चिमुकले कूट प्रश्न
चिमुकले कूट प्रश्न
त्या दिवशी हे ऑफीस मधून येऊन दमून झोपले होते. मी तिथेच मुलीचा अभ्यास घेत बसले होते. तेवढ्यात फोनची रींग खणखणली. मी मुलाला म्हटलं, "बघ रे फोन कुणाचा आहे ? बाबांचा असेल तर ते घरात नाहीत म्हणून सांग उठवू नको त्यांना आत्ताच झोपलेत ते." तर तो म्हणाला, "का खोटं सांगायचं ग, बाबा आहेत की घरात. तूच म्हणतेस ना खोटं कधी बोलू नये म्हणून ?" त्याच्या प्रश्नाला काय उत्तर देणार? मीच उठून फोन घेतला. सुदैवाने फोन मला आला होता. तो प्रसंग संपला; पण माझ्या मुलानं मला केलेला प्रश्न दिवसभर माझ्या डोक्यातून जाईना. त्या दिवशी मुलाला अप्रत्यक्षपणे मीच खोटं बोलायला शिकवल्यासारखं झालं होतं. का ? त्यात माझी चूक होतीही आणि नव्हतीही. कारण झोपताना हे मला सांगून झोपले होते, ‘तासभर मला विश्रांती हवीय मला उठवू नका.’ उठवलं तर हे रागावणार, नाहीतर मुलांसमोर खोटं बोलावं लागणार.
असंच एकदा माझी मैत्रीण तिच्या मुलाला शिकवत होती. अरे शाहण्यासारखे वागाव. कुणाशी भांडू नये, खोटं बोलू नये? वगैरे. तिच्या मुलाने चटकन् विचारले "आई खोटं म्हणजे काय ?" खोटं बोललं तर काय होतं? ती म्हणाली, खोटं बोललं तर देवबाप्पा पाप देतो. त्याने लगेच पुढवा प्रश्न केला, आई पाप म्हणजे काय ? आता या सगळ्या प्रश्नांची त्याचं समाधान होणारी उत्तर तिला काय देता आली नाहीत. खरचं मुलं किती निष्पाप असतात. खरं, खोटं, पाप, पुण्य त्यांच्या विश्वात नसतचं. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्यांच्या सहवासात येणारी माणसं, त्यांच्या बालपणावर आपण करत असलेले संस्कार यातून ती घडतात आणि आपापल्या परीनं त्या घटनाचा विचार करतात. ती मनापासून बोलतात, मनापासूनच भांडतात, रडतात व तेवढ्याच लगेच सर्व विसरतातही...
मुलांच्या बाबतीत आणखी एक कॉमन प्रसंग असा, प्रत्येक आईला दुसरीकडे गेल्यावर आपल्या मुलांनी चहा पिऊ नये, किंवा मागून तरी अजिबात पिऊ नये असं वाटतं. कितीतरी आयांना ‘माझा मुलगा किंवा मुलगी अजिबात चहा पीत नाही, त्याला फक्त बोर्नव्हीटाच लागतो.’ अशी फुशारकी मारायची सवय असते. अशीच एक बाई आपल्या मुलाला घेऊन आमच्याकडे आली होती. तिने येतानाच मुलाला तिथे चहा प्यायचा नाही म्हणून बजावलं असणार, जरा वेळ औपचारीक गप्पा झाल्यावर मी चहा ठेवला आणि त्या बाईना म्हटलं ‘हा घेईल का चहा ? त्या म्हणाल्या नको तो नाही प्यायचा, येतानाच घरी दूध पिऊन आलाय. तो मुलगा मात्र केविलवाणा होऊन आईकडे व माझ्याकडे पहात होता. कारण त्याला चहा हवा होता. मी म्हटल अर्धा कप घेऊ दे. तसं तिनं त्याला विचारल “काय रे घेणार का चहा ?” तो लगेच काही बोलला नाही. पण दुसऱ्याच क्षणी जोरात ओरडला, नको, नको, मी नको म्हणून सांगतो. खरं माझ्या मांडीचा चिमटा सोड. “- मला त्याही प्रसंगी हसायला आले. त्यानं चहा नको म्हणेपर्यंत तिने त्याच्या मांडीला चिमटा काढला होता.
सगळ्यांनाच आपली मुलं आज्ञाधारक शाहणी, सुसंस्कारी व्हावी असे, वाटते, परंतु त्यासाठी आपणही आधी तसंच वागायला पाहिजे असं मला वाटतं. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगी मुले निष्पापपणे किवा कुतुहूलाने अनेक प्रश्न असे विचरतात की ज्याला आपल्यापाशी उत्तर नसतं. आणि या प्रश्नातूनच या चिमुकल्या जीवांकडूनच मोठयानी शिकाव्या अशा अनेक गोष्टी आपल्याला नकळत गवसत जातात हे मात्र खरे!