शुभमंगल सावधान (?)
शुभमंगल सावधान (?)
अत्यंत शुभ वाटणारा असा हा नाजूक वैवाहिक बंधनाचा रेशमी सोहळा! वरवर आनंदाची, उत्साहाची, उधळण करत असला तरी डोक्यावर पडणाऱ्या अक्षतांबरोबर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या भावी आयुष्यातील जबाबदाऱ्या लक्षात घेऊन 'सावधान' राहण्याचा पण इशारा वधुवरांना देतो. लग्नाच्या पवित्र बंधनांने काया, वाचा, मनाने पती पत्नींचे मिलन होते हे खरे! पण ज्या विवाहामुळे सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबामध्ये एकमेकाबद्दल आदर व स्नेह वृद्धींगत होत असेल तोच खरा 'मंगल' विवाह ठरावा. परंतु असे विवाह अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात असे आजुबाजूचे चित्र पाहून लक्षात येते.
वैवाहिक बंधनामुळे एक कन्या दोन कुळांचा उद्धार करते असे आपण म्हणतो. परंतु हीच मुलगी नववधुच्या वेषात, माहेरचे लाडीक पाश एका क्षणात तोडून जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा तिला जशी तिथल्या वातावरणाशी तडजोड करावी लागते तशीच तडजोड घरातील सर्व लोकांनी तिच्याशी करून तिचा विश्वास संपादन करून घ्यायला हवा. परंतु लग्नाच्या दिवसापासूनच देण्याघेण्यातील काही त्रुटी, नकळत राहून गेलेले मानपान, मध्यस्थांची मोठेपणा घेण्यासाठी अतिरेकी लुडबूड आणि खोट्या प्रतिष्ठेचे आपणच ओढून घेतलेले बुरखे,यामुळे सासर आणि माहेर यांच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू होते. जिच्याकडून आपण दोन कुळांच्या उद्धाराची अपेक्षा केलेली असते तीच या कलहाचा केंद्रबिंदू होते.
काही ठिकाणी ही भांडणे इतकी विकोपाला जातात की मुलीला माहेर तरी कायमचे बंद होते किंवा माहेरचे लोक वरचढ असतील तर पतीला त्याच्या आईवडिलांपासून दूर करून स्वतंत्र संसार थाटण्यात मुलगी यशस्वी होते. काही प्रसंगी ‘नातिचरामी’ असे तीनदा छाती ठोकून सांगणाऱ्या नवरदेवाच्या छळवादाला कंटाळून पत्नीला कायद्याची दारे ठोठवावी लागतात व त्याची परिणिती घटस्फोट, हुंडाबळी, आत्महत्त्या वगैरे.
फक्त सासर आणि माहेर यांच्यात सुसंवाद नसल्याने बरेचसे विवाह ‘शुभविवाह’ न होता क्लेशदायक होतात. विवाहाच्यावेळी गणपती, सरस्वती, लक्ष्मी, अग्नी आणि जलदेवता यांच्या साक्षीने वधुवरांना काही प्रतिज्ञा कराव्या लागतात त्या प्रतिज्ञांचा अर्थ समजून घेऊन त्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वधुवरांच्या घरच्या मंडळींनी त्यांना लग्नाला उभे करताना त्यांना या सर्व गोष्टी समजावून त्यांची मानसिक तयारी केली पाहिजे, वैवाहिक जीवनात तडजोड आणि समाधानी वृत्ती जोपासण्यासाठी आजूबाजूच्या समाजाने पण भांडणात तेल न ओतता सहकार्य दिले पाहिजे. वधुवरांची परस्पर संमती व लग्नाचे योग्य वय हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा काही थोड्या ‘सावधानता’ बाळगल्या तर होणारा प्रत्येक विवाह हा ‘शुभ’ आणि ‘मंगल’ होईल.