पांढरा केस
पांढरा केस
नेहमी प्रमाणे सकाळी साडेपाच वाजता गजर झाला आणि यंत्रवत् जाग आली. गजर बंद करून परत एक डुलकी काढायचा मोह मी नेहमीच आवरते. तोंड धुवून टिकली लावण्यासाठी मी आरशासमोर उभी राहिले. टिकली बोटावर घेऊन जरा झुकले तर माझ्या कपाळावर आलेल्या केसांच्या बटेमध्ये एक पांढरा केस चमकला. मी परत निरखून पाहिलं. केसाचा सुरवातीचा इंचभर भाग पांढरा झाला होता. बाकी खालीपर्यंत तो काळाच होता. तो उपटून टाकला तर! पण एक उपटला तर दोन केस पांढरे होतात म्हणे ! मी कंगव्याने केस फिरवून, तो केस न दिसेल अशी पिन लावून टाकली आणि कामाला लागले. ऑफीसला जातानासुद्धा माझ्या डोक्यातून पांढऱ्या केसाचा विचार जाईना. मी माझी वेणी पुढं घेतली. रोजच्या धावपळीत आपल्याला स्वतःकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, याचं जरा वाईट वाटलं.
मी मनात ठरवलं, फारच केस पांढरे झाले तर मेंदीडाय करून घेता येईल, त्यात काय एवढं? मी माझ्या नकळत, माझ्या मैत्रिणींच्या वेण्या निरखू लागले. ‘केसांची निगा’, ‘केसांसाठी योगा’ वगैरे लिहिलेल्या मासिकांची मुखपृष्ठं मला घ्यावीशी वाटू लागली. त्यात लिहिलेले उपाय आपल्या रुटीनमध्ये आपल्याला जमतील का? अशी शंका पण यायला लागली. एके दिवशी संध्याकाळी मी केस विंचरताना तो पांढरा केस माझ्या मुलीला दिसला. ती लगेच ओरडली, “आई तुझ्या डोक्यात पांढरा केस !” हे म्हणाले, “मग, आई आता म्हातारी झाली.” म्हणजे तो पांढरा केस माझ्या म्हातारपणाची नांदी होती तर ! मी परत अस्वस्थ झाले. बालपण संपून तारुण्यात पदार्पण करताना सुद्धा कधी एवढा विचार केला नाही. त्यानंतर पत्नी, सून, नणंद, भावजय, आई, मैत्रीण अशा कितीतरी भूमिका निभावत आपण कधी प्रौढ झालो ते पण समजलं नाही. आपला बालीशपणा आपण कधी कुठे सोडला ते पण आता आठवत नाही आणि आता चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना डोक्यात एक पांढरा केस होतो काय आणि आपण एवढं बेचैन होतो काय ! मला समजेना. मी परत केस विंचरून तो पांढरा केस आत घालून टाकला. आणि त्याचा विचार करतच निद्राराणीच्या आधीन झाले.
सकाळी नेहमी प्रमाणे जाग आली. यांना पण लौकर उठवायचं होतं म्हणून यांना हाक मारताना माझ्या लक्षात आलं. या १० वर्षात यांच्यात पण किती बदल झाले आहेत. डोक्यावरचे केस टक्कल जाणवण्याएवढे कमी झाले होते. पोट पण चांगलच सुटलं होतं. यांना त्याची काही जाणीव नव्हती. हे आरामात घोरत होते. वयाप्रमाणे शरीरात होणारे नैसर्गिक बदल त्यांनी किती सहजपणे स्वीकारले होते. मला वाटलं, ‘म्हातारपण’ ही कल्पनाच मुळी व्यक्ती सापेक्ष आहे. सगळे मनाचे खेळ.
मी चटकन् उठले. खिडकीचा पडदा दूर केला. पहाटेचा गार वारा आत आला. खूप बरं वाटलं. बाहेरून आलेल्या कोवळ्या उन्हाची तिरीप आरशावर पडली. वाऱ्यानं, उडणाऱ्या केसांच्या बटेत पांढरा केस डौलानं चमकत होता. माझ्या लक्षात आलं त्याच्या पांढरेपणात वाढ झाली होती; पण मला वाईट वाटलं नाही. मी त्याच्यावरून अलगद हात फिरवला आणि म्हटलं “हे माझ्या डोक्यातल्या पहिल्या पांढऱ्या केसा, तुझं स्वागत असो.” मला हसू आलं. ते हसू मला आता मात्र गमवायच नव्हतं, आता डोक्यात आणखी पांढरे केस झाले तरीही.....