्त आहे. नर्मदेच्या अगदी काठावर अतिशय देखणे काशी विश्वनाथ मंदिर आहे. ईथे शिवलिंगास स्पर्श करून दर्शन घेता येते.
इथं अहिल्यादेवी दररोज स्नानोत्तर पूजा व नमस्कार करण्यासाठी येत. इथेच त्यांना भगवान शिवाने दर्शन दिले. त्याच्या शिवाय का आसेतु हिमाचल निर्माण कार्ये त्यांच्या हातून घडली? दानधर्माची अगाध सरिता प्रवाहित करणारी पुण्यसलीला म्हणजे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर. ‘शापादपी शरादपी’ असे बायकात अहिल्यादेवी आढळून आल्या. ‘आज पावेतो बाईंची स्नान संध्या आणि धर्माची प्रवृत्ती ऐकण्यात होती. आज मात्र पराक्रमाची हद्दच झाली. पुण्याचा दरवाजा म्हणजे महिष्मती नर्मदातीर आहे हे आम्हाला आज उमगले.’, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल पेशव्यांचे पंतप्रधान नाना फडणीस यांनी गौरवोद्गार काढले.
मनोगत
‘शेळ्या मेंढ्या गाई गुरे पाळून उपजीविका करणारी आम्ही सामान्य माणसं. श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या कृपेनं मराठी रियासत मध्यभारतातील इंदोर तथा माळवा प्रांतात रुजविण्याचे आणि त्या निमित्ताने दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकविण्यासाठी अंशात्मक का होईना पण योगदान देण्याचे भाग्य लाभावे हे माझे प्रारब्ध आहे. माझे सासरे पितृतुल्य मल्हारराव होळकरांच्यामुळे हे दिवस दिसले आहेत.देवाचे उपकार कसे फेडू?……’,इति देवी श्री अहिल्याबाई होळकर.
ज्यांचं खाजगी मालकीचं देऊळ एवढं भव्य दिव्य आहे. ज्यांच्या देवघरातील देव किलो किलो सोन्याचा आहे. ज्यांनी प्रजाजनांना पुत्रवत मानून सोन्यासारखं जपलं. ज्यांचा इंदोरस्थित राजवाडा पाहिला तरी ऊर अभिमानाने भरून येतो. त्यांचं राजवैभव काय तोडीचं असेल. आणि मुख्य म्हणजे शिंदे, होळकर, गायकवाड, पवार आदी मध्य आणि उत्तर हिंदस्थानांतील संस्थानिकांना बळ पुरवणारी त्या निमित्ताने या मुलख वर्चस्व प्रस्थापित करणारी,आणि महत्वाचं म्हणजे दिल्लीच्या तख्ताला संरक्षण देणारी आणि प्रसंगी हादरे देणारी, नव्हे नव्हे ही सलतनत उलथवून टाकणारी, मराठी रियासत केवढी शक्तिमान असेल.
अठराव्या शतकात दिल्लीचा बादशाह जरी सर्व सत्ताधीश होता.तरी त्या बादशहाच्या सिंहासनाला सांभाळणारे मराठे त्याहीपेक्षा शक्तिमान होते असं जे म्हटलं जातं ते सार्थ असल्याचं इंदोर स्थित होळकरांचे साम्राज्य बघितले म्हणजे जाणवतं. आपण महाराष्ट्र देशात जन्मलो याचा गर्व वाटतो.
देवघर
अहिल्यादेवींच्या देवघरात सोन्याचा पाळणा आणि सोन्याचा कृष्ण आहे.अनेकविध शिवलिंगे आहेत. मल्हारी मार्तंडाचा चांदीचा ठसठशीत टाक आहे. राम शिव विष्णू पंचायतन आहे. पाऱ्याचे शिवलिंग आहे. पारंब्या नसणारे वडाचे झाड आहे. रयत सुखी रहावी म्हणून ईथे आजही दररोज १५००० शिवलिंगे बनविली जातात. त्यांची यथोचित पूजा केली जाते व मग त्यांचे विसर्जन केले जाते. त्याला कोटी लिंगार्चन विधी असं म्हणतात. हे धर्म कार्य आहे.
महेश्वर येथील अहिल्यादेवींच्या देवघरात नर्मदेच्या पात्रातील विविध आकाराची पुष्कळ शिवलिंगे आहेत. काही त्यांना नर्मदा पात्रात स्नान करताना सापडलेली आहेत तर काही परिक्रमा करणाऱ्या माताजी व बाबाजींनी भेटीदरम्यान प्रेमाने दिलेली आहेत. शिव, राम तथा विष्णू पंचायतन आहे. सोन्याचा पाळणा तसेच सोन्याचा बाळकृष्ण आहे. कायम हातात बाळगलेले शिवलिंग आहे. शिवाय पाऱ्याचे शिवलिंग आहे. वेळ मिळाला की अहिल्यादेवी या सर्वांची पूजा करत. एरवी पूजेसाठी स्वतंत्र व्यवस्था लावून दिली होती. बाहेर पारंब्या नसलेले वडाचे झाड असून पती असताना अहिल्यादेवी वटपौर्णिमेस याची पूजा करत असत.
आम्ही पतिव्रता नारी सती सावित्रीच्या लेकी
पुजा वडाची करूया दोरा बांधून कौतुकी
अशी सावित्री ग बाई केली यमाची त्या भक्ती
सत्यवानाला मिळाली नव्या जनमाची मुक्ती
धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सार्थकी
आम्ही पतिव्रता नारी सती सावित्रीच्या लेकी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राज्य चालविण्याची दृढ संकल्पना, वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी राज्य शकट हाती घेतला. २८ वर्ष त्यांनी होळकरांचे साम्राज्य सांभाळले. असं सगळं महेश्वर स्थित अहिल्यादेवींच्या देवघराचं कौतुक आहे.
महेश्वर दर्शन.उत्तर तट परिक्रमा.
नर्मदामाईच्या कृपेने काल रात्री गरुडेश्वरहून महेश्वरी मुक्कामी आलो. महेश्वर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची नवी राजधानी. मूळची राजधानी इंदोरला आहे. घरातील पती, सासूबाई ,सासरे, मुलगा आणि सूना अशी सगळी जीवाची माणसं इंदोर स्थित राजवाड्यात डोळ्या देखत देवाघरी गेल्या कारणाने तो राजवाडा आता खायला उठला होता. आणि म्हणून मग नव्या जागेचा शोध घेतला गेला. दक्षिणतटावर स्थित मर्दाना या गावातील जागा निश्चित केली गेली. परंतु ही जागा राजधानी म्हणून लाभणार नाही असा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला बाईंनी मानला. नव्यानं शोध घेतला गेला. त्यात महेश्वरनगरी बाईंना आवडली. मूळची महिष्मती नगरी. नवी राजधानी ईथे वसवली. ज्यांचं नाव घेतलं म्हणजे पुण्य प्राप्त होतं. ज्यांचं नाव हाच एक श्लोक आहे. ज्या देवी स्वरूप आहेत. डोक्यावर पदर. हातात सदैव शिवलिंग. शालीन आणि कुलीन भारतीय सभ्यतेच्या आदर्श आहेत. अशी महान विदुषी म्हणजे महाराष्ट्राची थोर सुकन्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी.
महेश्वर
सध्याच्या मध्यप्रदेशातील नर्मदेच्या काठावरील इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे एक छोटंच पण ऐतिहासिक गाव. तालुका महेश्वर जिल्हा खरगोन. मराठी दौलतीचा सरंजाम अंगोपांगी ल्यायलेली अहिल्याबाई होळकरांची आवडती नगरी. दुथडी भरून वाहणारी नर्मदा आणि तिच्याकाठी बांधलेले अप्रतिम सरस आणि देखणे घाट म्हणजे महेश्वर. चित्ताकर्षक महेश्वरी साड्या निर्मितीचे गाव म्हणजे महेश्वर. इथल्या एवढे रुबाबदार घाट मय्या किनाऱ्यावर अन्यत्र कुठंही पहायला मिळत नाहीत. घाटाला लागूनच असलेली होळकर साम्राज्याची भरभक्कम गढी. दुथडी भरून वाहणाऱ्या इथल्या मय्येचं सात्विक तरीही मनोहारी रूप काही औरच. इथल्या स्नानाचा आनंद काही निराळाच. स्वच्छ निवळशंख पाणी. सुरक्षित घाट. विस्तीर्ण पात्र. इथे घाटांमुळे नर्मदा व नर्मदेमुळे घाट सौन्दर्यशाली झाले आहेत. हे एक अद्वैत आहे. याच घाटावर अहिल्यादेवी दररोज भल्या पहाटे स्नान करत होत्या. याच घाटावर कधीकाळी सव्वा लाख शिवलिंगे दररोज तयार केली जात होती. एका शिवलिंगाची त्या पूजा करत होत्या. रयत सुखी राहावी म्हणून मय्येस आर्जव करत होत्या.
अहिल्येश्वर, राजराजेश्वर , काशी विश्वनाथ आदी मंदिरे तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अत्यंत साधा पण सात्विक राजवाडा, राजगादी, राहतं देवघर, कल्पवृक्ष, कोटी लिंगार्चन विधी, अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा, ही सर्व महेश्वरची अभिमानाने मिरवावीत अशी आभूषणे आहेत. ती सर्व पाहिली.
बाईंनी रयतेस पुत्रवत सांभाळले. आपले राजेपण त्यांनी कुठेही मिरविले नाही. रयतेचा उत्कर्ष व्हावा अशी त्यांची धारणा होती. त्यांची न्यायदान प्रक्रिया प्रशंसनीय होती.
रस्ते बांधून त्याच्या बाजूला उत्तम देशी झाडे लावणे. मठ मंदिरांची निर्मिती तथा डागडुजी करणे. पाणपोया धर्मशाळा यांची उभारणी करणे. असे विपुल जनहितार्थ कार्य बाईंनी आजीवन केले. हे राज्य पेशव्यांचे असून आपण निमित्त आहोत अशी त्यांची धारणा होती. त्यामुळेच दोन वेळचे अन्न तथा दोन साड्या एवढ्याच अत्यावश्यक गोष्टी त्यांनी राजकोषातून केल्या. कोणत्याही गोष्टीचे श्रेय त्यांनी घेतले नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याची महाराणी एका अत्यंत लहान खोलीत रहात होती. तिथे एकाच व्यक्तीचा वावर होऊ शकत होता. खोलीत वाकून जावे लागत होते. अंगी नम्रता सदा असावी असा याचा अर्थ होतो. बाईंचे चरित्र विमल होते.
जाड भिंगातून अनेक इतिहासकारांनी बाईंचे चरित्र अभ्यासले,परंतु बाईंच्या नावावर कोणतीही आगळीक आढळली नाही. त्या संतपदाला पोहोचल्या होत्या असा निर्वाळा तत्कालीन अभ्यासकांनी दिला आहे. दानधर्माची अगाध सरिता प्रवाहित करणारी पुण्यसलीला म्हणजे अहिल्यादेवी.
वयाच्या ४२ व्या वर्षी अहिल्यादेवींनी तुकोजीराव होळकर यांना दत्तक घेऊन राज्य शकट स्वहाती घेतला. निरपेक्ष भावनेनं सदैव प्रजाहित दक्ष असणाऱ्या अहिल्याबाई या देवी स्वरूप आहेत. नर्मदेचं दुसरं रूप आहेत. व्रतस्थ जीवन जगणाऱ्या ‘शापादपी शरादपि’ असणाऱ्या या साध्वीने मराठयांचा गौरवशाली इतिहास महेश्वर पर्यंत नेण्याचं मोठं कार्य केलं आहे.अहिल्यादेवींनी जवळपास २८ वर्षे मध्य भारतात होळकर साम्राज्याचा दबदबा कायम ठेवला. हातात शिवलिंग घेऊन रयतेस न्याय मिळवून दिला. तसेच वयाच्या ५८ व्या वर्षी घोड्यावर बसून हाती शस्त्र घेऊन सौभागसिंग व चंद्रावंत या राजपुतांचा बंदोबस्त देखील केला.
निमाड प्रांतात उत्तम प्रतीचा कापूस पिकतो. या कापसापासून उत्तम दर्जाच्या व वजनास अत्यंत हलक्या सुती साड्या बनविण्याचे कारखाने अहिल्यादेवींनी महेश्वरात काढले. ‘महाराष्ट्र व निमाड प्रांतातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र पती निधनानंतर बाईंनी रंगीत वेल बुटीदार वस्त्र अंगावर घातले नाही. त्या नेहमी पांढरी साडी नेसत.’ असे गौरवोद्गार,सर मालकम या एका इंग्रज इतिहासकाराने अहिल्याबाईंच्याबद्दल काढले आहेत. भारतातील स्वच्छतम शहर इंदोरच्या निर्मितीचा व विस्ताराचा पाया दूरदृष्टीने अहिल्यादेवींनी घातला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि महेश्वर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सहस्त्रार्जुन मंदिर महेश्वर
येथे सहस्त्रार्जुनाची शिवलिंग स्वरूप समाधी आहे. शिक्षा म्हणून त्याचे डोईवर एका बाजूला चार व एका बाजूला सात असे दिवे जळत आहेत.
सहस्त्रार्जुन यास हजारबाहू होते व हजारवर्षे आयुष्य मिळाले होते. त्याला त्याचा अहंकार होता. त्याने महेश्वरनगरीत नर्मदामय्येस अडविण्याचा प्रयत्न केला. जमदग्नी ऋषींची कामधेनू गाय पळवून आणली. तसेच रावणास डोक्यावर दहा तसेच हाती एक असे अकरा दिवे घेऊन मयसभेत नर्तन करायला लावले. त्याच्या उन्मत्तपणामुळे परशुरामाने त्यास मारले.
वैभवशाली महेश्वर पाहून मंडलेश्वरला जातो. इथे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले भव्य पारशी बनावटीचे राम मंदिर आहे. तेही अगदी नर्मदा काठावर. गुप्तेश्वर महादेव आहे. महेश्वरच्या आधीपासून मंडलेश्वर पुराणकाळी प्रसिद्ध आहे. इथं आद्यगुरू शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ घडला.
अंतिम टप्प्यात आपण सहस्त्रधारा हे स्थान पाहतो.इथं सहस्त्रार्जुनाने आपल्या हजारबाहुत नर्मदेस पकडण्याचा प्रयत्न केला. इथं नर्मदेच्या सहस्त्रधारा पाहायला मिळतात.
जलकोटी दत्तमंदीर
एकमुखी दत्तात्रेय मंदिर हे मध्य प्रदेशात स्थित श्री शिवदत्तधाम म्हणूनही ओळखले जाते, हे परमपूज्य श्री नारायण महाराज यांच्या चारधाम निर्माण करण्याच्या संकल्पनेतून स्थापन झालेले पहिले मंदिर आहे. हे श्रीक्षेत्र जलकोटी सहस्त्रधारा, महेश्वर, मध्य प्रदेश येथे नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे.
या मंदिरात सहा हात असलेल्या आणि एकमुखी असलेल्या भगवान दत्तात्रेयांची भव्य मूर्ती आहे, ज्याला शिवदत्त म्हणून ओळखले जाते. समोर एक भव्य शिवलिंग आहे, या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान एकमुखी दत्त, माँ नर्मदा आणि भगवान गणेश यांच्या आकर्षक मूर्ती.
ही मंदिरे विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आली होती, ज्यांचे भारतात भगवान दत्तात्रेयांना समर्पित चार मंदिरे स्थापन करण्याचे स्वप्न होते. २००८ मध्ये नर्मदा नदीजवळ बांधलेले पहिले धाम दत्तधाम म्हणून ओळखले जाते. हे स्थान भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे शिष्य कार्तवीर्य सहस्रार्जुन यांचे आध्यात्मिक भेटीचे ठिकाण देखील मानले जाते.
दुसरे दत्तधाम, ज्याचे नाव अनुसूया दत्तधाम आहे, ते तामिळनाडूतील बट्टाकोटा येथील अंजी गावात समुद्राजवळ आहे.
तिसऱ्या धामाला ब्रह्म दत्तधाम म्हणतात आणि ते कोलकाता येथे आहे. चौथ्या धामाला श्री अत्री दत्त मंदिर असे नाव आहे आणि ते उत्तराखंडमध्ये आहे. तथापि, शिव दत्तधाम व्यतिरिक्त, भगवान शेवटच्या तीन मंदिरांमध्ये, भगवान दत्तात्रेयांची मूर्ती तीन मुखांनी दर्शविली आहे. भगवान दत्तात्रेयांना समर्पित या चार मंदिरांमध्ये कोणतेही पुजारी नाहीत. स्वयंसेवक मंदिर स्वच्छ करण्यापासून ते प्रार्थना आणि आरती करण्यापर्यंत सर्व काही व्यवस्थापित करतात.
उत्तर तट..आज सकाळी सकाळी सर्व मूर्तींना महेश्वर च्या नर्मदेवर स्नान करता आले.
घाटावर बऱ्यापैकी उजाडलं आहे. गावातील स्त्रिया भांडी घासणे, कपडे धुणे, स्नान करणे आणि सहज गप्पा मारणे,अशा कितीतरी गोष्टींच्या निमित्ताने रोज घाटावर येतात. काही जण घाटावर मॉर्निंग वॉक करतात. कुणी माशांना खाऊ घालतात. कुणी स्नान करून नर्मदा जलाने काठावरच्या शिवलिंगास अभिषेक घालतात. दिवाबत्ती करतात. ज्यांना कुणी नाही असे लोक घाटावर पथाऱ्या टाकतात. देवळारावळांच्या प्रांगणात देवाच्याच आश्रयाने जीवन जगतात. थोडक्यात नर्मदाकिनारा हा किती एक जणांना हक्काचा निवारा आहे. आश्रयस्थान आहे. ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार साहे’.
महेश्वरचा घाट स्नानास सर्वोत्तम आहे. पायऱ्या अत्यंत सोप्या. पुढे लोखंडी रेलिंग. कपडे बदलायला जागा. पायऱ्यांपर्यंत समूहाने येऊन लीला करणारे मासे बघत बसलो तरी जीवास सुख लाभते. मय्या किनारा असा अनेकांना ऊर्जा देतो. अशा प्रकारे महेश्वर दर्शन पूर्ण होते.
खरं सांगायचं तर एका दिवसात सम्पूर्ण महेश्वर दर्शन कठीण आहे.इथं दोन तीन मुक्काम हवेतच. यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माच्या त्रिशताब्दीचे वर्ष आहे.
मांडवगड कडे जाताना वाटेमध्ये नीलकंठ धाम नावाचे शंकराचे देऊळ पाहिले. हे मंदिर धार जिल्ह्यात मांडू शहरात आहे. हे मंदिर मुघल काळात बांधले गेले होते, असे मानले जाते आणि काही स्त्रोतांनुसार मुघल सम्राट अकबराने ते बांधले होते.
या मंदिराचे बांधकाम मुघल शैलीत करण्यात आले आहे. हे मंदिर एका दरीत असून, तिथे पोहोचण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते.
मंदिरातील शिवलिंग जमिनीखाली काही पायऱ्यांवर स्थापित आहे आणि त्यावर नैसर्गिकरीत्या पाण्याच्या झऱ्यातून सतत जलाभिषेक होत असतो. या मंदिराच्या परिसरात एक छोटे तळे (कुंड) देखील आहे. हे ठिकाण निसर्गरम्य आहे आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
त्यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे मांडवगड.
कुणी मांडव, कुणी मांडू असंही म्हणतात. धार जिल्ह्यात आहे. मध्य प्रदेशातील हा एक भला थोरला किल्ला आहे. राणी रुपमती साठी इथे नर्मदा माई आली. रेवाकुंडात विराजमान झाली. सध्या कुंडाची बरीच पडझड झाली आहे. गडकऱ्यांना त्याचं काही वाटत नाही. मात्र आता नव्यानं डागडुजी सुरु झाली आहे.
पायी परिक्रमा करणारी मंडळी देखील हा किल्ला चढून येतात. परिक्रमा मार्गावरील हा एक कठीण टप्पा आहे. किल्ला बराच मोठा आहे. त्यांच्या कष्टास तोड नाही. पाणी नाही. निर्जन वन. तरीही माईवर श्रद्धा ठेवून चालतात. चालण्यातलं सुख अनुभवतात. गतजन्मातील चांगल्या वाईट कर्मांचं ओझ पाठीवर घेऊन.
इथेच चतुर्भुज राम मंदिर आहे. देव ११२८ वर्ष जुना आणि देऊळ २०२ वर्षे प्राचीन आहे. देवाचा शृंगार बघण्यासारखा असतो. यवनी राजवटीत यवनांचा उन्मत्तपणा याच मांडवगडाने उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. पण काळाच्या ओघात यवन गेले. त्यांचे राजवाडे जमीनदोस्त झाले. त्यांच्या राजवटी मातीमोल झाल्या.
आज मांडवगडावर फक्त रेवाकुंड व चतुर्भुज रामराया आहेत. परिक्रमावासी येत आहेत. स्थानिक लोक इथं जंगल असल्याने बरीच वनौषधी विक्रीस आणतात. इथल्या गोरख चिंचा व त्यांची भली मोठ्ठी झाडं प्रसिद्ध. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये इथं सिताफळांचा खच पडलेला असतो. सीताफळ हे कमी पाण्यावर येणारं रानटी फळ. गोड मधुर. पण अल्पजीवी.
रूपमती आणि बाजबहादूर यांची प्रेमकथा मध्ययुगीन भारतातील एक प्रसिद्ध आणि शोकांतिक कथा आहे, ज्यात माळव्याचा सुलतान बाजबहादूर आणि एक सुंदर, प्रतिभावान गायिका रूपमती यांच्या प्रेमाचे वर्णन आहे, एक सामान्य शेतकरी कन्या, पण तिच्या अविश्वसनीय गायन आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध, जिने सुलतानाची पत्नी म्हणून राणीचा दर्जा मिळवला. माळवा सल्तनतीचा (मांडू) शेवटचा स्वतंत्र सुलतान, जो संगीत आणि कलेचा चाहता होता. बाजबहादूरने रूपमतीला गाताना ऐकले आणि तिच्या आवाजाच्या प्रेमात पडला. त्याने तिला आपल्या दरबारात आणले आणि तिच्याशी विवाह केला. तेव्हा तिची अट होती की मला रोज नर्मदेचे दर्शन झाले पाहिजे म्हणून बाजबहादूरने रूपमतीसाठी एक सुंदर राजवाडा (राणी रूपमती पॅव्हेलियन) बांधला, जिथून ती माहेश्वरच्या नर्मदा नदीचे दर्शन घेऊ शकली आणि गाऊ शकली,त्याने स्वतःसाठी दुसरा राजवाडा बांधला. पण थंडीमध्ये धुक्यामुळे, पावसामध्ये सुद्धा तिला नर्मदा नदीचे दर्शन होत नसे. त्यावेळी ती अखंड उपवास करत असे. तिची ही साधना पाहून नर्मदा तिच्या स्वप्नात आली व तिने तिला सांगितले की, तू इतके कडक व्रत करू नकोस मी तुझ्यासाठी गडावरती अमुक अमुक ठिकाणी आली आहे. त्याप्रमाणे बाजबहादूरने त्या जागेवर खोदकाम केले असता खरोखर नर्मदेचे तिथे पाणी आले. त्यालाच रेवा कुंड असे म्हणतात.
मुघल सम्राट अकबराच्या सेनेने मांडूवर आक्रमण केले. बाजबहादूरला पराभव पत्करावा लागला आणि रूपमतीला मुघल हरममध्ये नेण्याचा प्रयत्न झाला. पतीशी निष्ठा आणि स्वाभिमान राखण्यासाठी रूपमतीने विष प्राशन करून आत्महत्या केली.
चतुर्भुज रामराया मांडवगड
मांडवगडावर चतुर्भुज रामराया मंदिर आहे. इथले रामराया हे चतुर्भुज आहेत.रामरायाच्या उजव्या हातात बाण व डाव्या हातात धनुष्य आहे. खाली डाव्या हाती जपमाला व त्याखाली मारुतीराया आहेत. खालच्या उजव्या हाती कमलपुष्प व त्याखाली अंगद आहेत. त्याखाली सात वानरे आहेत. लक्ष्मणभैय्यांच्याखाली नल व नील अशी दोन वानरे आहेत. सीतामय्या आहे. मूर्ती विक्रम संवत ९५७ म्हणजे १११९ वर्षांपूर्वीची आहे.
मंदिर सन १८२३ मध्ये बांधले गेले आहे. पुण्यातील रघुनाथदास महंत यांच्या स्वप्नात जाऊन मांडव गडच्या तळघरात यवनी आक्रमणांपासून वाचवून सुरक्षित ठेवलेल्या रामप्रभूंनी साक्षात्कार घडविला.
याकामी धारच्या संस्थानिक शकुताई पवार यांनी सर्वोतोपरी सहाय्य केले. मंदिर भरभक्कम असून मूर्ती अत्यंत मनोहर आहेत. मुख्य संगमरवरी मूर्तींच्या समोर पितळी उत्सवमूर्ती आहेत. मधोमध रामराया असून आपल्या डाव्या हाताला लक्ष्मणभय्या व उजव्या हाताला सीतामाई आहेत. परिक्रमावासी येथे राहतात. त्यांना भोजन दिले जाते.
दुपारपर्यंत इंदोर शहरापर्यंत पोहोचलो. इंदोर हे देशातील खऱ्या अर्थाने नीटनेटके आणि स्वच्छतम शहर आहे. सलग आठव्यांदा हा बहुमान या शहरास प्राप्त झाला आहे. या शहराची पाया भरणी पुण्यश्लोक मल्हारराव होळकर यांच्या कालखंडात म्हणजे अंदाजे १७३० चे दरम्यान झाली.
अन्नपूर्णा देवी मंदिर
बडा गणेश पाहिल्याशिवाय इंदोर पूर्ण होत नाही. अन्नपूर्णा मंदिर नव्याने साकारलं आहे. इंदोरवासियांचं श्रद्धा स्थान आहे. होळकरांचा भव्य आणि दिव्य राजवाडा लोकांना बघता यावा म्हणून खुला केला आहे. बघताना आपल्या पूर्वजांच्या कर्तबगारीने अभिमानाने उर भरून येतो. त्याच्या मागे होळकरांच्या मालकीचं मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे. देवाचा सोन्याचा टाक आहे. शिवलिंग आहे. मंदिर भव्य आहे.
होळकरांच्या वैभवाची त्यातून कल्पना येते.
होळकरांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे संग्रहालय देखील इथं आहे. राजवाडा हे इंदोरचं गौरवस्थान आहे. भूषण आहे. इंदोरची सुप्रसिद्ध खाऊ गल्ली हा इंदोर वासियांचा प्राण आहे. समोसे, कचोरी, जिलेबी,पाणीपुरी, चटपटा चाट आदी व्यंजनांचा आस्वाद घेतल्या शिवाय त्यांचं पोट भरतच नाही. हौशी लोक आहेत. विड्याच्या पानांची देखील अफलातून दुकाने आहेत.
भावगीत गायक अरुणभय्या दाते इथलेच. लता दीदींचं हे जन्म स्थान आहे. माणसं रसिक आहेत. मराठीचा बोलबाला आहे. माळवा प्रांताची राजधानी म्हणजे इंदोर. इंदोर ही मध्य प्रदेश राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. चार ओळीत लिहावं इतकं इंदोर लहान नाही. इंदोरच्या सर्वांगीण विकासाचा पाया सतराव्या शतकाच्या मध्यावर अहिल्यादेवी होळकरांनी घातला हे बाकी नक्की. अहिल्यादेवींना दूरदृष्टी होती.
हॉटेल विन वे, इंदोर.
श्रीक्षेत्र नेमावर
मय्याकृपेने इंदोरचा मुक्काम छान झाला.आज सकाळी आरती व बालभोग उरकूनच इंदोर सोडलं.
आता प्रस्थान उज्जैनकडे. उज्जैनचा इतिहास रामायण आणि महाभारत काळापासून आहे. भगवान राम यांनी सीतामातेसोबत दर्शन घेतले होते. भगवान राम यांनी रामघाटावर त्यांचे वडील दशरथ यांचे "पिंडदान" केले होते. येथे स्थित षष्ठगणेश सीतामातेने वसवला होता असे म्हटले जाते. प्राचीन काळी, या शहराला पद्मावती, स्वर्णश्रृंग, कुशाष्ठली, अवंतिका, अमरावती आणि चुरामणी अशी अनेक नावे होती. त्याच्या वास्तूंवरील सोनेरी नक्षीकामांमुळे त्याला 'कनकश्रृंग' असेही म्हटले जात असे.
असे म्हणतात की जेव्हा द्युषणाने अवंतिकेवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा पार्वतीच्या मूर्तीजवळील जमीन दुभंगली आणि त्यातून भगवान शिव महाकाल म्हणून बाहेर पडले. त्यांनी फक्त एका आवाजात राक्षसांना जाळून टाकले. अवंतिकेच्या लोकांच्या विनंतीनुसार, भगवान शिव यांनी अवंतिकेचे प्रमुखदेव म्हणून तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
दर्शन सहज आणि छान घडले. पूर्वी अगदी महांकाल शिवलिंगास हात लावून दर्शन घेता यायचे. आता मात्र लांबूनच हात जोडावे लागतात. दर्शन व्यवस्था छान आहे. देवळात स्वच्छता आहे. पायाखाली जाजम अंथरले आहेत.जागोजागी सुरक्षा रक्षक तथा मार्गदर्शक आहेत. मोठे स्क्रीन लावले आहेत. मंदिर परिसर प्रशस्त आहे. वॉशरूमची सोय आहे. कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उज्जैन सिंहस्थ कुंभ मेळा स्थान आहे. क्षिप्रानदीच्या काठावरील उज्जैन हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. उज्जैन ही मोक्षदायिनी सप्तपुरी आहे.
राजा विक्रमादित्याची नगरी आहे. ज्यांनी विक्रम संवत सुरू केले आहे.उज्जैन नगरीचे विद्यमान राजे श्री महांकाल आहेत.आता उज्जैन नगरीत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे. आणि हे काम सतत चालूच आहे. उज्जैन दर्शन करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. २०२८ मध्ये इथे कुंभमेळा आहे.त्या दृष्टीनं प्रशासन आता पासूनच सतर्क झालं आहे.उज्जैन नगरीचं महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे.सांदीपनी ऋषींचा आश्रम,हरसिद्धीमाता आदी महत्वाची दर्शने घेतली. उभ्या भारतवर्षातून इथे लोक येतात. व्यापार उदीम मोठा आहे.
महर्षि सांदीपनिऋषी यांचे तपस्थान,आश्रमातील बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मूर्ती,बेलपत्रात प्रकट झालेले सर्वेश्वर महादेवाचे शिवलिंग, या शिवलिंगाच्या जलधारेमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे.
सांदीपनिऋषी हे त्यांच्या ७ पुत्रांच्या वियोगाने काशी सोडून उज्जैन येथे आले होते. उज्जैन येथे त्यावेळी दुष्काळ पडला होता. सांदीपनिऋषी आश्रम असलेल्या ठिकाणी त्यांच्या पत्नीसह एका झाडाखाली बसलेले तेथील लोकांनी पाहिले. त्यांच्या मुखावरील तेज पाहून ते कोणीतरी संत महात्मा आहेत, हे लोकांच्या लक्षात आले. ते दुष्काळापासून आपल्याला वाचवतील, असे त्यांना वाटले. सांदीपनिऋषींना शरण जाऊया, असे त्यांनी ठरवले. सांदीपनिऋषी यांनी याच ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिले आणि ‘महाकाल या नावाने माझे मंदिर राहील, तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही’, असे वरदान दिले. भगवान शिवाने यावेळी सांदीपनिऋषी यांना स्वतःसाठी काहीतरी मागण्यास सांगितल्यावर सांदीपनिऋषी यांनी काही मागितले नाही; परंतु त्यांच्या पत्नीने मातृप्रेमापोटी त्यांच्या मृत ७ पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली. या वेळी शिवाने गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन, हे वचन सांगून फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, कर्माचे फल तुम्हाला मिळणारच, असे सांगितले. तसेच तुम्ही येथे गुरुकुल स्थापन करा. द्वापरयुगात या गुरुकुलात शिकण्यासाठी दोन विद्यार्थी येतील. ते विद्यार्थी गुरुदक्षिणा म्हणून तुमचे पुत्र आणून देतील. असे सांगून शिव बेलपत्रात अंतर्धान पावले. याच बेलपत्रात एक शिवलिंग प्रकट झाले. तोच सर्वेश्वर महादेव ! या शिवलिंगाच्या जलधारेमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे. या शिवपिंडीवर धानस्थ ऋषीचिन्ह आहे. या मंदिराच्या आत एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकृष्ण अध्ययनासाठी आणि शिवाच्या पूजेसाठी बसत असत. (याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे.) ही शिळा चौकोनी आहे. या मंदिराच्या बाहेरील नंदीची प्रतिमा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतापर्यंत सर्व शिवमंदिरांमध्ये नंदी बसलेल्या स्थितीत आपण पहातो; परंतु या ठिकणी नंदी उभा असलेला दिसतो.
या ठिकाणी गोमती कुंड आहे. सांदीपनिऋषी प्रतिदिन स्नानासाठी गोमती नदीवर जात असत. ते एवढ्या लांब जात असल्याचे पाहून ११ वर्षांच्या श्रीकृष्णाने त्यांना त्यांनीच शिकवलेल्या कलेद्वारे गोमतीचे जल आश्रमाच्या ठिकाणी आणू का, असे विचारले. त्या च्या च्यावेळी सांदीपनीऋषींना हा ११ वर्षांचा विद्यार्थी म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, हे माहिती नव्हते. श्रीकृष्णाने पुन्हापुन्हा आग्रह केल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला सांगितले की, तुला शक्य असल्यास गोमतीचे जल आण. श्रीकृष्णाने त्याच्या धनुष्यावर बाण चढवला. ते पाहून गोमती नदी थरथर कापू लागली. तिने त्याठिकाणी येऊन श्रीकृष्णाला दर्शन दिले आणि अनेक युगे येथे रहाण्याचे आश्वासन दिले. या कुंडात सांदीपनिऋषी स्नान करत असत. कुंडेश्वर भगवान मंदिरात छतावर श्रीयंत्र कोरले आहे.
मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे असलेल्या सांदीपनिऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाने ६४ दिवस राहून १६ विद्या आणि ६४ कला ग्रहण केल्या, असे सांगितले जाते. ४ दिवसांत ४ वेद, ६ दिवसांत ६ शास्त्रे, १६ दिवसांत १६ विद्या, १८ दिवसांत १८ पुराणे, २० दिवसांत गीतेचे ज्ञान, गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा, हे सर्व मिळून ६४ दिवसांत पूर्ण केले होते. इथे चौदा विद्या आणि चौसष्ठ कला यांचे वर्णन करणारे सुंदर चित्रमय दालन केले आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण, सुदामा, बलराम आणि सांदीपनिऋषी यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या जागेला मंदिराचे स्वरूप दिले आहे.
भगवान श्रीकृष्णाने उज्जैनमधील सांदीपनिऋषींचा आश्रमच अध्ययनासाठी का निवडला ? ते काशीला का गेले नाहीत? काशी येथे जरासंधाचे राज्य होते आणि जरासंध कंसाचा मित्र होता. त्यामुळे त्या ठिकाणी सतत संघर्ष झाला असता.
हरसिद्धीमाता
हरसिद्धीमाता मंदिर मराठा राजवटीत बांधले असून तसा प्रभाव मंदिर बांधकामात आढळतो.परिसरात दोन दिपमाळा आहेत. मंदिरात आतून अत्यंत सुरेख श्रीयंत्र चितारले आहे. शिंदे आणि होळकर यांच्या प्रभावळीतील अवंतिका नगरी मधील हे तीर्थ क्षेत्र आहे.देवदर्शन करताना क्षिप्रा नदी भेटते.
उज्जैनमधील हरसिद्धिमाता मंदिर हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे, जिथे देवी हरसिद्धिची पूजा केली जाते; हे मंदिर रुद्रसागर तलावाजवळ आहे आणि सम्राट विक्रमादित्यांची कुलदेवता म्हणून ओळखले जाते, जिथे ते दर बारा वर्षांनी आपले शिर अर्पण करत असत अशी आख्यायिका आहे. शिवपुराणानुसार जेव्हा शिवाने सतीचे जळते शरीर यज्ञात अग्नीतून बाहेर काढले तेव्हा सतीचे कोपर येथे पडले असावे,तर स्कंद पुराणात देवीला चंडिला हे नाव कसे मिळाले याची कथा आहे.
उज्जैन ही तांत्रिक मांत्रिक यांची देखील नगरी आहे.उज्जैन शहर आता सर्वार्थाने कात टाकत आहे.
पुढे सोयीच्या स्थळी भोजन घेऊन नेमावरला मय्यातीरी गेलो.
श्रीक्षेत्र नेमावर
नेमावरला नर्मदा दर्शन घेतले.काहींनी हात पाय धुतले. काहींनी स्नान केले. हे नर्मदा मातेचे नाभिस्थान आहे. इथून अरब सागर व अमरकंटक ही दोन्ही स्थाने समान अंतरावर आहेत. दिवे लावले. आरती केली.
जेव्हा नर्मदा नदीवर एकही धरण नव्हते तेव्हा नेमावर जवळ धावशी कुंड येथे ती वरून वेगाने जमिनीवर दहा फूट खाली कोसळायची. तिचा वेग इतका होता की पात्रातील खडकाला मोठा खड्डा पडला. आणि एक नैसर्गिक उखळ तयार झाले. तीच नर्मदेची नाभी आहे असे म्हणतात. पात्रातील इतर दगडांना त्यामधे तिने गरागरा फिरवून असे बनवले की शिवलिंगे तयार झाली. त्यांना बाण असे म्हणतात.
सिद्धेश्वराच्या राउळात जाण्याआधी आपणास श्री गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी सहित भेटतात. त्यांचे दर्शन घेऊनच आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात गेलो.याठिकाणी पांडवकालीन शिवलिंग आहे.मंदिर व परिसर खूप प्राचीन आहे. दर्शन घेतले. मंदिर परिसरातील शिल्पकला मनोहारी आहे .केवळ अप्रतिम असे शिल्पकाम इथे मंदिर परिसरात आतून आणि बाहेरून पहायला मिळते. मंदिर तीन प्रकारच्या दगडांमधून बांधल्याचे जाणवते. काळा, पिवळा आणि तांबडा असे तीन रंगाचे दगड तिथे ठळकपणे दिसतात. सर्व देवदर्शने पूर्ण करून खातेगाव या ठिकाणी मुक्कामी आलो.
मुक्काम खातेगाव.
खातेगाव ते जबलपूर....
खातेगाव ते जबलपूर हे अंतर जवळपास ४०० km आहे. त्यामुळे लवकरच निघावे लागते आज पहाटे सहा वाजता निघालो.
प्रिय कोण? अर्थात संत ज्ञानेश्र्वर महाराज
याविषया अंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज या विषयावर प्रकाशदादानी सुंदर निरूपण केले.
ते म्हणाले,संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानाचं भांडार समस्त जगतासाठी खुलं केलं. गुह्य प्रकट केलं. अज्ञान रुपी अंध:कारात चाचपडणाऱ्या सामान्य जनांना ज्ञानरुपी दीप दाखवीला. त्यासाठी नाथ संप्रदाय थांबविला. आणि सर्वांना समानतेच्या पातळीवर आणणारा जगत कल्याणाचा भागवत सांप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. जगत कल्याणासाठी देह झिजविला.
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर, जेणे केला हा विस्तार
जनार्दन एकनाथ, खांब दिले भागवत
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश
अशा अर्थी ज्ञानदेव हे क्रांतिकारी संत आहेत. ज्ञानदेवांनी हे विश्व म्हणजे माझे घर असा विश्वव्यापक विचार मांडला.
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत
असा भक्तीयोग त्यांनी सांगितला. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी ज्ञानाचे भांडार खुले केले. भगवद्गीतेत एकूण १८ अध्याय आहेत. एकूण ७०० संस्कृत श्लोक आहेत. भगवद्गीता ही सोन्याची लगड आहे तर ज्ञानेश्वरी हा त्या लगडीपासून घडविलेला उत्तम अलंकार आहे. परमार्थरुपी गंगा आहे.
ज्ञानदेव हे या वेदांत गंगेचे भगीरथ झाले. ज्ञानेश्वरी मध्ये ९०३३ ओव्या आहेत.
ज्ञानेश्वरी म्हणजे जसा खडी साखरेचा रवा, जसं मधानं भरलेलं पोळं,जसं फुललेलं कमळ,जसं पुनवेचं चांदणं,जसा मलय गिरिवरचा चंदन,जसा आईचा मायेनं माखलेला हात,जसं ईश्वरी वरदान.
एवढी वर्षे झाली. पण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ अजून जन्माला यायचाय. आणि ९०३३ ओव्यांचं सारसर्वस्व ज्याच्यात आहे त्याचं नाव पसायदान. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीची संक्षिप्त आवृत्ती. पसायदान म्हणजे प्रसाद. विश्वात्मक देवाकडे ज्ञानदेवांनी प्रसाद मागितला. सज्जनांच्याविषयी प्रथम काहीच मागितलं नाही. प्रथम मागितले ते दुर्जनांच्या विषयी. खलवृत्तीच्या लोकांमध्ये असणारा खलपणा जाऊ दे. तो गेला म्हणजे ती माणसं चांगलीच आहेत. श्रीकृष्णाने सांगितलं,सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन हे माझे कार्य आहे. कृष्ण भगवंताने सुद्धा सज्जनांना प्राधान्य दिले. ज्ञानदेवांनी मात्र दुर्जनांतील दुष्टावा जावा याला महत्व दिलं.
जो मुलगा दुबळा आहे किंवा त्याच्यात काही न्यून आहे त्याच्याबद्दलच आईला विशेष प्रेम असतं. त्यामुळे जे सज्जन आहेत ते तरतीलच. परंतु दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कोण तारणार? इतके कृपाळू आहेत माऊली. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे’ ते अशा अर्थाने. विश्वात्मक देवाकडे ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असं मागणे मागितले. संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचन जर शक्य झाले नाही तर ज्ञानदेवांचे पसायदान हे फक्त नऊ ओव्यांचे ते वाचावं. मुखाने नित्य म्हणावं ९००० ओव्यांचं सार म्हणजे पसायदान. संत ज्ञानेश्वर महाराज हा अत्यंत आवडीचा असा विषय आहे.
खूप चांगला रस्ता तयार झाला आहे. बरीच कामे झाली आहेत. प्रवास खूपच सुसह्य झाला आहे. गर्दी फार नाही. बांद्राभान घाट हे मध्यप्रदेशातील बुदनी, सीहोर जवळ, नर्मदा नदीच्या किनारी असलेले एक पवित्र ठिकाण आहे, जेथे धार्मिक विधी आणि नर्मदा स्नान केले जाते, याला धार्मिक महत्त्व असून ते शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे धार्मिक यात्रा करणाऱ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि तेथे मंदिरांचे अस्तित्व आहे. बांद्राभान घाट इथे तवा आणि नर्मदा नदीचा संगम आहे. घाटावर स्नान आरती करून, सायंकाळी साडेपाच वाजता जबलपुरच्या हॉटेलच्या दारात होतो.
सायंकाळी ग्वारी घाटावर निघालो. येथील सुश्राव्य मय्या आरती हा एक सुखद अनुभव आहे. गर्दी असून सुद्धा प्रत्येकाला आरती हातामध्ये देत होते. अतिशय सुमधुर आवाजात तालासुरात आरती व मंत्र पठण होत होते. आरती ऐकणे व पाहणे दोन्हीही सुखावह होते. आरती सुरू असताना नदीमध्ये विद्युत रोषणाई केलेल्या छोट्या छोट्या बोटीतून लोक आरतीचे अवलोकन करत होते. नंतर कणकेच्या दिव्यांनी मैय्याला औक्षण पण करायला मिळाले. प्रवासाचा शीण गेला. इथे मात्र भरपूर थंडी होती. सगळं मय्या कृपेने छान चाललं आहे.
मुक्काम जबलपूर.हॉटेल रिजन्सी.
जबलपूरची भाजी मंडई खूप मोठी आहे.राज्य कृषिप्रधान आहे. नर्मदेच्या कृपेने उत्तम शेती होते.विंध्य आणि सातपुडा पर्वतामुळे पाणी कितीही वाढले तरी तिला पूर येत नाही ती मर्यादेत वाहते. त्यामुळे तिला मध्यप्रदेशची जीवनदायिनी असे म्हणतात. जबलपूरात खूप छान घट्ट कवडीचे दही मिळते. आरती तथा बालभोग झाला.
जबलपूर मध्ये मध्यप्रदेशाचे उच्च न्यायालय आहे. राजधानी भोपाळ तर सांस्कृतिक राजधानी इंदोर आहे. जबलपूरला चारी बाजूंनी मिलेट्रीचा तळ आहे. ते मोठे जंक्शनही आहे. इथे आर्मीला लागणाऱ्या उपकरणांचे मोठे कारखाने आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची वस्ती जास्त आहे.
इथून भेडाघाट 14 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु परिक्रमेमध्ये तो नर्मदा नदी ओलांडायची नसल्यामुळे दक्षिणतटावरून न पाहता उत्तरतटावरून पहायचा असतो. दोन्हीकडूनही सौंदर्यवती मनोहारी नर्मदेचे धुवाधार रूपच पाहायला मिळते. अमरकंटकच्या उगमापासून ते अरबी सागरामध्ये विलीन होईपर्यंत प्रत्येक घाटावरती नर्मदा पूजनीय आहे. ज्येष्ठातील गंगादशहराच्या वेळी नर्मदेचे स्नान फार पवित्र मानले जाते. कारण त्यावेळी गंगा, यमुना, सरस्वती, सारख्या पवित्र नद्या तिला भेटायला आलेल्या असतात अशी मान्यता आहे. मेकल पर्वतावर उगम पावलेली नर्मदा उत्तरतटावर विंध्य तर दक्षिणतटावर सातपुडा पर्वतरांगांच्या मधून वाहते.
घुघवा या स्थानी गेलो म्हणजे परिक्रमा एका वैज्ञानिक वळणावर जाते. नर्मदेचा उगम आजपासून किमान साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाला आहे इथल्या जीवाश्म राष्ट्रीय उद्यानात याचे दाखले आहेत. जीवाचे अश्मात रूपांतर होणे म्हणजे जीवाश्म. घुघवा राष्ट्रीय जीवाश्म उद्यान (Ghughua National Fossil Park) हे मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात असलेले एक अद्वितीय ठिकाण आहे, जिथे ४ ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या (जुरासिक आणि क्रेटेशियस कालखंडातील) वनस्पतींचे (झाडे, पाने) दुर्मिळ जीवाश्म जतन केले आहेत, जे पृथ्वीच्या प्राचीन वनस्पती जीवनाची साक्ष देतात आणि हे भारतातील पहिले जीवाश्म उद्यान मानले जाते, असे ETV Bharat आणि जिल्हा दिंडोरी यांसारख्या स्रोतांमधून समजते. पृथ्वीच्या प्राचीन काळातील वनस्पतींच्या प्रजाती आणि त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे हा या उद्यानाचा मुख्य उद्देश आहे.
जगाच्या पाठीवरची सर्वात वेगवान व प्राचीन नदी म्हणजे नर्मदा. अविनाशी पित्याची अविनाशी कन्या म्हणजे नर्मदा. तिच्या सहवासात आजही कितीएक साधू संत स्वत:ला आणि तिला जाणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण राजयोगात बसने तिची परिक्रमा करत आहोत. सगळी सुखं हातात घेऊन. यालाच भाग्य म्हणतात. मनाला पटलं.
पुढे जोगीटिकरिया या ठिकाणी स्नान करून भोजन घेतलं. अगदी तिच्या काठावर. छान मय्या किनारा आहे. पाण्याला वेग आहे. या किनाऱ्याचं सुख इथं आल्याशिवाय कळत नाही. एकूणच जबलपूरपासून पुढे अमरकंटकला जाताना रस्त्याच्या दुतर्फा विपुल झाडी आहे. लोकवस्ती विरळ होत जाते.वाहतूक कमी. रस्ते अत्यंत सुंदर. आणि अशा निसर्ग संपन्न रस्त्याने प्रदूषण मुक्त वातावरणात होणारा आपला प्रवास. सगळंच विस्मयकारी. पुढे एकुणात खूप खूप आनंदात अमरकंटकला मुक्कामी पोचलो. सर्वोदय हॉटेल. हॉटेलच्या मागच्या बाजूलाच नर्मदा मय्याचा रामघाट होता. संध्याकाळी तिथे गेलो. कणकेचे दिवे लावले. तिला औक्षण करून आलो.
अमरकंठ मे बिराजत, घाट न घाट पुजावत, कोटी रतन ज्योती..ओम जय जगदानंदी…
असं गुणगान करत श्री नर्मदा मय्येच्या उगमस्थानाजवळ बसच्या परिक्रमेत मय्या कृपेने मुक्कामी पोचलो. श्री नर्मदा मैया जगदानंदी आहे. समस्त जगतास ती आनंद प्रदान करते. किती भाग्यवंत आहे अमरकंठ क्षेत्र. आणि किती पुण्यवान आहे मेकल पर्वत. जेथे साक्षात शिव हलाहल प्राशन केल्यानंतर दाह शमविण्यासाठी आले.
समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल पिऊन होणारा दाह शमविण्यासाठी नारदानी शिवाला पृथ्वीवरती मेकल पर्वतावर पाठवले असे म्हणतात. मेकल पर्वतावर साल वृक्षांचे घनदाट जंगल आहे. या वृक्षांचे आयुष्य शंभर वर्षे असते. त्यानंतर ते वृक्ष आपोआप उन्मळून पडतात. परंतु परत जर त्यांना पाणी मिळाले तर परत शंभर वर्षे आयुष्याच्या जगतात. त्यांचा शीतल वायू आणि शीतल छाया यांच्या सानिध्यामुळे शिवाचा दाह शमन झाला असे म्हणतात. शिवाला मेकल पर्वतावर आराम मिळत असताना त्याचा घाम कंठात गोळा झाला आणि धारेच्या रूपात बाहेर पडला तीच नर्मदा होय अशी दंतकथा आहे. तिचा उगम रथसप्तमीला झाला म्हणून त्या दिवशी तिच्या दोन्ही तीरावर नर्मदा जयंती उत्साहात साजरी केली जाते. तिच्या उगमस्थानी म्हणजे अमरकंटक येथे तिची विलोभनीय अशी स्वयंभू मूर्ती आहे. ती शिवाची मानसकन्या आहे. आपल्या वेगवान, हट्टी आणि लाडक्या अशा लेकीला नजरेसमोरच ठेवण्यासाठी शिव तिच्या समोरच अमरकंटक मध्ये अंतर्धान झाले आणि तो अमरकंटेश्वर या रुपाने तिच्या मूर्ती समोरच विराजमान आहेत.
रेवा कुंडात जे पाणी आहे ते नर्मदा जल आहे अशी मान्यता आहे. नर्मदा जल रूपात आहे. पृथ्वी, आप, तेज,वायु आणि प्रकाश या पंचतत्वांमधील सर्वात शक्तिमान तत्व म्हणजे जल तत्व.
जायते यस्मातच लोयते यास्मिन इति जल.
नर्मदेच्या केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो म्हणून रेवाकुंडाची निर्मिती केली आहे. पुढे कोटीतीर्थ, रामघाट, पुष्कर बांध, आदी स्थानावर मय्येस, भूगर्भातील पाण्याचा स्तर वाढवणे आदी कारणास्तव रोखून धरले आहे. परंतु ज्याप्रमाणे लहान बाळास भूक लागली तर आईने पाठ चाटवून बाळाचे पोट भरत नाही, त्यासाठी बाळास आईने स्तनापाशीच घ्यावे लागते. तद्वत रेवा कुंडात इथून तिथून नर्मदा जल आहे हे जरी खरे असले तरी आपल्या सारख्या सामान्य जनांना हात जोडण्यासाठी पूजा अर्चा करण्यासाठी नेमकी जागा हवी होती. त्या जागेची स्थान निश्चिती करण्यासाठी आद्यगुरु शंकराचार्य अमरकंटक येथे आले. त्यांना नर्मदेच्या अस्तित्वाची सर्वाधिक स्पंदने ज्या ठिकाणी जाणवली त्या ठिकाणी रेवा कुंडाच्या तळाशी त्यांनी एका शिवलिंगाची स्थापना केली. त्याला मुख्य उगमस्थान असं नाव दिलं. शिवलिंगाभवती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिर उभारलं आणि मंदिरावर सव्वा किलो सोन्याचा कळस चढविला. शिवलिंगावर नर्मदा जलाचा अखंड अभिषेक होत असतो.
श्री नर्मदा मय्या वैराग्याची अधिष्ठात्री आहे. किती एक साधुसंत मुनिवर ऋषी मुनी अवलीये स्वतःला आणि श्री नर्मदेला जाणण्याचा प्रयत्न अनादि अनंत काळापासून तिच्या दोन्ही तटांवर करत आहेत. अमरकंटक हे क्षेत्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या अगदी सीमेवर मध्यप्रदेशात आहे याची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे एक हजार ५१ मीटर किंवा तीन हजार फूट आहे. इथं आजही साल वृक्षांचं घनदाट जंगल आहे. अमरकंटक हे तीर्थक्षेत्र आहे आणि तसेच ते थंड हवेचे ठिकाणही आहे. इथे वर्षभर परिक्रमावासी आणि पर्यटक यांची गर्दी असते. अमरकंटक हे क्षेत्र उत्तर तटावर वसलेले आहे. आता ते दक्षिण तटावरही विस्तार पावत आहे.
उगमापासून पुढे सलग आठ किलोमीटर बाल स्वरूपातील मय्या मेकल पर्वताच्या अर्थात भगवान शिवाच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत, नाना प्रकारच्या बाललीला करत कपिलधारेकडे झेपावली. इथं दक्षिणतटावरील सातपुडा व उत्तरतटावरील विंध्याचल हे दोन पर्वत अर्थात मय्येचे दोन्ही बंधू तिच्या स्वागतासाठी तिला सामोरे आले आहेत. उगमाजवळील कपिलधारेपाशी मय्येचं अगाध रूप जाणण्यासाठी व तपाचरण करण्यासाठी साक्षात मुनिवर्य कपिल आले आहेत. कपिलमुनींची तपश्चर्या आपल्याला ज्ञात आहेच. सगराच्या हजार पुत्रांनी आपला अश्वमेघ घोडा कपिलमुनींनी ठेवून घेतला आहे असा गैरसमज करून घेतला आणि त्यांच्याबरोबर युद्ध केले. तेव्हा आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडून त्यांनी सगराचे हजार पुत्र आणि हजार अश्व एका क्षणात गंगासागर येथे मारून टाकले. त्यावेळी सगर राजा त्यांना शरण आल्यानंतर त्यांनी त्याच कमंडलूतील पाणी शिंपडून त्यांना जिवंत केले अशी अख्ख्यायिका आहे. असे सामर्थ्यवान महर्षी कपिल नर्मदा किनारी बाल नर्मदेला जाणायला आले. बाल स्वरूपातील मय्येस जाणता जाणता त्यांनी घोर साधना केली व त्यांचे चरण ठसे तिथल्या पाषाणात उमटले. तिथे नर्मदा जवळ जवळ 25 मीटर खाली वेगाने झेपावते ती मनोहर आणि अतिसुंदर कपिलधारा. इथेच जरा पुढे दुर्वास ऋषी आले त्यांनीही नर्मदा किनारी साधना करत असताना दुग्धधारेच्या रूपात नर्मदेने त्यांना दर्शन दिले. दुर्वास ऋषींची गुफा तेथे आहे. धुनी सुद्धा आहे.दुर्वास ऋषींना नर्मदेने कामधेनुच्या रूपात दर्शन दिले असे म्हणतात.
जगत कल्याणासाठी ती अशीच पुढे वाहत राहिली तेव्हा तिला वाटेमध्ये तुरळ, चक्रा अशा नद्या मिळत गेल्या आणि तिचा प्रवाह जोगीटिकरिया पर्यंत पुष्ट होत गेला. तिथेही स्नान करायची संधी मिळाली.
अमरकंटक परिसरात ठाड पठार येथे उगम पावलेली नर्मदेपेक्षा प्राचीन अशी बुडणेर नदी देवगाव संगम येथे पायी परिक्रमण करणाऱ्यांना भेटत असते. मध्यप्रदेश येथे महाराष्ट्र मंडला येथे बंजर नदी नर्मदेला भेटते तिथे फार मोठे बर्गी धरण बांधलेले आहे. पुढे जबलपूरला ग्वारी घाटात मात्र तिला नैसर्गिक उतार लाभल्याने ती अतिशय खोल आणि चंचल झाली आहे. भेडाघाटात धुवाधार धबधब्यात तिच्या पात्रामध्ये किंवा काठावरती असलेले खडक पाहून गो. नी. दांडेकर म्हणाले की, ‘हे खडक म्हणजे तिच्या पात्रात पहूडलेले हत्ती आहेत आणि ते सोंडेने पाणी उडवत आहेत’. आणि तिच्या रौद्ररूपाला घाबरूनच ते भीतीने पांढरे फटक पडले आहेत असे त्यांना वाटले. भेडाघाटावर संगमरवर खडक आढळतात तिथे ती वीस बावीस मीटर खोल भयानक स्वरूपात कोसळत असते. नेमावर नंतर येणाऱ्या पुनासा धरणात नर्मदा अडवली आहे तिला इंदिरा सागर जलाशय असे म्हणतात. ओंकारेश्वरला तिच्यावरती ओंकारेश्वर परियोजना धरण बांधले आहे. इथे तिचा आकार ओम सारखा दिसतो. पुढे बडवाणी दिशेने जाताना तिला वाटेत चोरल, वेदा, माण या नद्या येऊन मिळतात. मध्यप्रदेशातील शेवटचे गाव खाराबादल आहे. महाराष्ट्राच्या सुरुवातीला असलेले गाव भादल. गुजरात मधील सरदार सरोवर धरणामुळे मणीबेली हे गाव 185 फूट खाली धरणात गेले आहे. बडवाणीचे देऊळ पाणी कमी झाले झाले की बाहेर येते पण मणीबेलीचे शूलपाणीश्वर देऊळ मात्र कायमस्वरूपी पाण्यात गेले आहे. गुजरात मधील या धरणाच्या पुढे पन्नास किलोमीटर नंतर अरबी सागराला नर्मदा जाऊन मिळते. तिला भेटण्यासाठी समुद्र महाराज 21 किलोमीटर पुढे आले आहेत. त्या जागेला खंबातचे आखात म्हणतात. जिथले मोती प्रसिद्ध आहेत
भृग कमंडल या ठिकाणी भृग ऋषी आले.इथेच टेम्बे स्वामी आले.मग मूळ स्वरूप मय्येचे नेमकं आहे तरी कसं? याचा शोध घेण्यासाठीच तर अनादी काळापासून नर्मदेची परिक्रमा करण्याचा प्रघात पडला आहे. मय्याकाठ ही तपोभूमी आहे. नर्मदा अवधूतांची माता आहे. जल व बाल स्वरूपातील मय्येस जाणण्यासाठी स्वर्गीय देव व दत्त संप्रदायातील सर्व अधिकारी महात्मे मय्येवर आले.
निमित्त मात्र अमरकंटक झाले. अमर कंटक धन्य झाले. मय्येचे उगमस्थान झाले. इथेच मय्या बालपणी माईकी बगिया येथे खेळली. तिथे तिचे चरणोदक सापडले. इथेच माईचा विवाह ब्रम्हपुत्र शोण यांचेशी ठरला होता. हा नद आहे. लग्नासाठी वऱ्हाडी मंडळी अमरकंटकला आली. पण नर्मदेने अजूनही नवऱ्या मुलाला पाहिलेले नव्हते. तिने तिची मैत्रीण जुहीली हिला सांगितले की तू जाऊन नवरा मुलगा कसा आहे ते पाहून ये. मी तर तुझी दासी आहे माझे कपडे असे साधे आहेत ते लोक मला आत सुद्धा घेणार नाहीत. पण नर्मदा हट्टी होती तिने आपले वधूचे कपडे तिला घालायला लावले आणि वरपक्षाकडे पाठवले. तिला येताना पाहून त्या मंडळींना वधूच आली आहे असे वाटले आणि शोणाने तिच्याच गळ्यात वरमाला घातली. ही बातमी समजताच नर्मदा क्रोधायमान झाली आणि तिचे ज्वालेत रूपांतर झाले.तिने संपूर्ण वऱ्हाड आणि लग्नाचा मंडप जाळून खाक केला. हे सर्व समजताच शिव तेथे अवतीर्ण झाले. ज्वालेश्वर रूपामध्ये. नर्मदेचे प्रारब्ध जगत कल्याणाचे होते. विवाह योग मय्येच्या भाग्यात नव्हता. म्हणून तर कुमारी कन्यकांच्यामध्ये मय्येस पाहण्याची रीत प्रचलित झाली. नंतर पुढे नर्मदा आणि शोण यांची कधीच भेट झाली नाही. दोघेही एकमेकांना समांतर वाहत राहिले आणि नर्मदा अरबी समुद्राला तर शोण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाला. जिथे जुहीली नदीचा उगम आहे तिथेच ज्वालेश्वर मंदिर पण आहे.
इथेच भृगु ऋषी आले..दुर्वास ऋषी आले.. कपिल मुनी आले...टेंबे स्वामी आले....शंकराचार्य आले..कबीर आले. इथेच शिव आपल्या लेकीला आपल्या पुढ्यात घेऊन बसले. इथे मनमोहक कपिलधारा आहे दुग्ध धारा आहे. शंभूधारा आहे. दुर्गा धारा आहे. नर्मदा, शोण व जुहीला या नद्यांची उगमस्थाने आहेत. माईका मंडप आहे.या स्थानी माईस भेटायला आजवर किती साधू संत आले काही गणती आहे का? पण एक आहे ही सर्व अनवट जागेवरील अतिसुंदर स्थाने बघण्यासाठी वेळ द्यावा लागतो व कष्ट ही पडतात..
अमरकंटक क्षेत्रास सादर प्रणाम. कारण जगत कल्याणासाठी आपली मय्या सर्वप्रथम इथेच अवतरली.. अमरकंटक धन्य जाहले.पंढरपूर नगरीत जसे पांडुरंगाचे महत्व आहे त्यापेक्षा ज्या विटेवर देव उभा राहिला त्या विटेचे भाग्य थोर आहे. कारण जगजेठी परमात्मा तिच्यावर पाय ठेऊन उभा राहिला आहे व त्याच्या चरणांचे दर्शन घेताना आपसूकच त्या विटेचेही भक्तीभावाने दर्शन घडते.
किती ग पुण्य केलं तू तर कुंभाराच्या विटे.
विठू दयाळाची माझ्या चरणे सापडली कुठे.
अमरकंटक यथासांग तट परीवर्तन पूजा झाली. बरोबर आणलेल्या नर्मदा जलातील निम्मे जल रेवाकुंडात घालून तिथल्या जलाने बाटली भरून घेतली.
अमरकंटक ते धुव्वाधार दक्षिण तटावर
कल्याण सेवा आश्रम अमरकंटक ही एक प्रसिद्ध आणि शांततामय आध्यात्मिक केंद्र आणि धर्मादाय संस्था आहे. या आश्रमाची स्थापना १९७८ मध्ये बाबा कल्याणदासजी यांनी केली. आश्रम मानवतावादी कार्ये, सामाजिक कल्याण सेवा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. यात गरजू लोकांना अन्न, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर आवश्यक सेवा पुरवण्यासारख्या अनेक धर्मादाय उपक्रमांचा समावेश आहे. आश्रमाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात भगवान श्रीकृष्णाचे एक सुंदर आणि मुख्य मंदिर आहे, जेथे नियमित पूजा आणि आरती केली जाते. परिसर अतिशय रम्य, स्वच्छ आणि नयन मनोहर आहे.
आज भल्या पहाटे उठून सर्व आन्हिके उरकून माई की बगिया येथे गेलो.खूपच प्रसन्न वातावरण आहे. माई की बगीया या स्थानी जाताना काही एक चालावं लागतं. येथे आंब्याची उंच उंच झाडे आहेत. सालाचं घनदाट जंगल आहे,खेळता खेळता मय्येचे चरण जिथे पडले तेथे तिच्या चरणातून उदक बाहेर पडले ते हे स्थान त्यास चरणोदक कुंड असं म्हणतात. इथून मय्या गुप्त स्वरूपात मुख्य उदगम स्थानापर्यंत वाहते असा समज आहे.
त्यामुळे याहीस्थानी आपण मय्येस न ओलांडण्याची काळजी घेतो. इथे बालमय्या आहे. मय्या या ठिकाणी लहान असताना तिची मैत्रीण गुलबकावली बरोबर खेळण्यासाठी येत होती अशी आख्यायिका आहे.
पुढे शोण नदीचे उगमस्थान आहे. सोनाक्ष नावाचं देवीचं देऊळ आहे. भले मोठे हनुमंत राय आहेत. इथे वानरसेना फार मोठ्या प्रमाणात होती.
अमरकंटक येथेच दक्षिण तटावर यशोधनचे सेवाकेंद्र आहे. यशोधनच्या सेवाकेंद्रात गेलो. तिथं बालभोग झाला. सर्वांचं छान स्वागत केलं. केंद्राच्या समोर नर्मदेचे पात्र आहे. आज सर्वांनी तिथेच स्नान केले. देवकर मावशी आणि काका सेवेचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना उत्तम सेवाकार्य करत आहेत. सेवाकार्याचे सर्वांनी कौतुक केले. सर्वांना सेवाकेंद्रात आवर्जून सेवेसाठी तसेच माहेर पणासाठी येण्याचं पुनः पुन्हा आवाहन केल गेलं.
पुढे कबीर चबुतरा पाहिला.
कबीर चबुतरा हे स्थान छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. नर्मदेच्या काठावर १५ व्या शतकात वाराणसीचे साधू संत कबीर जगन्नाथपुरीला जात असताना आल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी त्यांनी निर्जन जंगलात संतसमागम करण्याचं ठरविलं होतं.
ही वार्ता श्री नर्मदामाईस समजली. तिने स्वप्नात येऊन कबीरजींना विचारलं. मी तुमच्या सत्संगात येऊ का? अर्थातच कबीरजींना अत्यानंद झाला. त्यांनी अत्यंत श्रद्धेने येण्याचे निमंत्रण दिले. पण मय्याजी आपण कुठल्या रुपात याल हे सांगावं. असा प्रश्न विचारला, तेव्हा नर्मदामाई म्हणाली,या ठिकाणी जो झरा वाहतो आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची दुधासारखी शुभ्र धारा दिसेल ती मी स्वतः. अशा अर्थाने कबीरजी यांच्या भेटीसाठी मैया कबीर चबुतरा येथे आली अशी मान्यता आहे.
दुपारी हनुमान मंदिरात भोजन घेतले. खर्रा घाट येथे या स्थानी पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना चहा, नाश्ता,भोजन निवास व्यवस्था दिली जाते. मजल दरमजल करत चहा, खाऊ घेऊन मुक्कामी आलो.
आज हरदा येथे मुक्कामी आलो असता केवळ आणि केवळ अनपेक्षित पणे कार्यकर्त्यांचे आणि १०० व्या परिक्रमेत सहभागी झालेल्या सर्व बाबाजी आणि माताजींचे अभिनंदन आणि अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि मनापासून शुभेच्छा देण्यासाठी म्हणून प्रतिभा चितळे माताजी, सुधीर चितळे बाबाजी, हिना ताई,तिचे यजमान आणि त्यांचे सेवेकरी आवर्जुन उपस्थित राहिले. याचा खूप खूप आनंद वाटला. आपण भरून पावलो. हीना तर मिरजेची आणि सुखदची बालमैत्रिण. दोघींना या भेटीचा अपूर्व आनंद झाला. सुखद मुळे हा सुंदर योग घडून आला. आपल्या मैत्रिणीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा मय्याने पूर्ण केली.
प्रकाशदादा म्हणाले, १०० व्या परिक्रमेतील हा परमोच्च आनंदाचा क्षण आहे. चितळे बाबाजी आणि माताजी यांचे चरणी नतमस्तक आहोत. श्रीनर्मदा कृपा अपार आहे आणि आपण सर्वजण कृपांकित आहोत.
सयाजी हॉटेल हरदा.
दुपारी हनुमान मंदिरात भोजन घेतले. खर्रा घाट येथे या स्थानी पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना चहा, नाश्ता,भोजन निवास व्यवस्था दिली जाते. मजल दरमजल करत चहा, खाऊ घेऊन मुक्कामी आलो.
आज हरदा येथे मुक्कामी आलो असता केवळ आणि केवळ अनपेक्षित पणे कार्यकर्त्यांचे आणि १०० व्या परिक्रमेत सहभागी झालेल्या सर्व बाबाजी आणि माताजींचे अभिनंदन आणि अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि मनापासून शुभेच्छा देण्यासाठी म्हणून प्रतिभा चितळे माताजी, सुधीर चितळे बाबाजी, हिना ताई,तिचे यजमान आणि त्यांचे सेवेकरी आवर्जुन उपस्थित राहिले. याचा खूप खूप आनंद वाटला. आपण भरून पावलो. हीना तर मिरजेची आणि सुखदची बालमैत्रिण. दोघींना या भेटीचा अपूर्व आनंद झाला. सुखद मुळे हा सुंदर योग घडून आला. आपल्या मैत्रिणीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा मय्याने पूर्ण केली.
प्रकाशदादा म्हणाले, १०० व्या परिक्रमेतील हा परमोच्च आनंदाचा क्षण आहे. चितळे बाबाजी आणि माताजी यांचे चरणी नतमस्तक आहोत. श्रीनर्मदा कृपा अपार आहे आणि आपण सर्वजण कृपांकित आहोत.
सयाजी हॉटेल हरदा.
हरदा ते ओंकारेश्वर
काल रात्री हरदा येथे मुक्कामी पोहोचलो.
धुवाधार धबधबा हा मध्यप्रदेशातील जबलपूर जवळ भेडाघाट येथे नर्मदा नदीवर आहे, जो त्याच्या धुक्यासारख्या पाण्याचा वर्षावामुळे 'धुवाधार' (धुके/धुंद) ओळखला जातो, आणि सुमारे ३० मीटर (९८ फूट) उंचीवरून कोसळतो, जिथे संगमरवरी खडकांमधून वाहणारी नर्मदा नदी एक अद्भुत दृश्य निर्माण
करते. धुक्यासारखा पाण्याचा वर्षाव, ज्यामुळे याला 'धुवाधार' नाव मिळाले आहे. धबधबा नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे तयार झाला आहे आणि त्याचे पाणी खाली पडताना धुक्यासारखे दिसते, म्हणून तो धुवाधार म्हणून ओळखला जातो. नदीच्या दोन्ही तटावरून तो पाहता येतो. नर्मदेचे रौद्र पण नयन मनोहर रूप पाहीले. तिथे भरपूर फोटो काढले. परत प्रवास सुरू.
हरद्याच्या वाटेवर प्रकाशदादांनी टेंबे स्वामींचे पट्ट शिष्य रंगावधूत महाराज व गुळवणी महाराज यांच्यापैकी गुळवणी महाराजांचे संस्मरण केले.
गुळवणी महाराज जन्म २३/१२/१८८६ रोजी तारळे गावात झाला. त्यांच्या आई उमाबाई यांना बापू नरहर गोविंद अशी तीन अपत्ये आधी झालेली होती. चौथ्या वेळी त्या गरोदर असताना त्यांना आपल्याला दत्त संप्रदायी मुलगा व्हावा असे डोहाळे लागले होते. ते उभयता प्रत्येक पौर्णिमेला घोड्यावरून नरसोबावाडीला जात असत. चौथ्या वेळी गरोदरपणे त्या अवघडलेल्या असताना दत्तभट एकटेच नरसोबावाडीला गेले तेव्हा त्यांना दर्शन घेऊन प्रार्थना करत असताना दत्तगुरु आपल्याशी बोलत आहेत असा भास झाला. ते म्हणत होते की मी तुझ्या घरी जन्माला येईन आणि इकडे गावाकडे उमाबाई झोपलेल्या असताना एक यती पुरुष घाईघाईने हातात एक पुडके घेऊन आला आणि त्यांच्या उषाजवळ ठेवून गेला. त्या पुडक्यामध्ये दत्ताच्या चांदीच्या पादुका होत्या ज्यांना एक सुंदर सुगंध येत होता. त्यावेळी त्यांना जो पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी वामन असे ठेवले. हा संस्कृत पंडितही होता आणि उत्तम चित्रकार होता. हेच पुढे गुळवणी महाराज झाले. त्यांचा मोठा भाऊ बापू हा टेंबेस्वामींचा शिष्य होता त्याने एकदा स्वामींना आपल्या भावाच्या चित्रकारीच्या कौशल्याचे वर्णन सांगितले तेव्हा टेंबे स्वामींनी लगेच एक पोस्टकार्ड वामनाच्या नावाने लिहिले व त्यात असे लिहिले की हे पत्र जेव्हा तुझ्या हातात पडेल तेव्हा तू डोळे मिटून बैस आणि तुझ्या डोळ्यासमोर दत्ताची जी प्रतिमा साकार होईल तिचे तू चित्र काढ. त्याप्रमाणे वामनाने ते चित्र काढले आणि तो तातडीने ते चित्र घेऊन वाडीला टेंबे स्वामींच्याकडे आला. त्यांनी त्याला चांदीचा ताबित बांधून अनुग्रहित केले. त्या दिवशी गुरुद्वादशी होती. नंतर प्रत्येक गुरुव्दादशीला वामन वाडीला येत असे. ते चित्र आजही नल स्टॉप पुणे येथील वासुदेव निवास या त्यांच्या मठामध्ये पुण्याला लावलेले आहे.
एकदा टेंबे स्वामी तुंगभद्रेच्या किनारी त्रिपुरांतकेशवरांच्या देवळात चातुर्मासासाठी गेले होते. तिथे जाऊन वामनांनी त्यांची सेवा केली. त्यावेळी निरोप घेताना ते त्यांना म्हणाले की, तुझी आणि माझी भेट आता वैनगंगा नदीच्या काठी पवनी नावाचे गाव आहे तिथे होईल. त्यावेळी तू आई आणि बहीण दोघींनाही घेऊन ये. तिथे टेंबे स्वामींनी त्यांना अनुग्रह दिला. तिथेच तीन शिरे सहा हात अशा दत्तरुपात दर्शनही दिले आणि त्यांना म्हणाले की तू आता मध्यप्रदेशात हौशंगाबाद खर्राघाट येथे जा तिथे स्वामी लोकनाथ तीर्थ तुझी वाट पाहत आहेत. ते तुला शक्तिपात दीक्षा देतील. बंगालचे सत्पुरुष स्वामी लोकनाथतीर्थ यांनी पूज्य गुळवणी महाराज यांना शक्तीपात दीक्षा दिली. त्यांची कुंडलिनी जागृत केली.
या शक्तीचा उपयोग महाराजांनी जगत कल्याणासाठी केला. गुरुताई सुगंधेश्वर, दत्त महाराज कवीश्वर, मामासाहेब देशपांडे, हरीशचंद्र जोशी आदींना महाराजांनी ही दीक्षा दिली होती. गुळवणी महाराजांनी टेंबे स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे अनेक जाडजूड प्राकृत ग्रंथ लिहिले. आजन्म दत्तसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचे ग्रंथ अजूनही पुण्यातील वासुदेव आश्रमामध्ये उपलब्ध आहेत.
त्यांचा निर्वाण दिवस त्यांना समजलेला होता. त्यादिवशी त्यांनी भोजनोत्तर त्यांच्या परिचयातील एका लहान मुलीला ‘क्षणभर उघड नयन देवा’ हे गाणे म्हणायला सांगितले. तिने गाणे म्हणायला सुरुवात केल्यानंतर दोनच मिनिटात त्यांना मृत्यू आला’
त्यांनी त्यांच्या शिष्यांकडून किंवा भक्तांकडून त्यांना मिळालेली बिदागी नरसोबाच्या वाडीला आणून नरसिंह सरस्वतीच्या पायावरती अर्पण केली. आज वाडीमध्ये चांदी आणि सोन्याची जी प्रभावळ आहे.. सर्व गुळवणी महाराजांची कृपा आहे.
हरदा या मध्यप्रदेशातील जिल्ह्याच्या गावातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेले पट्टाभिराम या नावाचे रामरायाचे मंदिर आज पाहिले.
मंदिर खरेचंच अप्रतिम असे आहे.या मंदिरात रामरायाच्या मांडीवर सीता मैया आहे. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे रामरायावर चवऱ्या ढाळत आहेत. शेजारी पटकन लक्षात येणार नाहीत परंतु वसिष्ठमुनी देखील आहेत. रामरायाच्या अभिषेकाचा हा सोहळा आहे असे वाटते.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जातीने उपस्थित राहून हे मंदिर सन १९०० मध्ये उभारले आहे. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आनंदसागर एकदा त्यांना म्हणाले की मला तुमच्या बरोबर काशीला यायचे आहे.परंतु महाराज त्यांना म्हणाले तुझ्या नशिबात तो योग नाही. आनंदसागर महाराज गोंदवलेकर महाराजांच्या आधी दोन वर्षे गेले. गोंदवलेकर महाराजांनी आनंदसागर महाराजांच्या अस्थी हरदा येथे ठेवाव्यात असे सांगितले होते. जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या अस्थी दरमजल करत हरद्यापर्यंत आणल्या गेल्या. तेव्हा त्यांच्याबरोबर आनंदसागर यांच्या अस्थिपण काशीला नेऊन विसर्जित करण्यात आल्या. महाराजांनी शिष्याची इच्छा लौकिकात नाही तर पारलौकिकात पूर्ण केली हेच खरे.
मजल दर मजल करत ओंकारेश्वर ला पोहोचलो. अंतर मोठं. वेळही खूप लागतो. शेवटच्या टप्प्यात अंतर उरकता उरकत नाही. परिक्रमा संपत आल्याची अनामिक हूरहूर मनात दाटून येत असते.
दुपारी भोजनोत्तर संकल्पपूर्तीची पूजा व प्रायश्चित्त कर्माची पूजा या दोन्ही पूजा गुरुजींनी आजच पूर्ण केल्या. वातावरण अतिशय प्रसन्न होते. पूजा झाली. प्रसाद आणि चहा झाला. बघता बघता संकल्प, जो याच ठिकाणी केला होता तो पूर्ण झाला. प्रायश्चित्त कर्म पूजा केली. आनंद झाला. समाधान वाटलं.
रात्री पुरणपोळीचं भोजन झालं. ब्राम्हण जेऊनि तृप्त जाहला असा कृतकृत्य भाव मनात आला. कृतज्ञ आहोत.
सकाळी ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दोघांचेही दर्शन घेतले व बाटलीतील नर्मदा जलाने दोघांनाही अभिषेक घालून ते जल संपवले. दर्शन घेऊन ओंकारेश्वरला हॉटेलकडे परत आलो तेव्हा यशोधनच्या संपूर्ण टीमने आमच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती फुलांची रांगोळी काढली होती. सर्वांसाठी पुष्पहार आणले होते. प्रकाशदादांनी ग्रुप फोटो काढले. सर्वांचीच अवस्था भावविभोर झाली होती. अशा तऱ्हेने नर्मदा परिक्रमेची यशस्वी सांगता करून इंदोर शहराकडे प्रस्थान केले. बस जेव्हा रेल्वेस्टेशनपाशी थांबली, तेव्हा सर्व प्रवाशांचे जड अंत:करणाने निरोप घेतले व आम्ही विन वे हॉटेलकडे मुक्कामासाठी आलो. आमचे विमान दुसऱ्या दिवशी म्हणजे एक तारखेला सकाळी होते.
संध्याकाळी इंदोर शहरात फेरफटका मारला व लालबाग पॅलेस, रणजीत हनुमान, बिजासनमाता जाऊन आलो. परिक्रमेच्या सुरुवातीला ज्यांचा आशीर्वाद घेतला होता, त्या नानामहाराज तराणेकर यांच्या मठात जाऊन त्यांच्या पादुकांचे पण दर्शन घेतले, रात्री सराफी बाजार मध्ये खादंती केली. दुसरे दिवशी सकाळी इंदोर ते गोवा विमानाने आणि गोवा ते बेळगाव टॅक्सीने प्रवास करून संध्याकाळी साडेसात वाजता बेळगाव मुक्कामी सुखरूप पोहोचलो. नर्मदे हर!
खरे तर परिक्रमा खूप लवकर संपली असेच वाटत होते. संपूर्ण प्रवासात प्रकाशदादांच्या मुखातून प्रत्येक ठिकाणाचे भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक,ऐतिहासिक महत्त्व ऐकत असताना एक वेगळीच अनुभूती येत होती. नर्मदेच्या प्रत्येक रूपाचे, प्रत्येक स्थानाचे त्यांना झालेले आकलन त्यांच्या बोलण्यातून साकार होत होते. त्यांचे फक्त वाचन अफाट नव्हते तर त्यांच्या व्यासंगाचे, त्यांना आलेल्या अनुभूतींचे दर्शन त्यांच्या प्रत्येक शब्दातून उलगडत होते. याचे कारण स्पष्ट होते. ते सर्व काल्पनिक नव्हते तर, वास्तव अनुभवातून आलेले भावपूर्ण, भक्तीपूर्ण आणि श्रद्धापूर्ण होते आणि ते नर्मदा मैयाचे कृपांकित होते.
यशोधन बरोबरची नर्मदा परिक्रमा हा निव्वळ प्रवास नसून खरोखरच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी आहे असे वाटले. ही परिक्रमा जितका आनंद देते तितकीच स्वपरिक्षणाची आणि स्वतःशी संवाद करण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध करून देते असे मला वाटत राहिले. भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही नर्मदा मैया आहे ही भावनाच,’जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे अनंत’ ह्या संत वृत्तीची जाणीव करून देते. प्रकाशदादांच्या निरूपणांमध्ये आणि नर्मदेच्या दर्शनामध्ये प्रत्येकाला अंतर्मुख करण्याची ताकद नक्कीच आहे याबद्दल कोणाचेही दुमत होणार नाही. मैया म्हणजे माऊली. त्यामुळे आपल्या ममतेने वात्सल्याने सर्वांना आपल्या कृपेचा आशीर्वाद देणारी ही नर्मदा आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहोत याबद्दल खरोखर विश्वास वाटत नव्हता. तिचे रूप साठवून घेण्यासाठी दोन डोळे पुरत नव्हते. परंतु तिच्या कृपेनेच हा सुवर्णयोग आयुष्यामध्ये चालून आला होता.
प्रकाशदादा, प्रमोद आणि त्यांचे एकूण एक सर्व सहकारी (विजय, विशाल, गौतम, समीर, शुभम, महाराज, मावशी, तोसीफ खान )यांच्या अथक प्रयत्नामुळे, निरपेक्षसेवेमुळे, प्रवासातील प्रत्येक क्षण आनंदी होत होता. उत्साह टिकून राहत होता. बस सुद्धा इतकी आरामदायी होती आणि बस चालक अतिशय समाधानाने संयमाने पण तेवढ्याच वेगाने बस चालवत होते. अगदी वेळेवर गरम गरम खाणे मिळत होते. प्रेमाने वाढणे म्हणजे काय याचे प्रत्यंतर येत होते. किचन टीम असो किंवा बस मधील सहकारी चमू असो प्रत्येक जण आपले काम वेळेवर, अचूक, मनापासून आणि आनंदाने करत होता हे यशोधनच्या यशाचे फार मोठे गमक आहे असे वाटते. प्रकाशदादांच्या नेतृत्वासाठी, नियोजनासाठी खरोखरच दाद दिली पाहिजे. परिक्रमेचे नियोजन, आयोजन शिस्तबद्ध आणि प्रशंसनीय होते त्याबद्दल शब्दांमध्ये कौतुक करणे खरोखरच अवघड आहे.
परिक्रमेची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रकाशदादांची बौद्धिके. परिक्रमेला ती एका वेगळ्याच उंची वरती घेऊन जातात. त्यांच्या नर्मदेवरील श्रद्धेमुळे, अनुभवातील सच्चेपणामुळे त्यांचे प्रत्येक कथन हे इतके मनाला भिडते की आपणही नर्मदामय होऊन जातो आणि ते वर्णन करत असलेले प्रसंग प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे वाटायला लागते. हे कौशल्य त्यांच्या वक्तृत्वामध्ये आहे. प्रत्येक परिक्रमेमध्ये असणाऱ्या समोरच्या विविध प्रकारच्या, प्रवृत्तीच्या मूर्तींना नर्मदा परिक्रमा समजावून सांगणे आणि ते ही तेवढ्याच श्रद्धेने आणि प्रेमाने, हे शिवधनुष्य प्रकाशदादांनी सहज लिलया पेलले आहे. परिक्रमेतील जाणवलेली आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे, या आधी ज्या ज्या मूर्तींनी यशोधन बरोबर परिक्रमा केली होती त्यातील अनेकजण आवर्जून प्रकाशदादांना भेटायला येत होते आणि त्यांचे सढळ शब्दांनी कौतुक करत होते. त्यांच्यावरील प्रेमाखातर कौतुकाने चितळे मैया आणि चितळे बाबा सुद्धा हरदा येथे उपस्थित राहिले, तेव्हा तर सगळेच परिक्रमावासी धन्य होऊन गेले. प्रत्यक्ष नर्मदेचे दर्शन सर्वांच्या पदरात पडले. लेपाला भारती ठाकूर मैया यांचा प्रत्यक्ष सहवास सुद्धा परिक्रमेत लाभला यापेक्षा भाग्य कोणते? गजानन विजय ग्रंथात दासगणू महाराज म्हणतात, ‘संत हेच भूमीवर चालते बोलते ईश्वर.’ या सर्वांच्या प्रत्यक्ष दर्शनाने मन आणि डोळे तृप्त झाले.
प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणाहून 42 मूर्ती आलेल्या. आधी ना ओळख ना परिचय. पण एकमेकांना एका अनामिक ऋणानुबंधाने जोडणारी ही परिक्रमा. एकमेकांशी सुसंवाद साधणारी, थोडी तडजोड, थोडी शिस्त, थोडा वक्तशीरपणा, समंजसपणा शिकवणारी ही परिक्रमा. शरीर ,समाज, वय, मान, पैसा, प्रापंचिक विवंचना या सर्व बेड्या तोडणारी ही परिक्रमा. पदोपदी माणुसकीचे दर्शन घडवणारी परिक्रमा. सेवाभाव आणि भक्ती यांच्या शक्तीची जाणीव करून देणारी ही परिक्रमा. स्वतःची स्वत:शी ओळख करून देणारी ही परिक्रमा. आणि या सर्वाचा महत्त्वाचा दुवा म्हणजे नर्मदा मैया. प्रवास फक्त प्रवास न राहता त्याचे साधनेत आणि यात्रेत रूपांतर करणारी.
माऊली म्हणतात, ‘एक तरी ओवी अनुभवावी’ त्याप्रमाणे खरोखरच ‘एकतरी परिक्रमा करावी’ असे वाटत राहिले.
नर्मदेची विविध रूपे डोळ्यात साठवत, महाराजांच्या प्रत्येक पदार्थाची चव जिभेवर रेंगाळवत, यशोधनाची शतकमहोत्सवी नर्मदा परिक्रमा सुफळ संपन्न झाली. आणि नर्मदेच्या अपार कृपेमुळे, आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालो याचा कृतार्थ भाव मनामध्ये ठेवूनच अतिशय जड अंत:करणाने घरी परत आलो. जरी घरी परतण्याची ओढ होती तरी प्रवास संपल्याची हुरहुर होती. नर्मदेच गारुड मनावरती आरुढ होतं.
अजूनही मन नर्मदेच्या किनारी रेंगाळत आहे. तिचा संथ प्रवाह डोळ्यासमोर तरळत आहे, तिच्या प्रवाहाचा खळाळता गाज कानामध्ये घुमत आहे, प्रकाशदादांची निरूपणे ऐकण्याची मनामध्ये अजूनही आस आहे, कदाचित ही शिदोरी आता आयुष्यभर पुरणार आहे. यशोधनचे आभार किती आणि कशाबद्दल मानायचे हेच समजत नाही. शब्दांमध्ये ते सामर्थ्य नक्कीच नाही. म्हणून फक्त कृतज्ञता व्यक्त करते आणि हा ऋणानुबंध असाच दृढ राहावा अशी नर्मदेच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना करते.
नर्मदे हर !!!
ही एक छोटी कविता, यशोधनच्या टीम करीता ,
तुमचं यश आणि कीर्ती, असेच बहरो सदाकरीता
ही शब्दांची गुंफण केली, आज यशोधनकरता ,
सचोटीचे तुमचे वर्तन, हाच आदर्श सर्वांकरता
कृतज्ञतेने हे वंदन, तुमच्या सर्व टीमकरता,
आम्ही सदैव तुमचे ऋणी, नर्मदापरीक्रमेकरीता.
नर्मदे हर ! नमामि नर्मदे !!
ॐ जय जगदानंदी, मैया जय आनंदकंदी, ब्रम्हा-हरि-हर-शंकर, रेवा हरि-हर-शंकर, रुद्री पालन्ती ।।
ॐ जय जगदानंदी ।।१।।
देवि ! नारद शारद तुम वरदायक, अभिनव पदचंडी, हो मैय्या !
अभिनव पदचंडी; सुर-नर-मुनिजन सेवत, सुर-नर-मुनिजन सेवत शारद पदवन्ती ।।
ॐ जय जगदानंदी ।।२।।
देवि ! धूम्रकवाहन राजत, वीणा वादयन्ती हो मैया, वीणा वादयन्ती ;
झुमकत, झुमकत, झुमकत, झननन, झननन, झननन, रमती राजन्ती ।।
ॐ जय जगदानंदी ।।३।।
देवि ! बाजत ताल मृदंगा, सुरमंडल रमती, हो मैया, सुरमंडल रमती ;
तुडितान, तुडितान, तुडितान, तुरडड, तुरडड, तुरडड, रमती सुरवन्ती ।।
ॐ जय जगदानंदी ।।४।।
देवि ! सकल भुवन पर आप बिराजत, निशदिन आनंदी, हो मैया !
सब जुग आनंदी ; गावत गंगाशंकर, सेवत रेवाशंकर, तुम भव मेटन्ती ।।
ॐ जय जगदानंदी ।।५।।
मैयाजी को कंचनथाल बिराजत, अगर कपूर बाती, हो मैया !
अगर कपूर बाती; अमरकंठ में बिराजत, घाटन-घाट पूजावत, कोटि रतन ज्योति ।।
ॐ जय जगदानंदी ।।६।।
मैयाजी की आरती निशदिन, जो कोई पढगावै, हो मैया !
जुग जुग पढ गावै, भजत शिवानंद स्वामी, भजत हरिहर स्वामी, मनवांछित फल पावै ।।
ॐ जय जगदानंदी ।।७।।
ॐ जय जगदानंदी, मैया जय आनंदकंदी, ब्रम्हा-हरि-हर-शंकर,
रेवा हरि-हर-शंकर, रुद्री पालन्ती ।।
ॐ जय जगदानंदी ।।८।।
श्री नर्मदाष्टकम् : सबिंदु - सिंधु - सुस्खलत्तरंग - भंग – रंजितम् | द्विषत्सु पापजात - जातकारि - वारि - संयुतम् ।कृतान्तदूत काल -भूत-भितीहारि - वर्मदे । त्वदिय - पाद पंकजं नमामि देवि नर्मदे ।।१।।
त्वदम्बुलीन-दिन-मीन-दिव्य-संप्रदायकम् | कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।। सुमच्छ-कच्छ-नक्र-चक्र-चक्रवाक शर्मदे |त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।२।।
महा-गभीर-नीर-पूर-पाप-धूत-भूतलम् |नमत्समस्तपात कारि दारितापदाचलम् ।। जगल्लये महाभये मृकण्डुसूनुहम्यदे |त्वदीय-पाद पंकजं नमामि देवि नर्मदे ।।३।।
गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा |मृकण्डुसुनू-शौनकासुरारीसेवितं सदा ।। पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे | त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।४।।
अलक्ष-लक्ष-किन्नरामरासुरादि पूजितम् |सुलक्ष-नीर-तीर-धीर-पक्षी-लक्ष-कूजितम् ।। वसिष्ठ-शिष्ट-पिप्पलादि-कर्दमादि-शर्मदे |त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।५।।
सनत्कुमार-नाचिकेत - कश्यपादिषट्पदै |धृतम् स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः ।। रवीन्दु-रन्तिदेव-देवराज-कर्म शर्मदे |त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।६।।
अलक्ष - लक्ष - लक्षपाप-लक्षसार-सायुधम् |ततस्तु जीवजन्तु-तन्तुभुक्ति-मुक्ति-दायकम् ।। विरिन्चि-विष्णु-शंकर-स्वकीयधाम्-वर्मदे |त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।७।।
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे | किरात-सूत-वाडवेषु पण्डिते शठे नटे ।। दुरन्त-पाप-ताप-हारि सर्व जन्तुशर्मदे |त्वदिय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।८।।
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा | पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।। सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवम् |पुनर्भवा नर न वै विलोकयन्ति रौरवम् ।।९।।
त्वदीय-पाद पंकजं नमामि देवि नर्मदे |त्वदीय-पाद पंकजं नमामि देवि नर्मदे |नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे | नमामि देवी नर्मदे । नमामि देवी नर्मदे
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमत्शड्.करभगवतः कृतं नर्मदाष्टकम् संपूर्णम् ।। श्री नर्मदे हर ।।