फ्रेंड सिक
फ्रेंड सिक
“मला सेव्हींग खाते उघडायचे आहे.” काऊंटरवर माझ्या समोर आलेली व्यक्ती म्हणते. मी कामाच्या घाईत, अकाऊंट ओपनींग फॉर्म त्याच्यासमोर ठेवत म्हटलं, “ठिक आहे. हा फार्म भरून द्या आणि कुणाची तरी ओळखीची सही आणा.” मान खाली घालून माझे काम पुढे सुरू. “ए, मला इथं तुझ्याशिवाय कोण ओळखणार, तूच कर ना सही.” माझ्या कानावर शब्द आले, त्यासरशी मला एकेरी संबोधणारा हा आगंतुक कोण, अशा रागातच माझी मान वर झाली. “अरे उमेश तू!” माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. कॉलेजमधला माझा मित्र ! तो बेळगावला नातेवाईकांपैकी कोणाच्यातरी लग्नाला आला होता. बँकेमुळे माझा पत्ता हुडकणं सोप गेलं असावं. १०-१५ वर्षापूर्वीची जुनी ओळख लक्षात ठेवून, माझा पत्ता हुडकत आणि तोही एक ‘मित्र’ समोर उभा ! मला खूप आनंद झाला. मी त्याला म्हटलं चल घरी जाऊया; पण “मला फक्त अर्धातास वेळ आहे. बाहेर कुठेतरी चहा घेऊ आणि गप्पा मारू, येशील ?” मी पटकन उठले. साहेबांना अर्ध्यातासात येते असं सांगून बाहेर पडले.
त्या अर्धा तासात आम्ही दोघंही १०-१५ वर्षे मागे गेलो. खूप जुन्या आठवणी, जुन्या मित्र मैत्रीणी! कोण कुठयं, काय करतयं, सगळ्या बातम्या उमेशनं पुरवल्या, तो आता बिझनेसमन झाला होता. लग्न, दोन मुलं. सगळं कौतुकानं सांगत होता. अजूनही त्याचं हसणं, बोलणं पूर्वी प्रमाणेच मोकळं मोकळं ! मी मात्र तुला आठवणीनं येऊन भेटलो, तू मात्र मिरजेला इतक्यांदा येऊन मला न भेटता जातेस. खरंच होतं ते. माझ मिरजेला जाणे तरी कुठे निवांत व्हायचे? काहीतरी कारण असेल तर जाणे व लगेच परतणे. स्वत:भोवतीच एक कोष मीच तयार करून आतल्या आत घुसमटत होते.
संसाराच्या व्यापात खरंच मी कितीतरी जुन्या मित्र- मैत्रीणींना विसरून गेले होते. आज उमेश समोर आला म्हणून, नाही तर या १५ वर्षात मला एकदा तरी त्यांची आठवण ? मला खूप अपराध्यासारखं वाटलं. अनपेक्षीतपणे एखादा खजाना हाती लागून अत्यानंद व्हावा, तशी माझी अवस्था झाली. त्याच्याशी खूप गप्पा माराव्याशा वाटल्या; पण वेळेच बंधन ! तो निघून गेला. माझा बँकेत जायचा मूड गेला. मी सरळ घरी आले. इतके दिवस मी काय गमावले होते व आज मला काय गवसले याचा विचार करीत घरात शिरले.
सगळ्या मैत्रीणींची जुनी पत्रं काढून परत परत वाचली, अल्बम काढला. आमचा सगळ्या ग्रुपचा फोटो कितीतरी वेळ पहात बसले. उमेशच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गेली १५ वर्षे आम्ही मैत्रीणी कधी पण एकमेकीना निवांत भेटलो नाही. प्रत्येकीचे व्याप निराळे, एकमेकांना असा जीव लावून दूर व्हायचे असेल तर कशाला मैत्री करायची ? आम्हाला एकमेकांपासून असे दूर करणाऱ्या “लग्न” या संस्थेचा मला क्षणभर राग आला; पण त्याला इलाज नव्हता. मला काय करावे सुचेना, घरात बसून बेचैनी वाढू नये म्हणून शेजारी मैत्रीणीकडे गेले तर तिची मुलगी आजारी !
तिला विचारलं काय झालंय हिला ? तर ती म्हणाली, ‘अग काय कळेचना, वरचेवर आजारी पडते. डॉक्टर म्हणतात ती ‘होम सीक’ झालीय. मला पटकन् माझ्या बेचैनीच कारण समजलं. मी मैत्रीणीला म्हणलं, “आज मला पण बरं वाटत नाहीय.” “का ग, काय झालंय?” मी आज “फ्रेंड सीक” झालीय.
मी घरी येईपर्यंत मुले आली होती, हे पण आले. मी परत कामात गुंतले. रात्रीची आवराआवर करून अंथरुणावर पडले. मुले झोपली. मी यांना उमेश आलेलं सांगितलं. आज सगळ्या जुन्या मैत्रीणींच्या आठवणीनी माझं मन तुडूंब भरल होतं. मी कुठतरी वाचलं होतं. “ज्याच्या हृदयात आनंद आहे, त्याला पुष्कळ मित्र मिळतात.” खरे आहे!
ज्याला जीवाभावाचा मित्र आहे, त्याला काय कमी ? दुःख मित्रापुढे सांगितल्यानं त्याची तीव्रता कमी होते, तर सुखाची तीव्रता दुप्पट होते. कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगी हक्कानं हाक मारली तर लगेच हजर होईल, असा एखादा तरी मित्र हवाच! म्हणजे मग आयुष्याचा प्रत्येक सेकंद सुसह्य होईल. म्हणून एका संस्कृत सुभाषितात शेवटी म्हटलयं “अमित्रस्य कुतः सुखम?”
घड्याळात अकराचा टोला पडला. झोप यायची लक्षणे दिसेनात. मी उठले. यांना जाग येऊ नये म्हणून छोटा टेबल लॅप लावला. ड्रॉवरमधून लेटर पॅड आणि पेन काढलं. मध्यभागी ‘श्री’ लिहून तारीख घातली आणि मायना लिहिला, “प्रिय मंगल,” अन् दुसऱ्याच क्षणी दिवसभरची बेचैनी माझा फ्रेंड सीकनेस भराभर कागदावर शब्दबद्ध होऊ लागला. फक्त मधून मधून माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या आसवांचे थेंब कागदावर पडत होते आणि त्यांचा नाजूक टप- टप् आवाजसुद्धा रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करीत राहिला.