माझं इंग्लिश स्पेकिंग
माझं इंग्लिश स्पेकिंग
मराठी माझी “मदर टंग” असूनसुद्धा माझ्या बोलण्यात इंग्लीश शब्द फार का? याचं फार जणांना आश्चर्य वाटतं. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.. कारण ज्या सोसायटीत मी राहते तिथं इंग्लीश शब्द न वापरता बोलणं पूर्ण गावंढळपणाचं समजलं जातं. त्यात आणि आजूबाजूची सगळी मुलं कॉन्व्हेंट स्कूलला जातात त्यामुळे माझी मुले पण तिथंच जातात. शिवाय एक सोशल स्टेटस् म्हणून नाईलाजाने का होईना पण मला महिला मंडळ, किटी पार्टी, रिक्रीएशन क्लब वगैरेच्या मंथली मिटींग अटेंड कराव्या लागतात. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला म्हणजे हाय, हॅलो, कम मॅन, नो मॅन, हाऊ स्वीट वगैरे इंग्रजी बोलण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे बेसीक शब्द माझ्या कानावर आदळून जिभेवर कधी चपखल मारून बसले मलाच समजलं नाही. त्यानंतर अगदी छोटी छोटी वाक्ये ऐकून ऐकून ती बोलायची प्रॅक्टीस केली. परंतु फारच मोठी वाक्ये बोलायचा प्रसंग आला तर शक्य तेवढे इंग्लीश शब्द घुसडून मी वेळ मारून नेते. त्याचं पण काय कमी इंप्रेशन पडत नाही.
यू नो, जशी जशी मी ही हॅबीट वाढवत गेले तसा तसा मला इंग्रजी बोलायचा कॉन्फीडन्स आला. काही जण माझ्या इंग्लीश बोलण्याची टर उडवतात. उडवू देत. मला प्रॅक्टीस सोडून चालणार नाही. जरा चुकत असेल तर नर्व्हस पण होऊन चालणार नाही कारण इंग्रजी स्पीकींग म्हणजे नॉट ए जोक ! रियली, तुम्हाला सांगायचं म्हणजे सुरुवातीला मला फार टेन्शन यायच. आपल्याला इंग्लीश बोलता येत नाही म्हणून गिल्टी वाटायच. परंतु आता मात्र कोणताही फोन अटेंड करताना, किटी पार्टीजमध्ये किंवा पेरेंटस् डे ला वगैरे मुलांच्या शाळेत जाताना मला कनफ्यूज होत नाही. उलट कुणाचाही फोन आला तरी धडपडत आधी मी घेते आणि इंग्लीश बोलते. जर पलीकडची व्यक्ती मराठी किंवा कानडी असेल तर मग जरा जोरातच बोलते. अशावेळी एखादं वाक्यं २-३ वेळा रीपीट केलं तरी फारसा प्रॉब्लेम येत नाही. याउलट समोरची व्यक्ती सुपिरीयर बोलणारी असेल तेव्हा एक दोन शब्दाची छोटी वाक्यं बोलावी नाही तर नुसतं या- या (Yes Yes) म्हणत वेळ मारून न्यावी अशी पध्दत ठरवून टाकली.
माझ्या इंग्लीश बोलण्याची जर कुणी घरातल्यांनी टर उडवली तर मात्र माझा पेशन्स जातो. उलट खरं म्हणजे घरातल्यानी ही गोष्ट अॅप्रीसीएट करून मला एनकरेज करायला नको का? कोणीतरी प्रेज केल तरी उत्साही फीलींग येतं. पण सध्या मला कुणी काही म्हणो माझी बाय हार्ट अॅक्टीस सुरू आहे. त्यासाठी डेली रूटीनमध्ये लागणाऱ्या संभाषणाच्या दोन कॅसेट व एक पुस्तक मी फॉलो करते. तरी पण काही प्रॉब्लेम येतातच. इंग्लीश सिनेमा आवर्जून पाहते. मात्र एक करते, त्याचं मराठी परीक्षणं मात्र आधी वाचून जाते. कारण सिनेमामधलं संभाषण काही कळत नाही त्यामुळे कुणी स्टोरी विचारली तर ऑकवर्ड नको व्हायला.
आणखी एक सोपा उपाय मी इंग्लीशच्या इंप्रूव्हमेंटसाठी शोधून काढलाय. तो म्हणजे संध्याकाळी इंग्लीश स्पीकींग क्लास जॉईन केलाय. अर्थात त्यामुळे मुलांचा होमवर्क घ्यायला वेळ मिळेना म्हणून त्यांना ट्यूशन लावली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकला कुक ठेवला. ही अॅडजेस्टमेंट थोड्याच दिवसाकरता म्हणा! कारण माझं इंग्लीश काय इतकही पुअर किंवा वीक नाही की मला फार दिवस क्लास कंटिन्यू करावा लागेल. तरी पण माझं येम गेन होईपर्यंत मला ट्राय करावच लागणार, कारण कुणीतरी इंग्लीशमध्येच म्हटलंय ना “ट्राय, ट्राय टिल यू सक्सीड.”