अतिथी देवो भव
अतिथी देवो भव
नुकतीच शाळा संपून कॉलेज सुरू झालेले दिवस. घरापासून बस स्टॉप पर्यंत बरेच चालत जावे लागे. रस्त्यावरून जाताना सगळ्या घरांची नावं वाचत जायचं आणि त्या घराला ते नाव का दिलं असेल, याचा मनातल्या मनात उहापोह करायचा. ही एक माझी जुनी सवय. एखाद्या बंगल्याचं नाव वाचलं की त्या घरातल्या लोकांबद्दल माझ्या मनात एक इमेज नकळत तयार होते. कुठंही वास्तुशांतीचं आमंत्रण आलं की आधी पत्रिका उघडून मी घराच नाव वाचते , मग पत्ता !
स्वतंत्र बंगल्यात राहणारे लोक नेहमीच माझ्या कुतूहलाचा विषय असत. कारण आम्ही राहत होतो तो एक मोठा वाडा होता. घरमालक आणि आम्ही वेगवेगळी चार-पाच बिऱ्हाडे. वाडा संस्कृतीत वाढत असल्यामुळे मला मोठ्या मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांबद्दल कुतुहल मिश्रित थोडासा मत्सऱ्ही वाटत असे. सर्वसाधारणपणे वाड्यांना त्या त्या घरमालकांची आडनावांची नावे देऊन पुढे वाडा असे लिहिले असे. आमचा वाडा शेगुणशी वाडा असा ओळखला जायचा. आजूबाजूला वाटवे वाडा, लिमये वाडा, जोशी वाडा असे अनेक वाडे पण होतेच. त्यामुळे वाड्यांना मालकांचे नाव देण्यात येते असे माझ्या मनामध्ये दृढ झाले होते.
पण स्वतःचे घर असणारे लोक आपल्या घरांना जी नावे देतात त्याबद्दल मी नेहमीच माझ्या कल्पनेने विचार करायची आणि त्यांनी या नावाची निवड का केली असेल याबद्दल माझे डोके लढवायची.
बऱ्याच लोकांचा कल घराला कुलदेवतांचं नाव देण्याकडे असतो. घर बांधायचं म्हणजे किती कष्ट ! त्यामुळे घर बांधण्याचं सार श्रेय देवाला देण्यात त्यांना धन्यता वाटते. 'गुरुकृपा', 'साई-सदन', 'गणेश-विलास' कृष्णकुंज, दत्तप्रसाद, शिवसदन, ओम अशा नावांची घरे पाहिली की, त्या घरातले लोक धार्मिक वृत्तीचे असावेत असं वाटतं. काहींना आपल्या पूर्वजांच्या पुण्याईची जाण असते. आपल्या पूर्वजांच्या स्मृती प्रीत्यर्थ ते 'पितृ कृपा', मातृ छाया' 'मातृ प्रेम' अशी नावे घरांना देऊन कृतज्ञ राहतात. काहीजण आपल्या पूर्वजांचीच नावे आपल्या घरासाठी पसंत करतात. आई, वडील, आजी, आजोबा यांचीच नावे ते घराला देतात. अशी घरं पाहीली की वाटतं या घरातून बुजुर्ग मंडळींचा आदर होत असावा.
पण काही घरांची नावचं अशी असतात की ओळख नसली तरीही क्षणभर का होईना त्या घरात आत जाऊन यायचा मोह होतो. ‘स्नेह’, ‘जिव्हाळा’, ‘वात्सल्य’, ‘आसरा’, ‘सावली’ ‘स्वागत’, अशा नावांच्या घरात आपण अगांतूकपणे गेलो तरी, या-बसा म्हणण्यापुरते तरी का होईना आपले आदरातिथ्य होईल असे वाटते तर ‘गुलमोहोर’, ‘चंदन’, ‘फुलोरा’, ‘निशीगंध’, ‘रातराणी’ नावांच्या घरात प्रवेश करताच फुलांचा सुगंध नकळत मनात दरवळत असावा. परंतु ‘तपस्या’, ‘श्रमसाफल्य’, ‘समर्पण’ अशी नावे मात्र मनावर एकदम टेन्शन आणतात. बरीच मेहनत करून या लोकांनी हे घर बांधलं असावं किंवा हे लोक फार कष्टाळू तरी असावेत. किंवा त्यांनी स्वतःचे घर व्हावे हे स्वप्न उराशी धरून भरपूर कष्ट करून ते बांधले असावे हे नक्की. ‘सुखसागर’, ‘नंदनवन’, ‘गिरीविहार’, ‘कल्पतरु’ ही नावं मात्र एकदम स्वप्नील नगरीसारखी वाटतात. सुख आणि आनंद अशा घरात भरून रहात असावेत.
काही लोक आपल्या पेशाला अनुसरून घराला नाव देतात. मिरजेला एका गणिताच्या प्रोफेसरनी घराला ‘बेरीज’ नाव दिलयं. त्यामुळे एखाद्या इतिहासाच्या प्रोफेसरनी घराला, ‘पंचवटी’, ‘अयोध्या’, ‘इंद्रप्रस्थ’ असं नाव दिलं तर त्यात काय नवल ? ‘सरगम’, ‘आरोह’, ‘स्वरविलास’ अशा नावाचं घर म्हणजे एखाद्या संगीत प्रेमीचच असणार, यात शंका घेण्यासारख काही नाही. किंवा 'जंतर मंतर' हे एखाद्या जादुगाराच्या घराला शोभणारेच नाव नाही का? मी जेव्हा 'आकाश', 'सागर', 'चांदणी' अशा नावाची घरं पहाते तेव्हा तेही एखाद्या भूगोल प्रोफेसरच घर असेल म्हणून मनाची समजूत करून घेते; परंतु 'अक्षय', 'अमर', 'मयूर', 'झर्पूझा' वगैरे नावांची घरे पाहिली की मात्र माझे 'कुतुहल' जागे होते. हे नाव त्यांनी का निवडलं असावं ?
घराला देण्यात येणार नाव अर्थपूर्ण असावं, असं मला वाटतं. निदान तुम्ही हे नाव का दिलं याचं समर्पक उत्तर तरी देता यावं. घराच नाव आणि घरातील माणसं यात विरोधाभास नसावा. नाहीतर घराचं नाव ‘फुलोरा’ आणि दारात एकपण फुलाचं झाड नाही. घराचं नाव ‘सुस्वागतम्’ आणि गेटमध्ये पाऊल ठेवताच कुत्र भुंकत अंगावर यावं. घराच नाव ‘शांती सदन’ पण घरात रोज मतभेद आणि भांडण ! मग या घरांची नावं मला बेढब वाटू लागतात.
या सगळ्या नावांच्या गदारोळात अगदी मनापासून माझ्या लक्षात राहिलेलं एक घर आहे. आम्ही कॉलेजला जात असताना बस स्टॉपपाशी एक दुमदार बंगाला होता. त्याच नाव ‘अदेभ’. मी त्या नावाचा फार विचार करायची; पण अर्थच कळत नव्हता. रोज सकाळी आम्ही कॉलेजला जाताना एक प्रसन्न वयस्क गृहस्थ गेटमध्ये जुईची फुलं काढत असायचे. एके दिवशी आम्हां मैत्रिणींनी न राहवून त्यांना त्या नावाचा अर्थ विचारला. ते हसत म्हणाले, ‘सांगतो, पण आधी आत तरी या.’ जुईचा मंद सुगंध, शेणानी सारवलेल्या सुंदर अंगणात रेखीव रांगोळी, दारात तुळस, तुळशीसमोर तेवणारा मंद दिवा, उंबरठयावर रेखलेली गोपद्म… आम्ही आत पाऊल ठेवताच हॉलमध्ये पिंजऱ्यातल्या विठूने ‘राम राम’ म्हणत आमचं स्वागत केलं. त्या गृहस्थाच्या पत्नीने पाणी आणून दिलं. नंतर ते म्हणाले, ‘मुलींनो, अदेभ म्हणजे “अतिथी देवो भव”.
त्या घरातून बाहेर पडताना जुई- सुगंधाबरोबर अतिशय सार्थ आणि समर्पक नाव असलेला एक तरी बंगला आपल्याला पहायला मिळाला, याचं समाधान माझ्या मनात दरवळत राहीलं.