व्रतवैकल्य स्वरूप बदलावे
व्रतवैकल्य स्वरूप बदलावे
आपल्या दि. २३ जूनच्या अंकातील 'आवाहन' वाचले आणि नुकतीच घडलेली एक घटना डोळ्यासमोर आली. वटपौर्णिमेच्या आदले दिवशी मी शहापूरच्या बाजारात गेले होते, तर तिथे एक भला मोठा वडाच्या फांद्याचा ढीग घेऊन एक माणूस विकत बसलेला दिसला. म्हणजे ज्या बायकांना जवळपास वडाचे झाड उपलब्ध नसेल त्यांनी त्या वडाच्या फांद्या विकत घेऊन घरी पूजा करायची. एकीकडे आपण 'वनसंवर्धना'च्या गप्पा मारायच्या, सगळीकडे 'झाडे लावा झाडे जगवा' म्हणून लिहायचं आणि तीच झाडे तोडून त्यांची पूजा करायची. हा विरोधाभास मनात घोळवतच मी घरी आले तर माझी मोलकरीण मला म्हणाली, 'वैनी, उद्या जरा उशिरा येतो, वडाची पूजा हाय.' वडाची पूजा बायका कशासाठी करतात तर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. माझ्या मोलकरणीचा नवरा तरी इतका दारूडा आहे की, तिला सतत मारत असतो. म्हणून मी तिला म्हटलं, अगं, हा असला नवरा जन्मोजन्मी मिळावा, असं तुला वाटतं तरी कसं ? सत्यवानाची मोठ्या संकटातून सावित्रीने सुटका केली. याचाच अर्थ स्त्रीवर कोणतेही संकट आले असताना तिने धैर्याने, संयमाने त्यावर मात करावी. धैर्याचे 'सावित्री' हे एक प्रतिक आहे. याचा अर्थ, त्या व्रताची परंपरा राखण्या साठी कसला का नवरा असेना; पण जन्मोजन्मी तोच नवरा मिळू दे म्हणण्यात काय अर्थ आहे. अशा एक ना अनेक व्रतवैकल्यांचा, रूढी परंपरांच्या विळख्यात स्त्रीला अगदी पुरातन काळापासून जखडून ठेवण्यात आलेलं आहे. त्यातली बरीचशी व्रते ही स्त्रीची एक भावनिक गरज म्हणून त्या त्या काळात योग्य असतीलही. कोणत्याही व्रतवैकल्याच्या विरोधात मी नाही, परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या व्रतांमध्ये स्त्रियांनीच बदल घडवून आणणे आवश्यक आहे. साधे संक्रांतीचे हळदीकुंकुच घ्या ना. बायका वस्तू लुटतात. ज्यांची त्या वस्तू घ्यायची ऐपत आहे किंवा ज्यांना त्या वस्तूंची गरजच नाही, अशांना त्या देण्यात काय अर्थ ? तेच पैसे तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमास मदत म्हणून, किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या फी साठी कां खर्च करू नयेत ? अगदी चातुर्मासात किंवा अधिकमासात स्त्रिया अनेक नेम करतात. त्यातले बरेचसे नेम दानधर्मातले असतात. पण हाच दानधर्म आपण योग्य ठिकाणी केला तर ? एखाद्या गरीब मुलाला मी रोज जेवायला घालीन किंवा एखाद्या निरक्षर स्त्रिला लिहायला शिकवीन, अशा व्रतांची आज खरी गरज आहे. घरात आपल्याकडे असलेले जुने कपडे साठवून आपण बोवारणीला देतो. तेच कपडे नेऊन आपण एखाद्या अनाथालयात दिले तर ?
या व्रतवैकल्याबरोबर स्त्रीला सासरी असणारे, परंपरागत चालणारे सणवार सुद्धा पार पाडावे लागतात. प्रसंगी एखादी न पटणारी गोष्ट पण केवळ रूढीच्या नावाखाली खपवावी लागते. मंगळागौरीचेच उदाहरण घ्या. भरपूर खर्च करून वाजत-गाजत मंगळागौर केली जाते. पण रात्री ती जागवायला मंगळागौरीची एकसुद्धा मुलगी नसते. मंगळागौर एकीची, जागवणार दुसरेच. मग नसता सोस करण्यात काय अर्थ आहे? सुरूवातीला या रूढी नाईलाज म्हणून, हौस म्हणून जपल्या जातात. मग त्या बायकांच्या अंगवळणी पडतात. त्याला विरोध करण्याइतपत धैर्यसुद्धा मध्यमवर्गीय सुसंकृत बायकांमध्ये नसतेच. आमच्याच ओळखीमधली एक आजी आहेत. त्यांचा नवरा गेला. नवरा गेला की, मंगळसूत्र त्याच्याबरोबर जाळायची प्रथा आपल्यात आहे. पण त्या आजींनी स्पष्ट या गोष्टीला नकार दिला व ते मंगळसूत्र विकून त्याचे पैसे एका अनाथ आश्रमाला दिले. अर्थात, हे एकदम होणारे बदल समाजातील लोक सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाहीत. आपण नवरात्र घालतो. प्रत्येक वर्षी नवरात्रात माझी मोलकरीण माझ्याकडून ५०१ रु. उसने घेते. दरमहा थोडे थोडे देऊन फेडते. पण असे ऋण काढून सण करण्यात काय प्रयोजन? पण या रूढीची परंपरा मोडायला आपण कुठे तयार आहोत.
त्यामुळे नोकरी, समाजकार्य, नाटक वगैरे कोणत्याही निमित्ताने स्त्री पूर्वीपेक्षा स्वतंत्र झालो, तरी तिचे संस्कारीत मन तिची अवस्था एक पाय घरात व एक पाय बाहेर असेच करून ठेवते. याला काही स्त्रियां अपवाद पण आहेत. काही समर्थपणे या चाकोरीतून बाहेरही पडू शकत नाहीत किंवा रूढी परंपरेच्या आहारी जाऊन त्या मोडूही शकत नाहीत. तरी पण या व्रतवैकल्यांचा आणि रूढी परंपरांचा स्त्रियांनीच गंभीरपणे विचार करून त्यामागची भावना तीच ठेवून, फक्त त्यांचे स्वरूप बदलायचे ठरवले तरी बराच मोठा सामाजिक बदल होईल, हे निश्चित!