एक प्रेम नकोसं
एक प्रेम नकोसं
खरं म्हणजे मीनाचं वय प्रेमात पडण्याचं नाही हे मलाही पटत होतं. कारण एक तर तिचं लग्न झालं होतं आणि दोन छान मुलं पण होती. नुकताच संसार बहरत होता. चांगला कर्तबगार देखणा नवरा, स्वतःच सर्व अद्यावत सुखसोयी असलेले घर, दोन गोंडस मुलं, तिला स्वतःला बँकेत नोकरी ! कशाचीच कमतरता नव्हती. सुखाच माप अगदी भरभरून परमेश्वरानं तिच्या पदरात ओतलं होतं. माझ्या कल्पनेत तरी तिचा संसार 'आदर्श' होता. अगदी कुणालाही हेवा वाटण्यासारखा आणि ही मूर्ख बाई आज माझ्याकडे येते काय आणि तिला तिच्या एका निकटच्या सहकाऱ्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल कबूली देते काय ! माझा क्षणभर माझ्या कानावर विश्वासच बसेना. तिला समजावून सांगावं का तिला खडसावून ओरडावं मलाच संभ्रम पडला.
कारण एक तर 'प्रेमात पडणं' या प्रकाराचा मला काय अनुभव नव्हता. घरात तेवढं स्वातंत्र्य नव्हतं. घरातील बुर्जुग मंडळीनी लग्न ठरवलं आणि झालंही! त्या दिवसापासून आम्हाला एकमेकावर प्रेम करावंच लागलं आणि अजूनही करतोय किंवा त्याची पण आता सवय झालीयं. एकदा एक माणूस आपलं म्हटल्यावर त्याचे गुणच काय अवगुण पण परिचयाचे होतात. सहवासाने प्रेम वाढत जात असावं किंवा कौटुंबिक स्वास्थासाठी ते अपरिहार्य असावं, असं माझं प्रेमाबद्दल मत होतं. त्यामुळे प्रेमात पडण्याचा विचारसुद्धा मनात आणणं, आता या वयात सर्वच दृष्टीनं विनाशकारी आणि धोक्याचं ठरलं असतं.
मी तिला तस ठणकावलं; पण ह्या प्रेमामुळे दोन संसार उध्वस्त होतील आणि तू सुखी होणार नाहीस इत्यादी. मुलांचा तरी विचार कर ! त्यामुळे होणाऱ्या सर्व दुष्परिणामांची यादी मी तिच्यापुढे वाचली. सुदैवाने तिला ते सारं पटलं; परंतु आपण एवढी मोठी चूक करायला धजावलो या अपराधी भावनेने तिला रडूच कोसळलं. मोहाच्या उंबरठ्यावरच ती सावरली होती. मी तिची समजूत घातली तरी पण मोठ्या अपराधीपणाच्या भावनेचं ओझं मनावर घेऊनच ती घरी गेली. तिचं समाधान कसं करावं मला पण समजेना. तरी पण माझं म्हणणं तिला पटलं हे; पण काय कमी नव्हतं.
ती गेली तरी माझ्या डोक्यातून तिचा विचार जाईना. खरचं, कोणतीही व्यक्ती सर्व गुण संपन्न असणं शक्य नाही. मग तो आपला आयुष्याचा साथीदार का असेना. त्यामुळे आपल्यापेक्षा या ना त्या दृष्टीने सुपीरीयर व्यक्ती वरचेवर सहवासात येतच राहणार. काहींची राहाणी, काहींचे विचार, काहींचं व्यक्तीमत्त्व आपल्याला प्रभावीत करते. नकळत त्याबद्दल आकर्षण किंवा कुतुहल वाटते. कोणत्याही सुंदर गोष्टी किंवा व्यक्तींचं आकर्षण वाटणं नैसर्गिक वृत्ती आहे. उलट हे आकर्षण न वाटणारी व्यक्तीच विकृत वाटेल, नाही का ?
डोक्यातून तो विचार जावा म्हणून मी नुकतच लायब्ररीतून आणलेलं ‘गारंबीचा बापू’ पुस्तक हातात घेऊन वाचायला लागले. ते पुस्तक आधी कोणी वाचलं असेल त्यांनी मधे मधे काही वाक्यांना खाली लाल रेघा ओढून ठेवलेल्या दिसत होत्या. त्यातल्या एका वाक्यावर माझी नजर स्थिर झाली आणि क्षणातच विस्फारली गेली. “माणसाला एखाद्या गेष्टीचा मोह होणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे; पण त्या मोहाला बळी पडणं हे पाप आहे.” एखादा साक्षात्कार व्हावा तशी मी चटकन् उठले.
मीनाचा फोन नंबर फिरवला तिला, ते वाक्य सांगून मी म्हटलं “तू मोहावर विजय मिळवला आहेस.तू जिंकली आहेस अपराधीपणाची भावना मनातून काढून टाक.” “थँक यू’ ती तिकडून भारावून म्हणाली. टिपॉयवर पडलेल्या पुस्तकाकडे पहात मी पण भारावून म्हणाले, “थँक यू गारंबीचा बापू.”