स्वप्नांची दुनिया
स्वप्नांची दुनिया
काही काही लोकांना स्वप्नं बघायचा छंद असतो. मलाही आहे. स्वप्नं बघणं ही जरा मजेची गोष्ट आहे, कारण कोणतं स्वप्न बघाव, याचा आपल्याला चॉईस असतोः त्यामुळे आपण ही स्वप्ने मनाप्रमाणे रंगवून त्यांचा काल्पनिक का होईना सुखद अनुभव घेऊ शकतो; परंतु झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचा काय भरवसा ? कधी आणि कसले स्वप्न पडेल कही सांगता येत नाही. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' म्हणतात. परंतु कधी कधी रात्री झोपताना किंवा दिवसभरसुद्धा आपल्या डोक्यात, नसणाऱ्या गोष्टीसंबधी विचित्र स्वप्ने पडतात. काही स्वप्ने तरी इतकी भयानक असतात की त्यांच्यामुळे रात्री अचानक जाग येते आणि त्या स्वप्नाचा विचार करत झोपेचं मात्र खोबरं होतं. त्यामुळे स्वप्न पडणे या प्रकारापेक्षा स्वप्न बघणे मला जास्त आवडतं.
काही काही पडणारी स्वप्नं फार फसवी असतात. एकदा आम्ही मैत्रीणी ट्रीपला जायचं ठरवलं, पहाटे सहाची गाडी होती. रात्री झोपेत मला स्वप्न ! कि मला उठायला उशीर झालाय आणि माझी गाडी चुकली. मी दचकून जागी झाले तर घड्याळात अडीच वाजलेले. आता परत जाग येईल की नाही या भीतीने रात्रभर जागत राहिले. तरीपण हे स्वप्न काय अनपेक्षित नव्हतं कारण रात्री झोपताना डोक्यात तेच विचार होते. परंतु काही स्वप्नांमध्ये जागा अनोळखी, माणसेसुद्धा अनोळखी असतात. उगीचच कुणाच तरी लग्नं, आपण त्यात नटून वावरणं! किंवा कुठलं तरी देऊळ, उत्सव त्यात आपला सहभाग ! अशा स्वप्नांचे संदर्भ लागत नाहीत.
पहाटे पडणारी स्वप्ने खरी होतात ! मी कॉलेज सोडून दहाबारा वर्षे झाली असतील आणि परवा मला एक स्वप्न पडलं, की उद्या इंग्रजीचा पेपर आहे. आपला काही अभ्यास झाला नाही म्हणून आपण रडत बसलोय. सकाळी जाग आली आणि वास्तवतेचं भान आलं. हसू आलं. माझ्या एका मैत्रीणीला पडलेल्या स्वप्नावरून शकुन अपशकुन सांगायची सवय होती. तिला एक फार मोठी ज्योतिषी समजून आम्हीपण तिला आमची स्वप्नं सांगायचो. तिनं स्वप्न चांगलं म्हटलं की खूष व्हायचं, अपशकुन म्हटलं की मग देवापुढे हात जोडायचे. तिच्यामते, वाहतं पाणी, नागसाप, जेवणाची पंगत स्वप्नात येऊ नये. फुले, देऊळ, मृतव्यक्ती स्वप्नात येणं ती शुभ मानायची. आम्हाला पण ते खरं वाटायचं.
पण जसजसे मोठे झालो, तसतसे स्वप्न आणि वास्तवता यातला खरा फरक लक्षात येण्याजोगा जाणवायला लागला. जी स्वप्नं झोपेत पडतात त्यात तथ्य नसतं, जी स्वप्न जागेपणी पाहतो ती प्रत्यक्षात उतरणं कठीण असतं, याचं भान आलं. अर्थात एखादं चांगलं स्वप्न पाहण हा काय माणसाचा स्वभाव आहे. कुणी आपल्या प्रेमाला मूर्त स्वरुप येण्याचं स्वप्न पाहिल, तर कोणी घर बांधण्याचं, तर कोणी आपल्या करीयरचं ! व्यक्तीमध्ये स्वप्नांची भिन्नता असणारच. आपण पाहात असलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरावी म्हणून धडपडण्यात पण एक मजा आहे. सगळ्यांची स्वप्न साकारत नसतील; पण भंगलेल्या स्वप्नांना पण आयुष्यात एक स्थान आहेच की! त्यामुळे काही निराशही होत असतील. पण काही वास्तवतेचं भान येऊन दुसऱ्या स्वप्नांना जवळ करत असतील.
मला तरी काही वेळा ही स्वप्न देवदूतासारखी वाटतात. प्रत्यक्षात आपणे जी सुख अनुभवणं अशक्य आहे, ती स्वप्नांमुळे आपल्या मनावर मोरपिसासारखी फिरत राहतात, जरी एखादं भयानक स्वप्न पडले तरी जाग आल्यावर ते खोट आहे ही वास्तवता पण सुखदायकच नाही का? त्यामुळे स्वप्न हे माणसाला एक वरदानच म्हणावं लागेल. अर्थात काही चांगली किंवा शुभशकुनी स्वप्ने खरी झाली नाहीत तर अपेक्षाभंगाचे थोडे दुःख होते हे खरे! पण जी द्राक्षे आपल्या हाताला येत नाहीत ती आंबट असे म्हणणाऱ्या कोल्ह्याप्रमाणे आपण स्वप्नांकडे पहायला लागलो तर हे वास्तवाचे भान येऊन पण अपेक्षाभंग होणार नाही, असे वाटते.