विचार करायला लावणारा लेख
विचार करायला लावणारा लेख
२६ जानेवारीच्या अक्षरयात्रा पुरवणीतील जयवंत यांचा 'आपला उपयोग आहे तोपर्यंत' हा लेख फारच आवडला, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा, असा लेख आहे. वृद्धत्व कोणालाही टळलेले नाही. तसेच काळ पण कुणासाठीही थांबत नाही. प्रत्येक माणूस क्षणाक्षणाला वृद्ध होतच असतो. जरी आपण आपले वय लपवून ठेवायचा प्रयत्न केला तरी निसर्ग आपले काम चोख बजावत असतो, शरीराने आपण तरुण आहोत, असे भासवण्याचा आपण प्रयत्न करतो. थोडक्यात वृद्धत्व आपल्याला नको असते. तरुण असतानाही आपण चालत असतो वृद्धत्वाच्याच वाटेवर. पण आपण त्याचा विचार करत नाही. झाडावरून गळून पडणाऱ्या पिवळ्या पानांना हिरवी पाने हसायची म्हणे! उद्या आपण पण याच अवस्थेला जाणार आहोत, हे सत्य आपल्याला कटू वाटते, पण योग वेळीच हे सत्य स्वीकारून पुढच्या दृष्टीने शरीराची व मनाची घडण करणे आपल्या हातात असते.
शरीर हे एक इंजिनच, कार्यक्षमता थोडीफार कमी-जास्त होणारच, पण मन तरुण ठेवणे आपल्या हातात असते. आपल्याजवळील ज्ञान, अनुभव, कला यांच्या शिदोरीवर आपण वृद्धपणी आनंदी जीवन जगू शकतो. म्हातारपणी मुलांनी आपलं करावं ही अपेक्षाच दुःखाचे मूळ बनू शकते, अपेक्षाभंग झाला तर दुःख होते. एकाकीपणाच्या भावनेने आपणच आपल्यावर अन्याय करत राहतो. म्हणून आधी स्वतःची ओळख नीट करून घ्यायला पाहिजे, आपले मन रमेल, असा एखादा छंद आधीपासून जोपासला तर नंतर वेळ रिकामा वाटणार नाही शक्य असेल तर आपण कुणावर अवलंबून राहणार नाही, एवढी आर्थिक तरतूद जरी केली तरी मनावर परावलंबत्वाचे दडपण येत नाही. म्हातारपणाला अनुसरून येणाऱ्या शारीरिक व्याधी, सून-मुलगा यांचे नकळत आपल्याकडे होणारे मतभेद, दिवसेंदिवस कमी होणारी शारीरिक क्षमता इ. गोष्टी आधीपासून गृहित धरल्या तर नंतर अनपेक्षित दुःख भोगावे लागणार नाही.
स्वतः शक्य तेवढे आनंदी, उत्साही राहून प्रेमाचे दोन शब्द देणे हे तर कुणालाही सहज शक्य आहे. थोडीशी तडजोड व समाधानी वृत्ती असेल तर कोणतीही अडचण दूर होऊ शकते. तरुण पिढीबरोबर आपण धावणे शक्य नसले तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या आड आपले वृद्धत्व आणू नये, एवढी समंजस वृत्ती असेल तर दोघेही एकमेकांना सहकार्य करू शकतील. कारण इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा घरात एखादे वडीलधारी माणूस असणे ही फार मोठी संपत्ती आहे, एक आधार असतो. सुरक्षितता असते, हे तरुण पिढीने लक्षात घ्यायला हवे.
आपण वयोवृद्ध झालो तरी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध होऊन घरातील इतर मंडळीना आधार देतो आहोत ही भावना पण सुखावह असते. आपले वागणे असे ठेवावे की आपल्या असण्यापेक्षा नसण्याची उणीव वाटली पाहिजे, आपला आनंद आपण आपल्यात शोधण्याची सवय लावून घेतली तर वृद्धत्व पण वरदान वाटू शकेल, मध्ये महाराष्ट्रटाइम्समध्ये कविता वाचली होती.
जवानी की आँखोंमे ज्याला होती है
बुढापे की आँखोमे प्रकाश होता है
जवानी की बाहोमे मिडरी होती है
बुढापे की बाहोमे आकाश होता है
जवानी संचय करती है
बुढापा दान देता है
जवानी सुंदर होती है
बुढापा महान होता है
मग अशा या उदात्त, पवित्र वृद्धत्वाचं स्वागत नैराशेनं का करावं? उलट आनंदानं, तृप्त मनानं हसत त्याला म्हणावं, ‘ये वृद्धत्वा, आम्ही तुझ्या स्वागतासाठी तयार आहोत.
आपलं वृद्धत्व आपली कमजोरी बनू नये, म्हणून मनाने खंबीर होऊन मनातील आनंद टिकवला तर आयुष्य कंटाळवाणे होणार नाही, म्हातारपणी कितीतरी लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. आयुष्य रेटावे लागते. हा धोका टाळण्यासाठी आधीपासूनच मानसिक तयारी करावी हा ‘जयवंत’ यांचा इशारा मननीय व आचरणीय आहे, असे वाटले. सर्कशीतल्या घोड्याची उपमा तर एकदम योग्य, शेवटी मन जिवंत ठेवायला हवे कारण
जगावसं वाटत आहे
तोपर्यंत मरण्यातसुद्धा आहे मजा
मनच जर मरून गेलं
तर जगणं म्हणजे आहे सजा