सुट्टीतली मौज
सुट्टीतली मौज
मे महिन्याची सुट्टी संपून नुकतीच शाळा सुरू झाली होती. नवीन पुस्तकं, नवीन शिक्षक, काही नवीन मित्र मैत्रीणी यात मुल दंग होती. माझ्या मुलीच्या काही मैत्रीणी जमल्या होत्या. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. प्रत्येक जण मे महिना आपण काय केलं, कुठ गेलो, कोणते सिनेमे पाहिले याची माहिती देत होती. मी आत पेपर वाचत बसले होते. मला कुतुहल वाटून मी बाहेर आले. त्यांना म्हटलं तुम्ही प्रत्येकीनं या दोन महिन्यात काय काय केलं मला सांगा बघूया. त्या अगदी उत्साहानं बोलू लागल्या. एकजण साउथ इंडिया ट्रिपला जाऊन आली होती. तिथे आपण कशी मजा केली, काय काय खरेदी केली सांगत होती. कुणी संस्कार शिबिर, स्विमींग कोर्स, नाट्य शिबिर, हस्तकला, पेंटींग, पाककला, गाण्याचा क्लास वगैरे वगैरे छोटे छोटे कोर्स करून आल्या होत्या. टी. व्ही वरती जास्ती पिक्चर कुणी पाहिले याची मोजदाद झाली. कुणी सायकल, लुना शिकायचा प्रयत्न केला होता. एकीने तर चक्क २ महिने संस्कृत शिकवणी केली होती. एकटी ट्रेकींगला जाऊन आली होती. त्यांच्या गप्पानी मला खूप मजा वाटली तसचं थोडासा हेवा पण वाटला.
खरच ही मुलं किती भाग्यवान आहेत. मनोरंजनाच्या कितीतरी सुविधा त्यांना सहजपणे उपलब्ध आहेत. अर्थात टी. व्ही. सारख्या मनोरंजनाचे परीणाम वाईट होतात हे मान्य आहे. तरी पण सुट्टीमधे आपापल्या आवडी प्रमाणे विविध क्षेत्रात रस घ्यायला त्यांना संधी उपलब्ध होते हे का कमी आहे ? वर्षभर शाळा, अभ्यास कंटाळवाण्या रूटीनमधे त्यांना आपले छंद जोपासणे कठीण जाते. सुट्टीत जर त्यांना वाव मिळेल तर ते चांगलेच नाही का ?
आमच्या लहानपणी सुट्टीतली मौज आणि आता ही मुलं सुट्टीत करीत असलेली मौज खरच किती फरक आहे. त्यावेळी सुट्टी लागली म्हणून कोणत्या दुरीस्ट कंपनीतर्फे फिरायला जाव, सुट्टीत पैसे देऊन काही शिकायला जाव अशी आर्थिक परिस्थिती तर मुळीच नसायची. उलट आता सुट्टी आहे. मुलीच्या जातीला कामाची सवय पाहिजे म्हणून ४ कामं मांत्र वाढायची. अंगण सारवणे, घरातील पडझडीची लिंपलिंपी, स्वयंपाक घरात वरच्या कामात आईला मदत, स्वतःचे कपड़े स्वतः धुणे, हे सगळ न कुरकुरता करायला लागायच. त्याला पापड, सांडगे यासारखी उन्हाळी कामं पण भरीव असायचीच, नाही म्हणायला चार दिवस का होईना पण मामाच्या गावाला जायला मिळायचं. कारण वडीलांना सख्ख भावंड कुणी नव्हत. मिरजेहून बाळेकुंद्रीपर्यंत प्रवास आम्हाला मजा वाटायची. मिरजेला रेल्वेस्टेशन पर्यंत टांग्यात बसायचं. तिथून पुढे बेळगाव पर्यंत पॅसेंजर (कारण तिला तिकीट कमी) मग पुढे रिक्षा आणि बसनं बाळेकुंद्री म्हणजे एकाच प्रवासात टांगा, रेल्वे, रिक्षा, बस सर्व हौस पुरी.आजोळी बाकीची माणसं, मामे भावंड जमत. मोठं चौसेपी घर. मागे मोठं परसू, त्यांच्यात सगळी पेरू, चिंचा, रामफळ, लिंबूझाडं, अबोली आणि मोगरा तर नुसता डवरलेला. रोज सकाळी ताटमर फुले काढायची गजरे करायचे, मेतकूट,पोहे आणि लाहीपीठ यांची तर लयलूट. दुपारभर परसात घुडगूस. पेरू काढ, चिंचा काढ, लपंडाव, सुर पारंबी. त्यांच्यात होणारी भांडणं, रुसवे फुगवे रोज चाले. त्यात दुपारी आजी आजोबा झोपले की कोठी खोलीतून बोरीतला भात पळवून आणायचं आणि जांभळ करवंद विकत घ्यायची. केसांची गुंतवळ देवून पिना, रेबीनी घ्यायच्या. सध्यांकाळी आजोबानी कधी गोष्टी सांगाव्या, कधी गीता तर कधी तोंडीं गणितं घालावी तर कधी पाढे म्हणावे. पाढे चुकणाऱ्यांची गय नसायची. त्यांच्यात एक दिवस शेतात जायच भरपूर ऊस, काकवी मजाच मजा अशी सुट्टी संपून जायची ! मी माझ्या मुलीच्या मैत्रीणींना आमची सुट्टीतली मजा सांगितली. त्यांना पण गंमत वाटली. त्यातली एक टारगेट मुलगी हनुवटीवर बोट ठेवून माझ्याकडे पहात नाटकीपणे हसत म्हणाली "तो क्या जमाना बदल गया है ?"