घर
घर
“घर’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चार भिंती, खिडक्या, दारे व उतरती कौले असे चित्र येते. हेच घर जेव्हा जरा आधुनिक स्वरूपात दुमजली किंवा तिमजली होते तेव्हा त्याला “बिल्डिंग” म्हणतो. गवत, माती, वापरून बांधल्या गेलेल्या एखाद्या गरिबाच्या घराला “झोपडी’ तर कापडी झोपडीला आपण “तंबू” म्हणून ओळखतो. दोन-तीन खोल्यांची सलग बांधलेली घरे भाड्याने दिली तर ती लगेच “चाळ” होते. पण हीच चाळ जरा आधुनिक पद्धतीने बांधली तर तिथे प्रत्येक जण घराचा मालक होतो. त्याला ‘फ्लॅट’ सिस्टीम म्हणतात. राहाण्याची जागा म्हणजे घर! परंतु ते राणीच घर असेल तर “महाल’ राजाचं असेल तर ‘राजवाडा’ गरिबाची ‘झोपडी’, ‘श्रीमंताची ‘बिल्डिंग’ मध्यम लोकांची ‘चाळ’ असे आपण ठरवून टाकलंय. दगड, माती, सिमेंट वापरून घर बांधता येतं हे खरं पण त्या घराला ‘घरपण’ येण्यासाठी ते प्रेम-जिव्हाळ्याने सजवावं लागतं. घरातील व्यक्तींना एकमेकांबद्दल आदर, आपुलकी त्या घराचे “घरकुला’त रूपांतर करते. चांगल्या सुसंस्कृत घरातील लोक “घरंदाज” म्हणून ओळखले जातात किंवा घरातल्या मुलाचे लग्न ठरवतांना "मुलीचं घराण" चांगलं आहे ना? हा सूर सगळीकडे ऐकायला येतो. ज्या प्रमाणं 'घर' चांगलं होण्यासाठी चांगल्या मजबूत पायाची गरज असते त्याप्रमाणे त्या घराचं 'घरकुल' होण्यासाठी, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, सात्विकपणा, समाधान, तडजोड, सुसंस्कृतपणा, धार्मिकता या सर्वांच्या मिश्रणाचा पाया घरात असावा लागतो.
घराचं 'घरपण' टिकवून ठेवणं हे 'गृहलक्ष्मी' बरोबर घराच्या प्रत्येक सदस्यांवर अवलंबून आहे. घरातील सर्वजण संतुष्ट असतील तर त्या घराची 'गृहशोभा वाढते. घरात सदैव शांती व समाधान नांदावं म्हणून नवीन घरात प्रवेश करताना देव-देवताना आवाहन करून त्या वास्तूची शांती करतात. मगच 'गृह प्रवेश' होतो.
खरं म्हणजे हे विश्वची माझे घर' असं मानलं तर घराची कल्पना आपल्या घराची चौकट व घरातील सदस्य एवढ्यापुरती मर्यादीत राहात नाही. घरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाचा घरात आदर झाला पाहिजे. 'अतिथी देवो भवः ! शेजाऱ्यांचे आणि आपले संबंध घरोगचे मैत्रीचे व सहकार्याचे असणे ही तर नैतिक जबाबदारी आहे आपण ज्या समाजात राहातो ते एक मोठं घर आहे व आपले घर त्या घरातील एक सदस्य आहे, असे आपण मानले तर प्रत्येक घर घरकुल होईल.
परवा एक लग्न पत्रिका पाहिली. त्यावर घराचे ‘घरकुलात रूपांतर करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या वाचायला मिळाल्या. त्यांचा इथे उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
“समाधान हेच घराचे सुख व्यवस्था हीच घराची शोभा संतुष्ट स्त्री हीच घराची लक्ष्मी आतिथ्य हेच घराचे वैभव धार्मिकता हाच घराचां कळस”.