प्रवासी कर्तव्य आणि मी
प्रवासी कर्तव्य आणि मी
लहानपणच्या काही सवयी मोठेपणी पण तशाच राहतात किंवा काही ठिकाणी नडतात, असे म्हणतात ते काही खोटे नाही. कारण मला अजूनही रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं की खिडकी जवळच्या जागेचा मोह होतो, आणि त्या दिवशी गर्दी कमी असल्यामुळे मला अगदी सहज तशी जागा मिळाली. मुले पण बरोबर नव्हती. सामान पण अगदी थोडे. तिकीटपण लगेच न थांबता मिळाले, आणि गाडीसुद्धा राईट टाईम ! सुखाचा प्रवास म्हणजे हा असा, मी मनातच म्हणाले: टाईमपाससाठी मी एक छोटं पुस्तक वाचायला आणि मुलीसाठी स्वेटर सुरू करावा म्हणून थोडी लोकर बरोबर घेतली होती. घटप्रभेला निवांत वेळ आणि कॉफी घ्यायचा पण बेत आखला. कारण नेहमी मुले बरोबर असली की, त्यांना कॉफी फुंकून गार करून पाजवेपर्यंत माझी कॉफी आणि वडे गारच! गरम वड्यांचे मनोराज्य मी रंगवत असतानाच माझ्या शेजारी एक गरोदर बाई धापा टाकत येऊन बसली. बरोबर दोन तीन वर्षाचा एक मुलगा. तिला पोचवायेला मध्यम वयस्क गृहस्थ होते. त्यांनी माझ्याकडे पहात मला विचारलं "तुम्ही कुठेपर्यंत जाणार ?" मी म्हटलं, "बेळगाव." बरं झाल. "ही पण तिथेच उतरणार आहे. तिला सोबत झाली." माझी संमती गृहीत धरूनच ते हसले:
पण मला आज मजेत प्रवास करायचा मूड होता. मी गाडी सुरू झाली तरी खिडकीतून बाहेर पहात राहिले. पुस्तक काढून मांडीवर ठेवलं. तेवढ्यात तो छोटा मुलगा खिडकी जवळ बसणार म्हणून मोठा आवाज काढून रडायला लागला. मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. नंतर मलाच न राहवून मी त्याला खिडकीजवळ बसवून घेतलं. तो पेंगायला लागला अन् थोड्याच वेळात माझ्या मांडीवर झोपायला लागला. तरी पण त्याची आई गप्पच. किती हट्टी मुलगा म्हणून मी त्या बाईकडे पाहीलं, पण तिचा चेहरा एकदम घामेजून गेला होता. बरं वाटत नाही का? मी विचारलं. हो! तिला उलटी होत होती. मी तिला म्हटलं मुलाला पाहते मी, तुम्ही जाऊन या. बिचारी सात आठ वेळा उलटी करून आली. नंतर तिची कंबर दुखायला लागली. माझा प्रवासाचा मूडच गेला.
तेवढ्यात कुडचीला टी. सी. आला. प्रत्येकांनी आपापली तिकीट दाखवली. तिनं पण त्यासाठी पर्स उघडली; पण तिकीट हरवलं होतं. तिला सापडेल नाही. "५० रु. दंड भरा." टी. सी. ओरडला. तिच्या पर्समध्ये ३५ रु. निघाले. ती पूर्ण घाबरली. मला डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "१५ रु. तुम्ही द्या स्टेशनवर माझा नवरा मला न्यायला येईल मी तेव्हा देते." परत एकदा माझ्यातल्या माणुसकीनं डोकं वर काढलं, मी पैसे दिले. तिचा मुलगा उठला. त्याला शू लागली. तोपर्यंत ती बर्थवर डोकं टेकून झोली गेली होती. त्यामुळे त्याचा चार्ज मला घ्यावा लागला. घटप्रभेला गाडी थांबली. तिच्या मुलाला वडे, कॉफी दिली. तिला पण कॉफी घ्यायला लावली. तिच्या उलटीच्या वासानी मला इतकं मळमळत होतं की, कॉफीचा बेत मी रद्द केला. पर्समधून आवळ्याची सुपारी काढून तोंडात टाकली. तोपर्यंत तिचा मुलगा तिच्याजवळ बसायला गेला म्हणून मी पुस्तक उघडणार एवढयात तो तिच्या मांडीवर चढायला जाऊन तो जोरात खाली पडला. खालच्या ओठात वरचा एक दात घुसून रक्त आलं. परत अर्धातास रडणं ? मी मनात चरफडले. पुन्हा त्याला तिच्या हातात देऊन खिडकीतून दिसणाऱ्या पळत्या झाडांची, ढगांची मजा सांगत राहीले. एकदाचं बेळगाव आलं. तिचा नवरा स्टेशनवर आला होता. मला वाटलं ती आता माझी नवऱ्याशी ओळख करून देईल, माझे १५ रु. परत करून दोघेही माझे आभार मानतील. कारण, घटकाभर का होईना मी तिच्या नवऱ्याची भूमिका पार पाडली होती. पण नवरा दिसताच ती, एकदम मला विसरलीच. मुलगा पण त्याला बिलगला. त्याच्या खांद्यावर हात टेकून तिच्याशी हळूहळू बोलायला लागला. मला संताप आला. कोणावर उपकार करायचे दिवस नाहीत! आभार राहू देत ! १५ रु. तरी परत द्यावेत.
मी माझीं बॅग उचलली. मला न्यायला 'हे' आलेले नव्हते. तशीच मी बाहेर आले. समोर थांबलेल्या रिक्षात बसले तर त्या रिक्षामध्ये सीट समोरच्या चौकोनावर श्रीकृष्ण-अर्जुन यांच्या फोटोखाली पांढऱ्या अक्षरात श्लोक होता, "कर्मण्ये वाधीकारस्ते....." रिक्षा वेगात घराच्या दिशेने धावत होती आणि समोरचा श्लोक मात्र मला वाकुल्या दाखवून हसत होता.