दृष्टिकोन बदलायला हवा
दृष्टिकोन बदलायला हवा
डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या शारदोत्सवातील भाषणाचा वृतांत वाचला. निव्वळ चैनीसाठी नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असली तरी पुरुषांच्या बरोबरीने कौटुंबिक आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी (कधी कधी मनाविरुद्ध सुद्धा) नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या भरपूर आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रिया मुलांवर चांगले संस्कार करू शकत नाहीत हे विधान कितपत योग्य आहे ‘स्त्री नोकरी करणारी असू दे किंवा घरात बसणारी; तिच्यातील आईचं हृदय, वात्सल्य वेगळे असेल काय? एक आई म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कारच व्हावेत म्हणून आम्ही धडपडत असतो. नोकरीमुळे मुलांना आम्ही पूर्णवेळ देऊ शकत नाही याची अंतर्वेदना सांगून फक्त आईच्या मनालाच समजेल ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ अशीच आमची अवस्था असते. त्यामुळे उलट आमचेच मुलांवरती जास्त लक्ष असते. त्यामुळे मुले जास्त स्वावलंबी व समजूतदार असतात. नोकरीमुळे आम्ही दिवसभर बाहेर राहतो. पण चैन तरी करतो काय? तिथे राबल्याशिवाय पगार मिळतो काय? किंवा नोकरीमुळे घरकामातून तिची सुटका होते असे पण नाही. नोकरीत सुद्धा स्त्री म्हणून कोणाची फारशी सहानभूती मिळते. हे पण खरे नाही. तिथे पण तेवढेच राबावे लागते. पगार आमच्या एवढाच घेता ना असा रोख ठोक सवाल ऐकून घ्यावा लागतो. तसेच नोकरीमुळे स्वतःच्या आवडी निवडी छंद यांच्याकडे पाठ फिरवावी लागते. क्वचित प्रसंगी रजा न मिळाल्याने कौटुंबिक कार्यक्रमातून सहभागी होता येत नाही. त्यामुळे नातेवाईकांमध्ये पण गैरसमज होतात. लग्नाच्या बाजारातपण बऱ्याच ठिकाणी मुलगी नोकरी करते का? हा प्रश्न प्रथम विचारला जातो, हे कशाचे प्रतीक आहे? सध्या आजूबाजूला असलेली असुरक्षितता, वाढती व्यसनाधीनता, कर्ज काढण्याची वाढती प्रवृत्ती बोकाळत असताना मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे. ज्या स्त्रियांना मनासारखा नवरा, आर्थिक स्वैर्य लाभलय त्यांनी नोकरी करणाऱ्या स्त्रियांची मानसिक शारीरिक कुचंबणा समजून घेतली पाहिजे, घरी असणाऱ्या स्त्रियांना मुलांवर संस्कार करायला वेळ ठरवून करता येत नाही. ज्या वातावरणात मुले वाढतात त्यातून त्यांच्यावर संस्कार घडत जातात. केबल, टिव्ही, आणि सिनेमा सारख्या प्रसार माध्यमामुळे घरात असणाऱ्या स्त्रियांची मुले पण संस्कारापासून दूर जात आहेत. त्यामुळे अशी प्रसार माध्यमे व आजची शिक्षण पद्धती पण याला तेवढीच जबाबदार आहे. फक्त नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर खापर फोडून चालणार नाही.
स्त्री फक्त नोकरीसाठी घरातून बाहेर पडते असे चित्र आता राहिलेले नाही. डॉक्टर, वकील, प्रोफेसर इंजिनीयर, असा व्यवसायिक क्षेत्रात पण स्त्रिया भरपूर राबतात व कमवतातही. कितीतरी महिला उद्योजक आघाडीवर आहेत. राजकारणात पण स्त्रियांचा सहभाग, आहे. नाट्य, संगीत सिने क्षेत्रातपण असंख्य स्त्रिया राबत आहेत. मग त्यांच्या मुलांचे काय? एखाद्या व्यावसायिक किंवा कलात्मक क्षेत्रात राबणाऱ्या स्त्रियांकडे ज्या मानाने बघितले जाते तसे एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीकडे का पाहिले जाऊ नये? त्या पैसे कमी मिळवत असतील पण कष्टच करतात ना? मग फक्त नोकरी करणारी स्त्रीच समाजामध्ये चर्चेचा विषय का होते हे समजत नाही. उलट आमच्या नोकरीवर होणाऱ्या उलट सुलट चर्चा आमच्या मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करतील अशी भीती वाटते. त्यामुळे नोकरी करणाऱ्या स्त्री ची मानसिक कुचंबणा प्रथम नवऱ्याने तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने समजून घेऊन तिला योग्य न्याय दिला पाहिजे. तरच तिच्या कष्टाचे चीज होईल. तिच राबणे कुटुंबासाठीच आहे हे विसरू नये.
एक नोकरी करणारी स्त्री, दोन मुलांची आई अशा दोन्ही भूमिका निभावणारी एक स्त्री म्हणून ही कैफीयत मांडली आहे.नोकरीला कुणाची सहानभूती मिळावी ही या मागची भावना नाही. जास्तीत जास्त स्त्रिया संसाराला हातभार लावण्यासाठी राबतात. अनपेक्षितपणे येणाऱ्या वैधव्याचे आव्हान स्वीकारताना स्त्रियांना नोकरीशिवाय पर्याय नसतो. कौटुंबिक जबाबदा-यांसाठी, लग्नाच्या बाजारात स्वतःची क्रेझ वाढवण्यासाठी स्त्रियांना नोकरी करावी लागते. शारीरिक कष्टाबरोबर मानसिक कुचंबणा सहन करावी लागते, प्रत्येक स्त्रीच्या नोकरीला काही ना काही पार्श्वभूमी असते. ती समजून घेणे आवश्यक आहे. मुंबईसारख्या ठिकाणी तर स्त्रियाना ४-५ तास प्रवास करून नोकरी करावी लागते, त्यांचे हाल किती होत असतील?
पूर्वीप्रमाणे फक्त पुरुष अर्थार्जन करणारी कुटुंब व्यवस्था आता राहिलेली नाही. काळाची गरज, वाढती महागाई यामुळे स्त्रियांनी पण नोकरी करणे बऱ्याच ठिकाणी गरजेचे झाले आहे. सहनशीलता आणिण संयम यांचे प्रतीक असणान्या स्त्रीने बदलत्या सामाजिक व्यवस्थेबरोबर पुरुषांप्रमाणे अर्थार्जनाचे आव्हान समर्थपणे स्वीकारले आहे, म्हणूनच प्रामाणिकपणे एवढेच म्हणावेसे वाटते की नोकरी करणारी स्त्री कुणाच्या चर्चेचा, उपहासाचा विषय होऊ नये. त्यासाठी अशा स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन प्रथम बदलणे आवश्यक आहे असे मला वाटते.