लहानपणाच्या काही सवयी मोठेपणी तशाच राहतात किंवा काही ठिकाणी नडतात, असे म्हणतात ते काही खोटे नाही, कारण मला अजूनही रेल्वेने प्रवास करायचा म्हटले की खिडकी जवळच्या जागेचा मोह होतो. वीस एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्या दिवशी मिरजेहून बेळगावला यायला निघाले होते. मिरज लोंढा पसेंजर. नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. त्यामुळे तिकीट लगेच मिळाले. अगदी सहजपणे मस्त खिडकी जवळची जागा मिळाली. मुले पण बरोबर नव्हती आणि सामान पण अगदी थोडे होते. सुखाचा प्रवास म्हणजे असा, मी मनात म्हणाले, कुसुमाग्रजांचा विशाखा काव्यसंग्रह वाचावा म्हणून बरोबर घेतला होता. मुलीसाठी स्वेटर सुरु करायचा म्हणून थोडी लोकर पण घेतली होती. आज घटप्रभेला निवांत वडा आणि कॉफी घ्यायची असा बेत पण मी आखला होता. कारण नेहमी मुले बरोबर असली की त्यांना कॉफी फुंकून गार करून पाजवेपर्यंत माझी कॉफी आणि वडे गारच.
गरम वड्यांचे मनोराज्य मी रंगवत असतानाच माझ्या शेजारी एक गरोदर बाई धापा टाकत येऊन बसली. बरोबर साधारण दोन ते तीन वर्षाचा एक मुलगा पण होता. तिला पोचवायला मध्यम वयस्क गृहस्थ आले होते. त्यांनी माझ्याकडे पहात विचारले. तुम्ही कुठेपर्यंत जाणार?" मी म्हटलं "बेळगाव, बर झालं, ही पण तिथेच उतरणार आहे. सोबत झाली." माझी संमती गृहीत धरुनच ते हसले.
मी हेतूपुरस्कर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले कारण आज माझा मजेत प्रवास करायचा मूड होता. गाडीची शिट्टी वाजली आणि गाडी हळूहळू वेग पकडत, लयबद्ध आवाजात मिरज स्टेशनमधून बाहेर पडली. प्रवाशांना पोचवायला आलेले हात हळूहळू दिसेनासे झाले. सहप्रवासी आता आपापल्या जागांवर स्थिरावले होते. जरा थोडं तिकडे सरका ना. अहो तुमची पिशवी वर ठेवा की, आज गाडी राईट टाईम आहे बुवा, पावण जरा खिडकी उघडी ठेवा की,' असे संवाद सुरु होते. मी मुद्दामच तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून खिडकीबाहेर पहात राहिले.
गाडीने आता वेग पकडला होता. गाडीच्या दोन्ही बाजूला द्राक्षबागांचे मांडव म्हैसाळ शहर आल्याचे सुचवीत होते. झाडे पळत होती. खिडकीतून वारा पण मस्त येत होता. निळे पांढरे, थोडे धुरकट ढग आमच्या बरोबर डोलत होते. गाडी वळणावर आली की खिडकीत शक्य तेवढी मान वाकवून वळणारे, इंजिन पाहणे मला आवडते. मी आज तो प्रयोग करणारच होते. असा निवांत प्रवास आणि हातात एखादा काव्य संग्रह. मी पर्स मधून पुस्तक काढून मांडीवर ठेवणार तेवढ्यात त्या बाईचा मुलगा, मी खिडकीजवळ बसणार म्हणून मोठा आवाज काढून रडायला लागला. सुरवातीला मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. अहो बाई, तुम्ही काय पुस्तकंच वाचणार आहे ना, मग बसू दे की त्या मुलाला खिडकीजवळ. समोरच्या गृहस्थांची आगाऊ सूचना आली. मला पण रहावले नाही. मी त्याला माझ्याजवळ खिडकीपाशी बसवून घेतले. थोड्याच वेळात तो पेंगायला लागला आणि माझ्या मांडीवर पडायला लागला. तरी त्याची आई गप्पच. काय निष्काळजी बाई आहे ही.असे वाटून मी तिच्याकडे पहिले तर तिचा चेहरा कसानुसा झाला होता. घामाने डबडबला होता. "बरं वाटत नाही का ?" मी विचारले. हो ती म्हणाली. तिला उलटी येत होती. मी तिला म्हणाले, मी पाहते मुलाला, तुम्ही जाऊन या. बिचारी पाच सहा वेळा उलटी करून आली. हैराण झाली होती. कंबर दुखते आहे असे सांगू लागली. मलापण वाईट वाटले. माझ्या मांडीवर मुलाची चुळबुळ सुरूच होती. मी पुस्तक सरळ पर्स मध्ये ठेवून दिले.
घड़क घड़क आवाज करीत कुडचीचा पूल आला. कृष्णा दुथडी भरून वाहत होती. पण प्रवाह संथ होता. नदीच्या काठावर बायाबापड्या धुणे बडवत होत्या. त्यांनी धुवून वाळत घातलेल्या कपड्यांची नदीकाठावर रंगीबेरंगी रांगोळी सजली होती. काही म्हशी पाण्यात डुंबत होत्या. त्यांच्या आसपास पाण्यात खेळणारी मुले खेळ थांबवून गाडीला टाटा करीत होती. मी पण हात हलवून त्याना प्रतिसाद दिला. मला माझ्या मुलांची आठवण झाली. ती असती तर नदीत टाकायला नाणं द्यावे लागले असते. मी पण एखादे नाणे नदीत टाकावे म्हणून पर्स मध्ये हात घातला तेवढ्यात टी.सी. आले. प्रत्येकांनी आपापली तिकिटे दाखवली. तिने पण त्यासाठी पर्स उघडली पण तिला तिकीट सापडेना. बहुतेक ते वडीलांकडेच राहिले असावे गडबडीत. पन्नास रुपये दंड भरा. टिसीनी फर्मान सोडलं. तिच्या पर्समधून पस्तीस रुपये निघाले. ती पूर्ण घाबरली. डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली, पंधरा रुपये तुम्ही द्या. स्टेशनवर माझा नवरा मला न्यायला येईल, मी तेव्हा तुम्हाला परत देईन." परत एकदा माझ्यातील माणुसकीने डोके वर काढले. मी पैसे दिले.
गोकाक करदंट खिडकीत विक्रेता ओरडत होता. म्हणजे घटप्रभा जवळ आलय तर. आता गोकाकचे धरण, आजूबाजूची हिरवीगार शेती नजरेस पडणार होती. मी पुन्हा खिडकीबाहेर लक्ष केंद्रित करणार तेवढ्यात तो मुलगा उठला. त्याला सू लागली होती. पण तोपर्यंत बर्थवर डोके टेकून ती झोपी गेली होती. चेहरा बराच म्लान झाला होता. त्यामुळे त्याचा ताबा परत मीच घेतला. घटप्रभेला गाडी थांबली. तिच्या मुलाला वडा घेऊन दिला. तिला पण कॉफी प्यायला लावली. तिच्या उलटीच्या वासानी मला इतकं मळमळत होतं की मी वडा कॉफी बेत रदद केला. वडा खाऊन झाल्यावर तो मुलगा तिच्याकडे बसायला गेला. मी पर्समधून आवळा सुपारी काढून तोंडात टाकली. आणि पुस्तक बाहेर काढण्यासाठी पर्समध्ये हात घालणार एवढ्यात तो मुलगा तिच्या मांडीवर चढायला जाताना घसरून जोरात खाली पडला. खालच्या ओठात वरचा दात घुसून थोडे रक्त पण आले. अर्धातास तरी जोरात रडणे झाले. मी मनात चरफडले. यावेळी खिडकीचे अमिष दाखवून पण तो माझ्याकडे येईना. शेवटी त्याला तिच्या मांडीवर चढवले आणि मीच त्याला खिडकीतून दिसणाऱ्या पळत्या झाडांची, ढगांची मजा सांगत राहिले.
तिची संपूर्ण जबाबदारी फक्त माझी आहे असे गृहीत धरून बाकीचे प्रवासी मजेत प्रवास करीत होते. किंवा ती माझ्याबरोबरच आली आहे असा सोयीस्कर गैरसमज त्यांनी करून घेतला असावा. त्यामुळे गाडीत विकायला आलेली काकडी, कोरडी भेळ, करवंद, शेंगा यांचा पाहुणचार घेण्यात काही मग्न होते. वरच्या दोन्ही बर्थवर तर दोघे गाडी सुरु झाल्यापासून अगदी घोरत झोपले होते. चिंचलीला मायाक्का जत्रेमुळे बरीच मंडळी चढली होती. रायबाग, घटप्रभेला भाजीच्या बुट्ट्या घेऊन काहीजण चढले. एकूण डबा आता खचाखच भरला होता. घटप्रभा बेळगाव रोज जाऊन येऊन करणारे पण लोक दिसत होते, ते दारातच बसकण मारून बसले होते. राजकारण, ऑफिस, रेल्वे व्यवस्था अशा विविध विषयावर तिथे गप्पांचा फड रंगला होता.
माझ्या मनात आलं आपण फक्त आज तीन तास प्रवास करतोय तर इतका कंटाळा, केवढ्या अपेक्षा करतोय, हे लोक पोटासाठी रोज या गर्दीत जा ये करताहेत. काहीवेळासाठी सक्तीने लाभणारा हा सहवास त्यांनी मजेने स्वीकारलाय. रोज ही गाडी हजारो प्रवाशांना त्याच्या इप्सित स्थळी पोचवत आहे. ती त्यांची कोण लागते? रोज वेगवेगळ्या प्रवाशांच्या होणाऱ्या भेटीगाठी, त्यांची एकमेकांशी ना ओळख ना पाळख, पण एक अनामिक ऋणानुबंध जपणारा हा प्रवास. शेवटी आपलं आयुष्य तरी काय, एक दीर्घ प्रवासच ना ? वेगवेगळ्या वळणावर भेटणारी माणस. काही मधेच साथ सोडून जातात तर काही शेवटपर्यंत सोबत राहतात. प्रवास सुखाचा आणि सुकर व्हावा असे वाटत असेल तर सहप्रवासी कसेही असोत त्यांच्याशी जुळवून घेणे श्रेयस्कर. कुणाचे स्टेशन आधी येईल, कोण कधी कुठे उतरेल माहित नसते. नियतीने दिलेले हा जीवन प्रवास आनंदाकडे वळवणे आपल्याच हातात आहे.
पण, प्रवासाला निघतानाच आपण इप्सित स्थळी कधी पोचणार याचा विचार करत राहतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेत नाही, सहप्रवाशाशी संवाद साधत नाही किंवा बाहेर साद घालणारा निसर्ग डोळे भरून पाहत नाही, एकमेकांना मदत करत नाही. खरंच, प्रवासाचा सुद्धा आस्वाद घेता आला पाहिजे. प्रवास छोटा असो वा मोठा ती झंझट न वाटता यात्रा वाटली पाहिजे. प्रवास म्हणजे पण एक साधनाच. थोडी तडजोड, थोडे सहकार्य, थोडी सहनशीलता, थोडी मैत्री. जी आपल्याला अंतिम म्हणजे इप्सित स्थळी पोचयला मदत करणार आहे.
पुस्तक उघडून हातात घेतलं तर कुसुमाग्रजांची नेमकी 'आगगाडी आणि जमीन' ही कविता समोर आली. सुळेभावी सुलधाळ पार करून गाडी सांबऱ्याच्या दिशेने धावत होती. लाल मातीचा गंघ, गार हवा, पावसाळी वातावरण बेळगाव जवळ आल्याची जाणीव करून देत होते. प्रवासाच्या मूडमधून बाहेर पडून माझे मन पण घराकडे वळू लागले.
गाडीने सांबरा स्टेशन सोडले आणि सहप्रवाशांची सामान खाली उतरवून ठेवायची गडबड सुरु झाली. बरेचजण सामान हातात धरून दारापाशी जाऊन उभे पण राहीले.
प्रवास संपत आल्याचे समाधान तिच्यापण चेहऱ्यावर होते. तिचे डोळे अधीरपणे नवऱ्याची वाट पहात असणार असे मला वाटले. "उतरायची गडबड नको करू. गाडी इथेच थांबते. मी तिला धीर दिल्याच्या थाटात बोलले. प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर मी समजूतदार झाले होते.
एकदाचं बेळगाव स्टेशन आलं. तिचा नवरा स्टेशनवर आला होता. पुढे येऊन त्याने माझ्या हातातून तिची बॅग घेतली. ती उतरताना त्याने हळुवार आपल्या हाताचा आधार तिला दिला. टुणकन उडी मारून चिरंजीव खाली उतरले ते एकदम बापाला बिलगायलाच. त्याने पण कौतुकाने लेकाला कडेवर उचलून घेतले. मला वाटले आता ती माझी नवऱ्याशी ओळख करून देईल आणि माझे पंधरा रुपये पण परत देईल. दोघेही माझे आभार मानतील, कारण घटकाभर का होईना मी तिच्या नवऱ्याची भूमिका पार पाडली होती. पण छे. नवरा दिसताच ती एकदम मला विसरलीच. तिच्या खांद्यावर हात ठेवून तो तिच्याशी हळूहळू काहीतरी बोलत होता. ती मला पाठमोरी होती. त्याला ओलांडून तिच्या समोर जाण्यामध्ये मला काहीच स्वारस्य वाटले नाही. मला संताप आला. कोणावर उपकार करायचे दिवस राहिले नाहीत. आभार राहू देत. निदान पंधरा रुपये तरी परत द्यावेत. फलाटावरील गर्दीत ते दिसेनासे होई पर्यत तशीच थांबले. मी भानावर आले. मग माझ्या लक्षात आलं. मला न्यायला हे आले नव्हते. मी माझी बॅग उचलली, तशीच बाहेर आले. समोरच थांबलेल्या रिक्षात बसले. ‘सोमवार पेठ’ मी थोड्या गुर्मीतच रिक्षावाल्याला ऑर्डर सोडली. त्या रिक्षामध्ये सीटसमोरच्या चौकोनावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा कुरुक्षेत्रावरील फोटो होता. आणि फोटोखाली पांढऱ्या अक्षरात श्लोक होता,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
म कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ||
रिक्षा वेगात घराच्या दिशेने धावत होती आणि समोरचा श्लोक मात्र मला वाकुल्या दाखवून हसत होता.