देवभूमी उत्तराखंड. आपल्या शास्त्रामध्ये चारधाम यात्रेमध्ये दक्षिणेचा रामेश्वरम, पश्चिमेची द्वारका, पूर्वेकडील जगन्नाथपुरी आणि उत्तरेचा बद्रीनाथ यांचा समावेश होतो. भगवंत रामेश्वरमला तपश्चर्या करतात, बद्रीला विश्रांती घेतात, द्वारकेला त्यांचे नियंत्रणकक्ष आहे आणि जगन्नाथपुरी हे भोजनगृह आहे असे मानले जाते. प्रत्येक धामाचे वैशिष्ट्य वेगळे, महात्म्य वेगळे आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्या आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करण्याची इच्छा होत असते. परंतु ती होण्यासाठी आपले पूर्वसंचित, पूर्वजांचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा या सर्व गोष्टींचा संगम व्हावा लागतो. भारताच्या चार दिशेला असणारी ही चारधामे पवित्र मानली जातात.
त्याचप्रमाणे उत्तराखंडमध्ये सुद्धा चारधामांचे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. या चारही धामांशी निगडीत अनेक पौराणिक कथा, संदर्भ, माहिती सतत लहानपणापासून कानावर पडत होतीच. या चारधामांची यात्रा म्हणजे हिमालयाचे दर्शन होणार ही एक उत्सुकता सुद्धा मनामध्ये होती. या यात्रेत भेटणारा प्रत्येक पर्वत, डोंगर, नदी, देवता, ऋषी, प्रत्येक जण एक पौराणिक किंवा सांस्कृतिक महत्त्व घेऊनच समोर येतो. उत्तराखंड ही खरोखरच देवभूमी आहे, हे तिचे निसर्ग सौंदर्य पाहताना क्षणोक्षणी पटत राहते. निसर्गाने या भूमीवर सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केली असली तरी इथला निसर्ग लहरी आहे. क्षणाक्षणाला वातावरण बदलवणारा आहे. सर्व पहाडी आणि दुर्गम भाग असल्यामुळे प्रवास थोडा थकवणारा, भीतीदायक, परंतु तेवढाच नेत्रसुखद सुद्धा आहे हे मान्य करावे लागते. या प्रत्येक स्थानाचे महत्त्व समजून घेऊन भक्तीभावाने ही यात्रा करणे महत्त्वाचे असते, असे मी अनेकजणांकडून ऐकलेले होते. त्यामुळे या यात्रेची उत्कंठा बऱ्याच वर्षापासून मनामध्ये दडून बसलेली होती. आणि यावर्षी यशोधन ट्रॅव्हल्सच्या निमित्याने हा योग जुळून आला.
आमची आजी सांगायची, पूर्वीच्या काळी प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्यानंतरच लोक ह्या यात्रेला जायचे, आणि जाताना ‘जाऊन येतो’ असे नाही तर ‘जातो’ असे सांगून जायचे. कारण यात्रा करणे इतके खडतर होते की सुखरूप परत येणे फार मुश्किल असायचे. तशी परिस्थिती आता अजिबात नसून सुद्धा यात्रेला जाताना मनामध्ये बरीच धुगधुग होती. या यात्रेला जाणारे लोक ‘भोलेनाथका बुलावा आया है’ अशी श्रद्धा ठेवून जातात. तेच सूत्र मी पण मनात दृढ केले.
प्रवासाची तयारी अगदी निगुतीनी करावी लागणार होती. वैभव आणि गौरीने त्यात जातीने लक्ष घातले होते. गरम कपडे, बूट, हातमोजे, कानटोपी, भीमसेनी कापूर, कापूस सर्व आठवणीने बॅगेत घालत होते. अर्थात प्रवासाची तयारी कशी करायची याच्या व्यवस्थित सूचना यशोधनने नेहमीप्रमाणे आपल्या पत्रकात दिलेल्या होत्याच. त्याचा खूप उपयोग झाला. आधी जाऊन आलेले बरेचसे आप्त, ‘सांभाळून जा, सुरक्षित ये, काळजी घे,तब्येत सांभाळ, अशा अनेक सूचना देऊन सावध करत होते. पण या खेपेला कुठून धैर्य आले होते हे माहीत नाही पण मी मात्र निवांत प्रवासाची तयारी करत राहिले. दिलीप आणि अरुणा बरोबर येणार होते त्यामुळे तो मोठा मानसिक आधार होता.
घरात 90 वर्षाच्या सासुबाई. त्यांची सर्व जबाबदारी नेहमीप्रमाणे यांनी उचलली आणि मला यात्रेला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे या यात्रेचे सर्व श्रेय त्यांनाच. काही ठिकाणी जोडीने काही पूजा किंवा विधी करायचे असतात त्या मात्र एकत्र जायला न मिळाल्यामुळे नेहमीच राहून जातात. असो. घरातली जबाबदारी पण तेवढीच महत्त्वाची. कोणीतरी एकाने घरी थांबणे आणि एकाने गावाला जाणे हे सर्व दृष्टीनेच सोयीचे होते. त्याची आता सवय झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. गौरी गावात असल्यामुळे तिचा पण अशावेळी नेहमीच आधार वाटत आला आहे. शेवटी प्रवासाला निघायचा दिवस उजाडला सुद्धा.
बरोबर सकाळी साडेसहा वाजता बेळगाव सोडले.आणि सांबरा विमानतळावर दाखल झालो. विक्रांत आणि हे सोडायला आले होते. दिलीप आणि अरुणा आदल्या दिवशीच मिरजेहून आल्यामुळे सकाळी लवकर निघणे सोयीचे झाले. नऊ दहा वाजता दिल्लीची फ्लाईट होती. एअरपोर्टवरती चारुताई भावे आणि भावे सर भेटले. त्यांच्याबरोबर छान गप्पा आणि सँडविच, डिंकाचा लाडू असा नाष्टा केला. साडेअकरा वाजता दिल्लीला पोहोचलो. डेहराडूनची फ्लाईट तीन वाजता होती. त्यामुळे प्रवेशाच्या सगळ्या औपचारीक गोष्टी संपवल्यानंतर पराठे, दहीभात असे भोजन केले. आणि वरती कॉफी प्यालो. साडेचार वाजता डेहराडूनला पोहोचल्यानंतर तिथून हरिद्वार पर्यंत टॅक्सीने निघालो. तासाभराचा प्रवास होता. हरिद्वारच्या हॉटेल लक्ष्यच्या दारामध्ये बरोबर साडेपाच वाजता आम्ही होतो. आत गेल्याबरोबरच अलका रास्ते ही नर्मदा परिक्रमेतील मैत्रीण भेटली. तीच माझी रूम पार्टनर झाली. संध्याकाळी मात्र कुठे गेलो नाही. आधी चहा आणि गोबीमन्चुरीन मागवले. फ्रेश होऊन हॉटेलमध्येच विश्रांती घेतली आणि तिथेच बटर पराठा, शाही पनीर, जीरा राईस असे मस्त जेवण करून झोपी गेलो.