झुरळ आणि मी
झुरळ आणि मी
तशी मी बऱ्यापैकी धीट आहे. मुलांना घेऊन एकटी प्रवास करू शकते. हे गावात नसताना घरी एकटीसुद्धा राहू शकते. भांडणात वगैरे पण मी फारशी मागं नाही. त्यामुळं शेजारणी पण मला वचकून असतात. मी रागावले की मुले पण लगेच गप्प बसतात. म्हणजे, मला चांगलं ओरडतापण येतं यांच्याशी वादावादी झाली तर खूपदा हेच माघार घेतात. कदाचित नोकरीमुळे असेल; पण चार-चौघात वावरताना लागणारा आत्मविश्वासुद्धा माझ्यात आहे. तरीही... माझा एकच वीक पॉईंट आहे, आणि तो चार चौघात मला लपवून ठेवता येत नाही. याचं जास्त वाईट वाटतं. तो पॉईंट म्हणजे, झुरळ ! मला झुरळांची फार भिती वाटते.
जवळपास एखादं लांब मिशीवालं झुरळ आलं किंवा हाताला त्याचा स्पर्श झाला, तरी मला एकदम किंचाळायला होतं. मग आपण कुठं आहोत, याचं भान रहात नाही. जरी त्या झुरळाला झटकून टाकण्यात यश आलं तरी एक संकट टळल्याचं समाधान वाटतं, आणि नंतर पण उगाचच एक सेकंद का होईना, छाती धडधडत राहते. अगदी घरातल्या बेसीन, बाथरूम, कपाटापासून ते ऑफीसमधल्या ड्रॉवर किंवा लेजरपर्यंत मुक्तपणे संचार करणारी ही झुरळं कधी अचानक येऊन समोर उभी ठाकलील, याचा नेम नाही. त्यामुळे मी नेहमी सावध असते. झुरळांच्या मोक्याच्या जागा मी लक्षात ठेवल्यात. पावसाळा सुरू झाला की, प्रथम छत्री वापरायला काढताना, गावाला जाताना सामान भरण्यासाठी फळीवरची बॅग ओढताना, कॉटखालचा पसारा आवरताना ती दिसली नाहीत, तरच नवल! पण अगदीच भीड सोडून ती कपड्यांच्या कपाटामध्ये किंवा फ्रीजमध्ये लोचटपणे फिरायला लगली की, मग मात्र मला संताप येतो.
झुरळांचा घरातून समूळ नायनाट व्हावा म्हणून, दर रविवारी माझी एक मोहीमच असते. किती तरी प्रकारची औषध ! बाजारात झुरळाचं नवीन औषध आलं की, मी ते आणलंच! रात्री औषधं घालून ठेवल्यावर सकाळी काही झुरळ मेलेली सापडली तर अगदी मोठी शिकार केल्याचा आनंद. पण तो एक दोन दिवसच ! परत अचानक हळू हळू त्यांच्या संखेत वाढ होतच राहते. माझा राग झुरळांवर आणि झुरळासारख्या निरुपद्रवी किटकाला मी घाबरुन ओरडते म्हणून, त्यांचा माझ्यावर ! एकदा सांडग्याचा डबा फळीवरून काढताना एकदम ४-५ झुरळं माझ्या अंगावर चढली, मी ओरडत डबाच टाकून दिला. “झुरळ म्हणजे साप आहे का विंचू ? एवढं ओरडायला काय होतंय तुला.” यांची टेप सुरू झाली. झुरळाला आपण घाबरायचं नाही म्हणून मी मनोधैर्य करायचं ठरवलं. त्यात थोडफार यश आलंही. म्हणजे झुरळांची छोटी छोटी पिल्लं जरी भरपूर सापडली तरी ती झाडणीनं लोटून अथवा मारून टाकणं आता मला जमू लागलंय. फक्त ती लांब लांब मिशा हलवत पंख असलेली झुरळं दृष्टीस पडली की, एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसाप्रमाणं ती मला अजूनही वाकुल्या दाखवतात. माझ्या झाडणीला दाद न देता चपळतेने इकडे तिकडे पळत राहातात. मग त्यांच्या बंदोबस्तासाठी परत मला औषधांचीच मदत घ्यावी लागते.
पण एक मात्र आहे, मी झुरळाला – घाबरते म्हणून हे मला कितीही ओरडोत; पण माझ्या माहेरी मात्र माझी आई ही गोष्ट सगळ्यांना हसत, कौतुकानं सांगायची, “कार्टीचं कसं व्हायचं कुणास ठाऊक ? एवढ्याशा झुरळाला घाबरून पळती.” साधारण झुरळांच्या विभागातील काम ती मला सांगायचं कटाक्षानं टाळायची. आंता मात्र त्या विषयात मलाच लक्ष घालण्यावाचून पर्याय नसतो. कारण यांना ‘झुरळ’ हा फारसा विचार करण्याचा विषय वाटत नाही.
एक रुबाबदार मिशीवाला झुरळ रोज मला ओट्यावर दिसायचा, माझ्या मारण्याला दाद न देता सटकायचा. पण एके दिवशी सकाळी मी उठून पाहिलं तर तो ओट्यावरच मरून पडला होता. त्याला मुंग्या लागल्या होत्या, बाकीची २-३ झुरळं तिथेच फिरत होती. त्यांचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मुंग्या आपल्याला मोठं भक्ष मिळाल्याच्या नादात त्याला ओढत होत्या. कालपर्यंत रुबाबात फिरणाऱ्या त्या झुरळाचं असहाय्य शरीर मला बघवेना. मला त्याच्या बद्दल वाटणाऱ्या भितीचं करुणेत रुपांतर झालं. त्याची ऐट, दिमाख, सगळं संपून त्याच्यापेक्षाही क्षुद्र असणाऱ्या मुंग्यांचा तो भक्ष बनला होता.
झुरळ असला म्हणून काय झालं, त्याचंसुद्धा आयुष्याचं गणित पण आपल्या आयुष्यासारखंच ! आपल्याजवळसुद्धा आज ऐश्वर्य आहे, रुबाब आहे; पण उद्या... हे असचं राहिल ?