सखी शेजारीण
सखी शेजारीण
तशी काय मला फार दागिन्यांची हौस नाही. उगीचच प्रमाणाबाहेर साड्या घ्याव्या असे वाटत नाही. घरात आहे त्या सामानात मी समाधानाने संसार करते. हे सगळं खरं असलं तरी, एक स्त्री असल्यामुळे मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी थोडासा का होईना ‘स्त्री-सुलभ’ मत्सर असणारच नाही का? आपल्या शेजारणीनं आपल्यापेक्षा वरचढ असावं हे कुठल्या बाईला बरं वाटेल आणि त्यातल्या त्यात जरा गर्विष्ठ शेजारीण असेल तर मुळीच नाही; पण पुरुषांना या गोष्टी पटतील तर ना ? यांचं म्हणणं ‘आपलं अंथरुण बघून पाय पसरावेत. उगीच दुसऱ्यानं केलं म्हणून आपण करू नये, उगीच तिच्याशी कशाला ईर्षा करतेस. तू तिला गर्विष्ठ म्हणतीस तसंच ती सुद्धा तुला काहीतरी म्हणतच असणार.’
परंतु ती मला असं काही म्हणत नाही हे मला पक्क माहीत होतं. कारण, सुदैवानं तिची अन् माझी कामवाली एकच आहे. ती मला सांगतेच की सगळं. कामवालीला तिनं फितवू नये म्हणून १० रु. जास्त देते मी कामवालीला. परवाच ती सांगत होती तिनं चंदेरी साडी घेतली. आता या महिन्याच्या कीटी पार्टीला ती नक्की तीच साडी नेसणार. म्हणून यांच्यापुढं सांगून काय उपयोग! हे परत कसल्या तरी खर्चाची यादी गिरवणार म्हणून, गपचूप जाऊन उधार साडी आणली. ब्लाऊज शिवायला टाकला. मस्टर कलर चांगला म्हणून घेतला आणि कानातल्या मॅचिंगसाठी उन्हात दोन तास हिंडावं लागलं तरी रिक्षावाला चांगला.एवढे २-३ तास फिरवून फक्त ५० रु. लागले.
खरंच ही शेजारीण आल्यापासून माझा खर्च फार वाढला होता. नुकताच कलर टी. व्ही. घेतला होता. त्याचच कर्ज फिटायचं होतं म्हणून गप्प होते तर मुलं रोज तिच्याकडे झी टीव्हीसाठी जायला लागली. म्हणून हट्टानं ते कनेक्शन घेतलं. आता तरी बयेनं गप्प बसाव! लगेच दुसऱ्या महिन्यात VCR आणला. त्यानंतर व्हीसीआर घरात आणेपर्यंत यांच्या किती पाया पडावं लागलं ते माझं मलाच माहीत! आणि ही गोष्ट फक्त मोठ्या खरेदीबाबत नाही तर मुलांचे कपडे, खेळणी, त्यात पण हेच. आज काय कॅरम, उद्या बॅट- बॉल तर कधी टेनिस रॅकेट. त्यामुळे तिच्या घराचं आकर्षण मुलांना कमी व्हावं आणि तिची मुलं आपल्याकडे यायला लागावीत म्हणून यांचा रोष पत्करून सगळे खेळ आणले.
यांचं म्हणणं, मुलाना त्या खेळात रस असेल तर घे. उगीच पैसाही वाया अन् घरातही अडगळ ! पण या गोष्टींच्यासाठी ती किती मिजास करते यांना काय माहीत! तर यांचं म्हणणं, दृष्टी तशी सृष्टी. तू त्या नजरेने तिच्याकडे पहायच सोडून दे.
मी एकदा कामवालीला विचारलं, “काय ग! ते दोघे नवरा बायको कधी भांडतात का?” ती म्हणाली, “उलट त्यांचं फार प्रेम आहे एकमेकावर. ती एकेरीच बोलते नवऱ्याशी.” मी यांच्यापुढे प्रस्ताव मांडला मी तुम्हाला ए-जा म्हटलं तर चालेल का? तर यांच्या एवढा अरसिक नवरा जगात नसेल. “मला मुळीच आवडणार नाही. चार चौघात प्रेमाचं प्रदर्शन करायची गरज नाही.” झालं, म्हणजे ही हौस पुरी व्हायच्या आत निकालात निघाली म्हणून मी नाराज होते. तेवढ्यात माझ्या मोलकरणीनं आणखी एक बातमी आणली. आमची शेजारीण तिच्या मुलांना पाचगणीला ठेवणार होती शिक्षणाला. मग तर काय, नाक आणि जरा वरच.
संध्याकाळी यांचा मूड बघून हळूच विषय काढला. एकदम खेकसले नाहीत तर ‘हे’ कसले ! “तू मुलांना पाचगणीला ठेवणार ! पाच मिनीट शाळेतून मुलं उशीरा आली तर तू मुळूमुळू रडणारी ! तुझं काम नव्हे ते! ती बघ कशी धीट अन् हुशार आहे. अजूनही तुला सांगतो तिची ईर्षा करायचं थांबव आता. तू सारखा तिचा विचार करतेस तिच्या खिजगणतीत पण तू नसशील. उद्या ती नवऱ्याला घटस्फोट पण...” मी पटकन् यांच्या तोंडावर हात ठेवला.
यांच्या आणि मुलांच्या विरहाच्या कल्पनेची असह्य कळ माझ्या मनात तरंगत गेली. माझ्या घराची चौकट दुभंगवणारी ईर्षा मला पेलवणारी नव्हती. माझ्या लक्षात आलं, माझा हा स्वभाव बदल म्हणून हे सारखं सांगायचे, ती वेळ आता आली होती…