छोटे छोटे वेटर
छोटे छोटे वेटर
कोणत्याही हॉटेलमध्ये जायचं म्हणजे माझ्या मनावर एक अनामिक दडपण नेहमीच येतं. असं वाटतं की, वेटर म्हणून कोणताही लहान मुलगा आपल्या समोर येऊन उभा राहू नये. आपण आरामात टेबलावर बसायचं आणि त्या कोंवळ्या मुलांना ऑर्डर सोडायची, हे नको वाटतं.
परवा एकदा आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मजेत दोसा खाणं सुरू होतं. तेवढ्यात आमच्या शेजारच्या टेबलावर एक सुखवस्तु चौकोनी कुटुंब येऊन बसलं. त्यांचा साधारण एक ते दीड वर्षाचा मुलगा ते आल्यापासून सारखा रडत होता. नंतर तो एका टेबलकडून दुसऱ्या टेबलकडे पळायला लागला. तेव्हा तिथे असलेला १०-१२ वर्षाचा एक वेटर त्याला आवरायला गेला. त्या मुलाने टेबलवरचा एक पाण्याचा ग्लास पाडला. वेटरने पाणी पुसून घेतले. त्याच्या मागे लागून वेटरची चांगलीच दमछाक होत होती. त्या मुलाची आई आरामात सूप पित होती. पण माझ लक्ष मात्र माझ्या प्लेटपेक्षा पुन्हा-पुन्हा त्या छोट्या वेटरकडं जात होतं. तेवढ्यात त्या मुलाचं बोट दारात सापडलं. जणू काही सर्व चूक त्या वेटरची, असं गृहित धरून मालक त्याच्यावर खेकसला. बिचारा, घाबरून रडायला लागला. नंतर टेबलवरच्या प्लेटस् गोळा करताना पण तो मुसमुसतच होता.
असेच आम्ही मिरजेला असताना बँकेत दुपारच्या सुटीत एका हॉटेलमध्ये चहाला जायचो. तिथे एक विठ्ठल नावाचा छोटा वेटर आमचा दोस्त झाला होता. फाटकी खाकी चड्डी, मळकं बनीयन; पण नेहमी हसरा चेहरा. त्याला त्याच्या मालकाने उडपीहून आणलं होतं. त्याच्याशी जरा गप्पा मारल्या की, एकदम खूष व्हायचा. आम्ही जाऊन बसलो की, त्या दिवशीचा पेपर आणि गार पाणी अगदी पळत आणून ठेवणार, आमची एखादी मैत्रिण दिसली नाही तर तिची चौकशी करणार, एके दिवशी त्याच्या हातातून चहाचा ट्रे निसटला. सगळ्या कपबशा फुटल्या, त्याच्या धांदरटपणाची त्याला शिक्षा झाली. पगार पण कट, वरती शिव्या. खरं तर धांदरटपणा करण्यांचंच त्याच वय ! आम्हालाही वाईट वाटलं. नंतर काही दिवसानी तो आपल्या गावी निघून गेला. पण अजूनही कधी त्या हॉटेलमध्ये गेलं तर खांद्यावरचा नॅपकीन सांभाळत हातात पेपर घेऊन विठ्ठल आपल्यासमोर उभा राहिल,असं वाटतं.
आणखी एक छोटासा मुलगा बँकेत दुपारचा चहा घेऊन यायचा. अगदी चपळ आणि हुशार, तसाच प्रामाणिकही ! त्यामुळे मोठा झाल्यावर बँकेतच पार्ट टाईम शिपाई झाला. अधून मधून घरी यायचा. घरातील सर्व जबाबदारी, नोकरी सांभाळत त्यानं नृत्याची कला जोपासली होती. परवा एक दिवस अचानक बँकेत समोर येऊन उभारला राहिला, ‘वैनी मला
ओळखलंत ?' खरंच तो न ओळखण्याएवढा बदलला होता. नृत्याच्या काही परीक्षा देऊन आता स्वतः नृत्य शिकवत होता. मला खूप कौतुक वाटलं आणि अभिमानही. त्याच्या कष्टाचं चीज झालं होतं. मी त्याला तसं म्हटलं तर म्हणाला, ‘तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद.’
लहानपणी हॉटेलमध्ये कपबशा विसळणारा, आणखी एक स्वामी म्हणून मुलगा आता मार्केटमध्ये हातगाडीवर दोसे, भेळ करून विकतो. त्याच्या हाताखाली पण दोन छोटी मुलचं कामाला. मे महिन्याच्या सुटीत आम्ही चार दिवस महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा एक मुलगा हॉटेलच्या रूमवर रोज सकाळी आठ वाजता बूट पॉलिशसाठी यायचा. तब्बेतीनं छान आणि दिसायला पण छान ! पाहिलं तर चांगल्या घरातला वाटावा. मी सहज त्याची चौकशी केली तर सकाळी हे काम करून दुपारी बाराला शाळेत जायचा, आठवीत होता तो. घरात तीन लहान भावंडं. घरची परिस्थिती बेताची. मला गलबलून आलं. एवढी मोठी जबाबदारी मनापासून उचलणारे त्याचे कोवळे खांदे मी थोपटले.
अशी एक ना अनेक मुलं आयुष्याशी निकरान झुंज देऊन स्वतःच्या पायावर उभी राहताना अनेक ठिकाणी भेटतात. त्यातली काही नकळत लक्षात राहतात. त्यांची आठवण आली की, त्यांचे कोवळ्या वयातले कष्ट मनाला बेचैन करतात आणि मनाला एकच प्रश्न सतत भेडसावत राहतो. 'समाजाचा एक घटक म्हणून आपण या मुलांचं काही देणं लागतो का ?'